सत्त्वशीला सामंत
सत्त्वशीला विठ्ठल सामंत (२५ मार्च, इ.स. १९४५:मुंबई, महाराष्ट्र - १ मे, इ.स. २०१३:पुणे, महाराष्ट्र) या मराठीतील एक भाषाशास्त्रज्ञ होत्या. त्यांच्या आईचे नाव सुनंदा देसाई व वडलांचे नाव परशुराम देसाई होते. सत्त्वशीलाबाईंनी संस्कृत-मराठी विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून एल्एल.बी आणि भाषाशास्त्र पदविका (डिप्लोमा इन लिन्ग्विस्टिक्स) हे अभ्यासक्रम पूर्ण केले. महाराष्ट्र सरकारच्या भाषा संचालनालयात त्या प्रथम अनुवादक आणि नंतर उप-संचालक होत्या.
निवृत्तीनंतर
निवृत्तीनंतर त्यांनी भाषाविषयक विविध बौद्धिक उपक्रमांत भाग घेतला. मराठी शुद्धलेखन या विषयावर त्यांनी रुची, भाषा आणि जीवन या नियतकालिकांतून आणि मराठी वृत्तपत्रांतून लेख लिहिले, वाचकांच्या पत्रव्यवहारांत त्यांनी आपले विचार मांडले आणि इतरांच्या मतांमधील चुकीच्या कल्पना दुरुस्त करायचा प्रयत्न केला. मानस-सरोवर हे बरोबर असून मान-सरोवर चुकीचे शुद्धलेखन असल्याबद्दल त्यांनी लेख लिहून व भारत सरकारशी पत्रव्यवहार करून आपली मते ठामपणे मांडली.
मराठी शुद्धलेखनविषयक विचार
सामंत शुद्धलेखनाच्या जुन्या नियमांच्या पुरस्कर्त्या होत्या. शुद्धलेखनाचे नियम हे कृत्रिमरीत्या तयार करायचे नसतात, तर बांधायचे असतात असे त्यांचे मत होते. शुद्धलेखनाचे जुने नियम भाषेच्या विकासक्रमामध्ये घडत गेलेले असल्यामुळे त्या नियमांचा त्या पुरस्कार करीत. शुद्धलेखनाच्या नव्या नियमांना विरोध करण्यामागे त्यांची ही तात्त्विक भूमिका होती. या भूमिकेपायी त्यांनी अनेक वाद ओढवून घेतले . सरकारदरबारी पत्रव्यवहार केला. त्यांच्यावर टीकाही झाली. मात्र, त्या मागे हटल्या नाहीत. जुन्या नियमांबद्दल त्या आग्रही असल्या, तरी शुद्धलेखनाचे नियम अजिबातच नको, असे म्हणण्याला त्यांचा विरोध होता . शुद्धलेखनाचे नियम हद्दपार करणे भाषेसाठी घातक असल्याचे त्या आवर्जून सांगत. शुद्धलेखन म्हणजे भाषिक शिस्त आहे, असे नमूद करीत त्या या शिस्तीची तुलना वाहतुकीच्या नियमांशी करीत. ' वाहतुकीची शिस्त मोडली, की प्राणाशी गाठ पडते; त्याप्रमाणेच भाषिक शिस्त मोडली, की सांस्कृतिक मरण जवळ ओढवून घेतले जाते,' असे त्यांचे म्हणणे होते. म्हणूनच त्या सदैव शुद्धलेखनाच्या बाजूने झटत राहिल्या. भाषेबद्दलची कमालीची आस्था हीच त्यांची यामागची प्रेरणा होती. या प्रेरणेतूनच त्यांनी 'मराठी शुद्धलेखन प्रणाली' हे पुस्तक लिहिले. मराठी - हिंदी - इंग्रजी या तिन्ही भाषांमधील शब्दांचा व्यवहारोपयोगी कोशही त्यांनी ' शब्दानंद ' या नावाने सिद्ध केला. त्यांच्या या दोन्ही पुस्तकांची आवर्जून दखल घेतली गेली. त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळाले. भाषेबद्दलची अतिशय सूक्ष्म जाण त्यांना होती. म्हणूनच त्या याबाबत अतिशय संवेदनशील होत्या. भाषेची मोडतोड होताना दिसली, तंत्रज्ञानामुळे अक्षरांच्या वळणात बदल झालेले दिसले, की त्या व्यथित होत. भाषाविषयक बौद्धिक उपक्रमात त्या आवर्जून सहभागी होत. हा सहभाग मुक्तपणे व्हावा, यासाठी त्यांनी १९८६मध्ये प्रकृति-अस्वास्थ्याचे कारण सांगून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.
