सत्कार्यवाद
भारतीय दर्शनशास्त्रात प्रत्येक दर्शनाने सृष्टीतील कार्य-कारण संबंधांचे वेगवेगळे सिद्धान्त मांडलेले आहेत. त्यापैकी महर्षी कपिलांच्या सांख्यदर्शनातील ‘सत्कार्यवादा’चा सिद्धांन्त हा विशेष महत्त्वपूर्ण आहे. कारणाची विकसित अवस्था म्हणजे कार्य होय. अर्थात् कार्य हे नव्याने उत्पन्न होत नसून ते कारणाच्या अवस्थेतील परिवर्तनच आहे, असे सत्कार्यवाद सांगतो.
सांख्यकारिका ह्या सांख्यदर्शनाधारित प्रकरण ग्रंथात ईश्वरकृष्ण पुढील कारिकेद्वारे सत्कार्यवाद सिद्ध करतात.
असदकरणादुपादानग्रहणात् सर्वसम्भवाभावात् ।
शक्तस्य शक्यकरणात् कारणभावाच्च सत्कार्यम्।।९।।
१] असदकरणात् -
‘असत्’ म्हणजे जे अस्त्तित्वात नाही, असे कार्य निर्माण करता येणे शक्य नाही. म्हणून कार्य हे ‘सत्’ असते.
२] उपादानग्रहणात् -
सर्व कार्ये ही त्यांच्या उपादान कारणाशी नित्य संबंध ठेवून असतात. जसा घटाचा मातीशी असतो. त्यामुळे कार्याच्या उपादान कारणाचेच ग्रहण केले जाते.
३] सर्वसम्भवाभावात् -
मात्र कोणतेही उपादान कारण कोणतेही कार्य उत्पन्न करु शकत नाही. जसे लाकडापासून घट निर्मिती होणे अशक्य आहे.
४] शक्तस्य शक्यकरणात् -
उलट जे कार्य उत्पन्न करण्याची क्षमता कारणाची असते, तेच कार्य त्या कारणाद्वारे निर्माण हौ शकते. जसे आंब्याच्या बीजातून आंब्याचेच झाड उगवते.
५] कारणभावात् -
कार्यात कारणभाव हा मूलतःच विद्यमान असतो. अर्थात् कारणाचा सद्भाव हा कार्यात येणारच.
वरील युक्तिवादाद्वारे ईश्वरकृष्ण सत्कार्यवादाचे समर्थन करतात.