Jump to content

सत्यशोधक समाज

साचा:माहिती चौकट संस्था

सप्टेंबर २४, १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

जमीनदार, शेटजी व पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. `निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’ हा विचार फुले यांनी मांडला. देवाविषयी किंवा निसर्गाविषयी निर्मिक हा शब्द वापरला, त्यावरून सत्यशोधक समाज व अर्थातच महात्मा जोतिबा फुले आस्तिक होते, हे स्पष्ट होते. महात्मा फुले यांनी कनिष्ठ वर्गातील लोकांसाठी गुलामगिरी हा उपदेशपर ग्रंथ लिहून झाल्यानंतर महाराष्ट्रात पंतोजी व शेटजींच्या मानसिक गुलामगिरीतून कनिष्ठ वर्गाला मुक्त करण्यासाठी चळवळ सुरू करण्याचा निर्धार केला. जोतिबा फुले हे क्रांतिकारी नेते असल्याने त्यांच्या वृत्तीशी सुसंगत व धोरणाला पोषक असे तत्त्वज्ञान व व्यासपीठ निर्माण करणे त्यांना अत्यंत गरजेचे वाटले. यातूनच सत्यशोधक समाजाची निर्मिती झाली. सत्यशोधक समाजाचे तत्त्वज्ञान मानताना एकेश्वरवाद ईश्वर भक्ती, व्यक्तीचे श्रेष्ठत्व, त्याचप्रमाणे ग्रंथप्रामाण्य त्याला विरोध, सत्य हेच परम मानवी सद्गुणांची जोपासना अशाप्रकारे वैचारिक आणि प्राथमिक भूमिका घेऊन सत्यशोधक समाजाने आपले तत्त्वज्ञान मांडले. ईश्वराची भक्ती ही निरपेक्ष भावनेने असावी, त्यामध्ये मध्यस्थाची अथवा भट भिक्षूची आवश्यकता नाही, याचं प्रतिपादन सत्यशोधक समाजाने केलं. त्याचप्रमाणे व्यक्ती ही जन्माने श्रेष्ठ नसून ती गुणकर्माने श्रेष्ठ ठरते, याचं स्पष्टीकरणही सत्यशोधक समाजाने दिलं. पाप-पुण्य स्वर्ग-नरक पुनर्जन्म या गोष्टीला त्यांनी थारा दिला नाही, तर सत्य हेच परब्रम्ह आहे, अशा प्रकारचा विचार सत्यशोधक समाजाने मांडला. मानवाच्या अंगी असलेल्या सद्गुणांची जोपासना व्हावी, हा विचार दृढ करण्याचा प्रयत्न सत्यशोधक समाजाने केला.

  • 'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या विचारांना प्रस्तूत केले आहे. मानवता धर्माची शिकवण सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला गेला. सामाजिक परिवर्तनाची दिशा ठरवताना सत्यशोधक समाजाने समाजातील दीनदलित उपेक्षीत समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला.
  • सत्यशोधक समाजातर्फे 'दीनबंधू' नावाचे एक साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे. हे वृत्तपत्र संपादक 'कृष्णराव भालेराव यांनी इ.स 1 जानेवारी 1877 मध्ये पुणे येथे स्थापन केले. हे वृत्तपत्र मराठी भाषेत होते. लोकशिक्षण व लोकजागृती प्रभावी माध्यम म्हणून दिनबंधूचा उल्लेख करावा लागतो.
  • 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते.
  • सत्यशोधक समाजाने गुलामगिरीच्या विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.
  • सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली.
  • त्यासाठी मराठीत मंगलाष्टके रचली.
  • समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
  • सत्यशोधक समाजाचे मुंबई शाखेचे अध्यक्ष नारायण मेघाजी लोखंडे हे होते. इ.स 1890 मध्ये यांनी दिनबंधु या वृत्तपत्राचे संपादन आणि मुद्रण मुंबई येथून केले.

