सत्यनारायण पूजा
सत्यनारायण हे एक काम्य पौराणिक व्रत आहे.[१] बंगाल व महाराष्ट्र प्रांतात हे व्रत फार लोकप्रिय आहे.
इतिहास
या पूजेचा उल्लेख प्रथम स्कंद पुराणात, रेवा कांडा येथे सुता पुराणिकने नैमिषारण्यातील ऋषिनि केला आहे. तपशील कथेचा भाग आहे जे सहसा विधी दरम्यान वाचले जातात
कमळावर बसलेल्या नारायणाची एक चित्र सोबत ठेवत हा विधी केला पाहिजे.
श्री सत्यनारायण पूजा ही गुजरात, महाराष्ट्र, आसाम, बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, ओडिशा, मणिपूर यासह भारतातील बऱ्याच भागांमध्ये एक लोकप्रिय प्रथा आहे.
ही पूजा सामान्यत: प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी, एकादशी (पौर्णिमेच्या किंवा अमावास्येच्या 11 व्या दिवशी) वा अन्य शुभ दिवशी केली जाते.हे विशेष प्रसंगी आणि यशाच्या वेळी, परमेश्वराचे आभार मानण्यासाठी देखील केले जाते. या प्रसंगांमध्ये विवाह, पदवी, नवीन नोकरीची सुरुवात, नवीन घर खरेदी, काही नावे समाविष्ट असू शकतात. सत्यनारायण पूजा कोणत्याही कारणास्तव कोणत्याही दिवशी केली जाऊ शकते. ही पूजा कोणत्याही उत्सवापुरती मर्यादीत नसून पौर्णिमा (पौर्णिमेचा दिवस) विशेष म्हणजे या पूजेसाठी अतिशय शुभ मानली जाते. संध्याकाळी ही पूजा करणे अधिक योग्य मानले जाते. तथापि, एखादी व्यक्ती सकाळी ही पूजा देखील करू शकते.
पूजा व व्र्तामागील आशय व हेतू
श्री सत्यनारायण ही सगुण पूजा आहे.काही विशेष निमित्ताने चैतन्य शक्तीचे स्मरण,पूजन करणे,तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे,हा सत्यनारायण पूजेचा हेतू असला पाहिजे.मनाला उभारी,प्रसन्नता वाटेल,श्रद्धा निर्माण होईल,पुरुषार्थाची उपासना करण्याची प्रेरणा जागृत होईल असे सत्यनारायण पूजेचे स्वरूप असले पाहिजे.[२]
पूजेचे स्वरूप
या व्रताला सत्यनारायणव्रत असे म्हणतात. हे व्रत विधिपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो असे मानले जाते.या व्रताचे फल हे व्रत दुःख शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे. तसेच सौभाग्य व संतति देणारे, सर्व कार्यात विजयी करणारे, हे आहे. हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यांसह धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोषकाळी (सूर्यास्तानंतर दोन तासांत) सत्यनारायणाचे पूजन करावे.महाराष्ट्रात ही पूजा वैयक्तिक व सार्वजनिक रीत्याही करतात.श्रावण महिन्यात अनेक कुटुंबात ही पूजा करण्याची प्रथा आहे.या व्र्ताचा विधी असा-या व्रतात सत्यनारायण हे मुख्य दैवत असून सूर्यादी नवग्रह देवता ,गणपती, गौरी,वरुण, अष्टदिक्पाल ,लोकपाल इ.परिवार देवता आहेत.म्हणून या मांडावळीत मध्यभागी तांदूळाच्या किंवा गव्हांच्या राशीवर उदकयुक्त कलश ठेवून त्यात दूर्वा,पंचपल्लव,सुपारी,सोन्याचे नाणे इ. घालतात व त्याच्यावर पूर्णपात्र ठेवतात.पूर्णपात्रात सत्यनारायणाची प्रतिमा किंवा शालिग्रामशिला वा बाळकृष्णाची मूर्ती किंवा नारळ ठेवतात.नंतर सत्यनारायणाची षोडषोपचारे पूजा करतात.सव्वा शेर गव्हाचा किंवा तांदूलाचा रवा ,तेवढेच तूप ,केळे,दूध,साखर किंवा गूळ या सर्वांचा शिरा करतात.आणि त्याचा नैवेद्य दाखवितात.पूजा झाल्यावर व्रतकर्ता कथा श्रवण करतो[३]. त्यानंतर पोथीची पूजा व कथावाचकाची पूजा करून दक्षिणादान देऊन पूजा समाप्त करतात.[४]
आख्यायिका
