सत्यदेव दुबे
सत्यदेव दुबे | |
---|---|
जन्म | इ.स. १९३६ बिलासपूर छत्तीसगढ |
मृत्यू | २५ डिसेंबर, इ.स. २०११ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, पटकथाकार, संवादलेखक |
कारकीर्दीचा काळ | इ.स. १९६२-२००८ |
भाषा | मराठी, हिंदी |
प्रमुख नाटके | गिधाडे, शांतता! कोर्ट चालू आहे |
प्रमुख चित्रपट | 'अंकुर' (इ.स. १९७४), निशांत' (इ.स. १९७५) |
पुरस्कार | पद्मभूषण पुरस्कार (इ.स. २०११), संगीत नाटक अकादमी (इ.स. १९८०) |
सत्यदेव दुबे (इ.स. १९३६; बिलासपूर, ब्रिटिश भारत - २५ डिसेंबर, इ.स. २०११; मुंबई, महाराष्ट्र) हे भारतीय पटकथाकार, संवादलेखक, नाट्य-अभिनेते, चित्रपट-अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते होते. नाट्यक्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार (इ.स. १९७१), तन्वीर सन्मान (२००८), चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार (२००८) व पद्मभूषण पुरस्कार (इ.स. २०११) देऊन गौरवण्यात आले.
जीवन
दुब्यांचा जन्म इ.स. १९३६ साली ब्रिटिश भारतातील बिलासपूर (वर्तमान छत्तीसगढ राज्यात) येथे झाला. क्रिकेट खेळाडू होण्याचे स्वप्न बाळगून ते मुंबईत आले. मात्र मुंबईत गेल्यावर सौदी अरब-भारतीय रंगकर्मी इब्राहिम अल्काझी यांनी चालवलेल्या थिएटर युनिट नावाच्या नाट्यसंस्थेत ते सामील झाले. पुढे राष्ट्रीय नाट्य विद्यालय (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) या संस्थेचे संचालकपद स्वीकारून अल्काझी नवी दिल्लीस गेले. त्यानंतर दुब्यांनी थिएटर युनिट नाट्यसंस्थेची धुरा आपल्या खांद्यांवर घेतली.
गिरीश कर्नाडांचे पहिले नाटक ययाति, तसेच हयवदन, बादल सरकारांची एवम् इंद्रजित व पगला घोडा, विजय तेंडुलकरांचे खामोश! अदालत जारी है, मोहन राकेशांचे आधे अधुरे, धर्मवीर भारती यांचे अंधा युग इत्यादी गाजलेली नाटके दुब्यांनी निर्मिली.
दुब्यांनी अपरिचय के विंधाचल (इ.स. १९६५) व टंग इन चीक (इ.स. १९६८) असे दोन लघुपट बनवले. विजय तेंडुलकरांच्या नाटकावर आधारित शांतता! कोर्ट चालू आहे हा मराठी भाषेतील चित्रपट त्यांनी दिग्दर्शिला आहे.
कारकीर्द
चित्रपट
चित्रपट | वर्ष (इ.स.) | भाषा | सहभाग |
---|---|---|---|
शांतता! कोर्ट चालू आहे | इ.स. १९७१ | मराठी | दिग्दर्शन |
अंकुर (चित्रपट) | इ.स. १९७४ | हिंदी | संवाद, पटकथा |
निशांत (चित्रपट) | इ.स. १९७५ | हिंदी | संवाद |
भूमिका (चित्रपट) | इ.स. १९७७ | हिंदी | संवाद, पटकथा |
जुनून (चित्रपट) | इ.स. १९७८ | हिंदी | संवाद |
कलयुग (चित्रपट) | इ.स. १९८० | हिंदी | संवाद |
आक्रोश (चित्रपट) | इ.स. १९८० | हिंदी | संवाद |
विजेता (चित्रपट) | इ.स. १९८२ | हिंदी | संवाद, पटकथा |
मंडी (चित्रपट) | इ.स. १९८३ | हिंदी | पटकथा |
मृत्यू
दुब्यांना सप्टेंबर, इ.स. २०११मध्ये अपस्माराचा झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते दोन महिने कोम्यात होते. अखेर २५ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले[१].
संदर्भ व नोंदी
- ^ "पं. सत्यदेव दुबे काळाच्या पडद्याआड". 2012-01-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील सत्यदेव दुबे चे पान (इंग्लिश मजकूर)