अधिवेशने/संमेलने :

कमीअधिक प्रमाणात सत्यशोधक चळवळ झपाटयाने/काही वेळा मंदपणे फोफावत असली, तरी सत्यशोधक समाजाच्या वतीने तिच्या ध्येय-उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठीच चळवळीचे हे महायान सुरू होते. लोकजागरण, लोकप्रबोधन, लोकसंघटन आणि नवसमाजनिर्मिती या सत्यशोधक समाजाच्या ध्येयसिद्धीसाठी हा सारा खटाटोप, हा उभा प्रयास होता. १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची म. फुले यांनी स्थापना केली मात्र समाज अधिवेशनांची सुरुवात १९११ पासून झाली. १९११ पासून २००७ पर्यंत सत्यशोधक समाजाची एकूण ३५ अधिवेशने संपन्न झाली. पहिले अधिवेशन १७ एप्रिल १९११ रोजी पुणे येथे स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरू यांच्या अध्यक्षतेने पार पडले. त्याच्या स्वागताध्यक्षपदी गणपतराव बिरमल होते. पस्तीसावे अधिवेशन २२ डिसेंबर २००७ रोजी गेवराई (जिल्हा बीड, मराठवाडा) येथे डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. ‘ मराठवाडा सार्वजनिक सभेचे ’ अध्यक्ष पद्माकरराव मुळे यांनी स्वागताध्यक्षपद भूषविले होते. पुणे ते गेवराई या प्रवासामधली सलग ३३ अधिवेशने अशी आहेत : नासिक, ठाणे, सासवड (पुणे), अहमदनगर, निपाणी, आडगाव (जळगाव), अकोला, सातारा, दांडेगाव (हिंगोली), बेळगाव, शेगाव (हिंगोली), अमरावती, मुंबई, पुन्हा मुंबई, कोल्हापूर, पाडळी (सातारा), मौजे भक्तवाडी (सातारा), औरंगाबाद, पुन्हा पाडळी (सातारा), बोराडी (धुळे), पुन्हा नासिक, नागपूर, वर्धा, यवतमाळ, सांगली, मुकुंदवाडी (अहमदनगर), वान्द्रे (पूर्व), अकोला, लातूर, सातारा, पुन्हा औरंगाबाद, चिखली, गेवराई.[]

कार्य व उपक्रम :

सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी म. फुले यांनी घटना बनविली. तद्नुषंगाने नियमावली तयार केली. मूलतः सत्यशोधक समाज एकच निर्मिक, एक धर्म, एक मनुष्यजात मानणारा म्हणून स्थापन झाला. त्याची आचारसंहिता सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात दिली असून, त्यात ढोबळ नियम सांगितले आहेत. त्यांनुसार समाजाच्या कार्यकारिणीत सुरुवातीस म. जोतीराव फुले हे चिटणीस आणि डॉ. विश्राम रामजी घोले हे अध्यक्ष होते. वर्षातून कार्यकारिणीच्या सर्वसाधारण चार सभा, लोकशाही पद्धतीने कार्यकारी मंडळाची निवड व बहुमताने निर्णय, अशी सर्वसाधारण सूत्रे होती. सुरुवातीस दर रविवारी डॉ. गावडे यांच्याकडे अनौपचारिकरीत्या मंडळी जमत. समाजापुढील प्रश्न, सोडवणुकीचे उपाय व सदयःस्थिती यांविषयी चर्चा होत आणि दर पंधरा दिवसांतून एक व्याख्यान असा उपक्रम असे.

सत्यशोधक समाजातील व्यक्तींनी पुढील काही सूत्रे काटेकोरपणे पाळावीत, अशी भूमिका आहे. (१) ईश्वर (निर्मिक) एक असून तो सर्वव्यापी, निर्गुण, निर्विकार व सत्यरूप आहे आणि सर्व माणसे त्याची लेकरे आहेत. या निर्मिकाशिवाय (निर्मात्याशिवाय) मी इतर कशाचीही पूजा करणार नाही. (२) निर्मिकाची भक्ती करण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येकाला आहे. त्यासाठी पुरोहित किंवा मध्यस्थाची आवश्यकता नाही. (३) माणूस जातीने श्रेष्ठ ठरत नसून गुणांनी श्रेष्ठ ठरतो. (४) निर्मिक सावयव रूपाने अवतरत नाही. (५) पुनर्जन्म, परलोक, मोक्ष, कर्मकांड, जपतप या गोष्टी अज्ञानमूलक आहेत त्यांचा अवलंब माझ्याकडून होणार नाही. (६) जनावरांना मारण्यात मी सहभागी होणार नाही. (७) दारूच्या व्यसनापासून अलिप्त राहण्याचा मी प्रयत्न करीन आणि (८) तसेच समाजाचा खर्च चालावा म्हणून मी माझ्या उत्पन्नातून काही वर्गणी देईन.


  1. ^ "सत्यशोधक समाज". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-09-07 रोजी पाहिले.