सत्यनारायणाची कथा स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आली आहे. श्रीगजाननाय नम:| आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो. एकदा नैमिषारण्यात राहणाऱ्या शौनक आदि ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सूतांना प्रश्न विचारला ॥१॥ ऋषी विचारतात, "हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात ते ऎकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा." ॥२॥ सूत सांगतात, "मुनीहो, नारदांनी हाच प्रश्न भगवान्महाविष्णूंना विचारला त्या वेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हांला सांगतो. शांत चित्ताने ऎका. ॥३॥ एकदा महायोगी नारदमुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकांत फिरत असता मनुष्यलोकांत आले. ॥४॥ आणि मनुष्यलोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे सर्व लोक भोगीत आहेत असे पाहून ॥५॥ कोणत्या साधनाने त्यांची दुःखे नक्की नाहीशी होतील, हा विचार करून नारदमुनी वैकुंठात गेले. ॥६॥ त्या वैकुंठात चार हातात शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रुळणारी वनमाला गळ्यात घातलेल्या स्वच्छ नारायण भगवंताला पाहून त्याची स्तुती करण्याला त्यांनी आरंभ केला." ॥७॥ नारद म्हणाले, "ज्याचे स्वरूप, वाणी व मन यांना न कळणारे आहे व जो अनंत शक्तिमान आहे; तो उत्पत्ती, मध्य व नाश यांनी रहित आहे, मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभकाळी तो तीन गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाहीशी करतो त्या नारायणाला माझा नमस्कार असो." ॥८॥ ॥९॥ नारदमुनींनी केलेली स्तुती ऎकून भगवान्विष्णू नारदाजवळ बोलले. भगवान म्हणाले, "मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आलात? तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा. मी त्याचे समर्पक उत्तर देईन." ॥१०॥ नारद म्हणाले, "हे भगवंता, मृत्युलोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगीत आहेत." ॥११॥ नारद म्हणाले, "हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व दुःखी लोकांची सर्व दुःखे लहान अशा कोणत्या उपायांनी नाहीशी होतील ते सर्व सांगा. माझी ऐकण्याची इच्छा आहे."॥१२॥ भगवान् म्हणतात, "हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूजे जो तू प्रश्न विचारलास तो फारच सुंदर आहे. म्हणून जे व्रत केल्याने जीवाची सर्व दुःखे नाहीशी होतात ते व्रत मी सांगतो. तू श्रवण कर. ॥१३॥ हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्गलोकात किंवा मनुष्यलोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत आज तुला सांगतो. ॥१४॥ या खेरीज अनेक प्रांतात सत्यनारायणाच्या विविध कथा प्रचलित आहेत.
संदर्भ
- ^ "भगवान सत्य नारायण की कथा के लाभ और नियम". Patrika News (hindi भाषेत). 2021-10-12 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ श्री सत्यनारायण पूजा पोथी-ज्ञान प्रबोधिनी,पुणे प्रकाशन
- ^ Webdunia. "सत्यनारायण की कथा क्यों की जाती है, जानिए व्रत पूजा, महत्व और मंत्र". hindi.webdunia.com (हिंदी भाषेत). 2021-10-12 रोजी पाहिले.
- ^ जोशी, महादेवशास्त्री (मार्च २०१०). भारतीय संस्कृती कोश खंड नववा. पुणे: भारतीय संस्कृतिकोश मंडळ. pp. ६२६.
बाह्य दुवे
- श्रीसत्यनारायण कथा[permanent dead link]