मृत्यू
निवृत्तीनंतर ऑक्टोबर १९९५मध्ये आपल्या पतीबरोबर पुण्यात येऊन स्थायिक झाल्लेल्या सत्त्वशीला सामंत यांचे १ मे २०१३ रोजी रात्री हृदयक्रिया बंद पडून निधन झाले.
प्रकाशित साहित्य
- ज्ञानकोशकार श्री.व्यं. केतकर यांच्या कन्या कै. वीरा शर्मा यांच्या मूळ इंग्रजी कथांचा मराठी अनुवाद-आहेर, हा ग्रंथाली प्रकाशनाने १९९७ साली प्रकाशित केला.
- मराठी भाषा आणि शुद्धलेखन : एक विचार मंथन (लेखसंग्रह, संपादक - डाॅ. मीरा धांडगे)
- विसा स्कूल डिक्शनरी (शालॊपयोगी मराठी-मराठी-इंग्रजी शब्दकोश)
- ’व्याकरणशुद्ध लेखनप्रणाली’ हे पुस्तक १९९९ साली गोकुळ मासिक प्रकाशनाने प्रसिद्ध केले होते. त्याच्या दोन आवृत्त्या निघाल्या असून त्याला ’महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थे’चा पुरस्कार मिळाला आहे.
- शब्दरंग (लेखसंग्रह)
- पुण्याच्या डायमंड प्रकाशनाने प्रकाशित केलेला ’शब्दानंद’ हा डेमी-साइझ कागदावर छापलेला नऊशे पानी शब्दकोश मार्च २००७मध्ये प्रकाशित झाला. इंग्लिश भाषेत वापरल्या जाणाऱ्या आणि मराठीत आवश्यक असलेल्या अनेक तांत्रिक संज्ञांना या कोशात मराठी आणि हिंदी पर्याय दिले आहेत. शब्दकोशात २७००० इंग्रजी आणि ३०,००० हिंदी-मराठी शब्द आहेत. हा सर्व कोश सत्त्वशीलाबाईंनी एकहाती केला. ’मोरो केशव दामले’यांच्यानंतर एवढे मोठी एकहाती काम क्वचितच कुणी केले असेल. या शब्दकोशाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारासह, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे पुरस्कार लाभले आहेत.
सत्त्वशीला सामंत यांच्या निधनानंतरचा मृदुला जोशी यांनी लिहिलेला लेख
शब्दांच्या क्षेत्रातील धर्मयोद्ध्या
सत्त्वशीला सामंत यांचे गाजलेले लेख
- आवळे जावळे वर्ण - १ [१]
- आवळे जावळे वर्ण - २ [२]]
- आवळे जावळे वर्ण - ३ [३]
- का दुरावतोय आपण 'आई'पासून? Archived 2012-11-11 at the Wayback Machine.
- 'बालभारती'चा बालहट्ट Archived 2016-03-05 at the Wayback Machine.; माधव राजगुरू यांचे उत्तर [४]
- बालहट्ट नव्हे, बालिश हट्ट Archived 2011-10-11 at the Wayback Machine. : माधव राजगुरू यांना प्रत्युत्तर
- मराठीतील ऊंझा जोडणी Archived 2016-03-09 at the Wayback Machine.
- मराठीच्या-शोधात-गांगरलेले गांगल [५]
- मानसरोवर नव्हे मानससरोवर Archived 2016-03-09 at the Wayback Machine.
- 'शब्दानंदो'त्सव [६] Archived 2015-09-04 at the Wayback Machine.
- ज्ञान आणि Knowledge (एक पूर्श्चात्य योग) [७] Archived 2020-10-01 at the Wayback Machine.
- डॉ. श्रीखंडे यांच्यावर ललित लेख : सर्जनशील सर्जन