सतीश बहादूर
प्रा. सतीश बहादूर (२६ नोव्हेंबर, १९२५:मुरादाबाद, उत्तर प्रदेश, भारत, २३ जुलै, २०१०:पुणे, महाराष्ट्र) हे चित्रपट रसास्वादाचे भारतातील पहिले प्राध्यापक होते. त्यांनी १९६३ ते १९८३ या काळात पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अध्यापन केले.
प्रा. डॉ. बहादूर हे मूळचे उत्तर प्रदेशातील मुरादाबादचे होते. त्याच्याकडे अर्थशास्त्रातील पीएच.डी. होती. १९५१-१९६३ या काळात त्यांनी आग्रा आणि कानपूर येथील पोस्ट-ग्रॅज्युएट कॉलेजांत अर्थशास्त्राचे अध्यापन केले. काव्य, चित्र, संगीत या कलांमध्ये त्यांना विशेष रस होता. आग्रा येथे फिल्म सोसायटीच्या माध्यमातून चित्रपट रसास्वादाची संकल्पना त्यांनी पहिल्यांदा रुजवली. रंगभूमी आणि चित्रपट या कलांमधील संबंधही त्यांनी उलगडून दाखवला. पुण्यात आल्यानंतरही ते भारतभर हिंडून चित्रपट माध्यमाची ओळख करून देत राहिले. चित्रपट माध्यम म्हणून समजावून देताना रसिक अभ्यासकांना नवे आयाम देण्याचे काम त्यांनी केले.
लेखन
प्रा. सतीश बहादूर यांचे लेखन एकत्रित स्वरूपात कोठेही उपलब्ध नाही. त्यामुळे पुण्यातील अक्षर वाङ्मय प्रकाशनाने प्रा. सतीश बहादूर (चित्रपटभाषा) नावाचा एक विशेष अंक काढला आहे. डॉ. श्यामला वनारसे या अंकाच्या अतिथी संपादक असून, डॉ. अरुण प्रभुणे या अंकाचे कार्यकारी संपादक आहेत.
विशेषांकातील लेखांचा तपशील
या विशेषांकात, चित्रपटाकडे एक कला म्हणून पाहण्याची दृष्टी दिलेल्या बहादूर यांनी स्वतः लिहिलेले आणि चित्रपट अभ्यासकांनी चित्रपट भाषेवर लिहिलेले लेख आहेत. चित्रपट अभ्यासकांसाठी हा अंक संदर्भ म्हणून विशेष महत्त्वाचा आहे.
विशेषांकाच्या पहिल्या भागात प्रा. सतीश बहादूर यांच्या लेखनातून चित्रपट रसास्वादाची संकल्पना उलगडण्यात आली आहे. दुसऱ्या भागामध्ये अरुण खोपकर, अशोक राणे, अनिल झणकर, सुषमा दातार, सतीश जकातदार, अभिजित देशपांडे, गणेश विसपुते आदी चित्रपट अभ्यासकांचे लेख या अंकामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
चित्रपट अभ्यासक समर नखाते यांची प्रदीर्घ मुलाखत हे या अंकाचे विशेष आकर्षण आहे. याशिवाय या अंकात सतीश बहादूर यांच्या कन्या नंदिनी बहादूर-गुप्ता, सुरेंद्र चौधरी यांनीही प्रा. बहादूर यांच्या कार्याची ओळख करून दिली आहे.
पुस्तके
- A Textual Study of The Apu Trilogy (सहलेखिका - डॉ. श्यामला वनारसे). हे पुस्तक हिंदीतही उपलब्ध आहे.
- Satyajit Ray's Pather Panchali, Volume 1 (Screenplay with Analytical Notes) आणि Volume 2