Jump to content

संन्यासी

संन्यासावस्था म्हणजे हिंदुधर्मशास्त्राप्रमाणे मानवी जीवनाच्या चार अवस्थांपैकी शेवटची चौथी अवस्था. हिंदुधर्मशास्त्रानुसार मानवी जीवन हे ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य (गृहस्थाश्रम), वानप्रस्थ आणि संन्यास अशा चार आश्रमांत विभागलेले आहे. वानप्रस्थ म्हणजे संसार सोडून देऊन वनात राहणे. वानप्रस्थी हा आपल्या भार्येसह आणि अग्नीसह वनात राहू शकतो. संन्यासी मात्र भार्या आणि अग्नीचा त्याग करून परिवाजक (सदा भ्रमण करणारा संन्यासी) बनतो. वानप्रस्थ आणि संन्यास यांचे इतर नियम प्रायः सारखे आहेत. मनुष्याने चार आश्रमांचा एकापुढे एक अशा क्रमाने स्वीकार करावा, किंवा तयारी असल्यास पूर्वीच्या कोणत्याही आश्रमातून एकदम संन्यासाश्रमात प्रवेश करण्यासही हरकत नसते.

संन्याशांचे मुख्यतः चार प्रकार आहेत – (१) कुटीचक, म्हणजे झोपडी बनवून तीमध्ये राहणारा, भगवी वस्त्रे परिधान करणारा, स्वतःच्या आप्ताच्या घरी भोजन करणारा. (२) बहूदक, म्हणजे बांधव वर्ज्य करून इतर सात घरी भिक्षा मागून निर्वाह करणारा. (३) हंस, म्हणजे गावात एक रात्र आणि शहरांत पाच रात्री राहणारा व वर्षातील अकरा महिने भिक्षेवर राहणारा. (४) परमहंस, शिखायज्ञोपवीत आणि नित्यकर्म यांचा त्याग करणारा. हे चार प्रकार उत्तरोत्तर श्रेष्ठ आहेत. यांखेरीज तुरीयातीत आणि अवधूत हे आणखी दोन प्रकार संन्यासोपनिषदात सांगितले आहेत.

अवधूतांचे चार प्रकार आहेत :

(१) "ब्रह्मावधूत" - हा कोणत्याही वर्णाचा ब्रह्मोपासक किंवा कोणत्याही आश्रमाचा सदस्य असू शकतो.

(२) "शैवावधूत" - याने विधिपूर्वक संन्यास घेतलेला असतो.

(३) "वीरावधूत" - याच्या डोक्यावरील केस लांब आणि विस्कटलेले असतात, गळामध्ये हाडांची किंवा रुद्राक्षाची माळ असते, कमरेला लंगोटी असते, शरीरावर भस्माचा किंवा रक्तचंदनाचा लेप असतो, हातात लाकडाचा दंड व परशू असतो आणि खांद्यावर मृगचर्म असते.

(४) "कुलावधूत" - हा कुलाचारामध्ये अभिषिक्त असूनही गृहस्थाश्रमात राहत असतो.

अवधूत मार्ग अत्यंत कठीण असतो. या मार्गाने जाणारा क्वचित दिसतो. जो दिसतो तो नित्य पवित्र असतो आणि वैराग्याची प्रतिमूर्ती असतो. ज्ञानी व वेदांचा जाणकार असतो. हा समस्त प्राण्यांमध्ये आपली प्रतिमा पाहतो आणि त्या प्रतिमेमध्ये परब्रह्माची प्रतिमा पाहतो. तो हंस बनून परमहंस बनण्याचा सतत प्रयास करत असतो.

त्रिदण्डी हादेखील संन्यासाचा एक प्रकार आहे. असा संन्यासी तीन एकत्र बांधलेले दण्ड उजव्या हातात धारण करतो. ते वाणी, मन आणि देह यांच्या निग्रहाचे द्योतक समजले जातात. ‘वाग्दण्डोऽथ मनोदण्डः कायदण्डस्तथैवच । यस्यैते निहिता बुद्घौ त्रिदण्डीतिस उच्यते’ (मनुस्मृति १२.१०) अशी ‘त्रिदण्डी’ची व्याख्या मनुस्मृतीत आढळते. हा संन्यासाचा गौण प्रकार होय. यात शेंडी, जानवे आणि वस्त्राचे कच्छ पद्धतीने नेसणे याचा त्याग करावा लागत नाही व परत गृहस्थाश्रम स्वीकारता येतो. सुभद्राहरणप्रसंगी अर्जुनाने या प्रकारचा संन्यास घेतला होता.

संन्याशांच्या उपनावाचे दहा प्रकार

आदि शंकराचार्यांनी संन्याशांचे दहा प्रकार प्रस्थापित केले. अरण्य, आश्रम, गिरी, तीर्थ, पर्वत, पुरी, भारती, वन, सरस्वती आणि सागर.

कोणतीही व्यक्ती कुठल्याही आश्रमात किंवा मठात जाऊन एखाद्या गुरूकडून संन्याशाची दीक्षा घेऊ शकत असली, तरी आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार मठांपैकी एखाद्या मठातून घेतलेली दीक्षा ही भारतभर मानली जाते. ते चार मठ आणि त्या मठातून दीक्षा घेतलेल्या संन्याशाचे जोडनाव :

  • शृंगेरी मठ : हा मठ दक्षिण भारतात रामेश्वरम येथे आहे. येथे दीक्षा घेतलेल्या संन्याशाच्या नावानंतर पुरी, भारती किंवा सरस्वती ह्यांपैकी एक उपनाम येते.
  • गोवर्धन मठ : हा मठ ओरिसा राज्यात जगन्नाथपुरी येथे आहे. येथून दीक्षा घेतलेल्या संन्याशाच्या नावाला अरण्य किंवा वन हा शब्द जोडला जातो.
  • शारदा मठ : शारदा (कालिका) मठ गुजरातमध्ये द्वारका गावात आहे. या मठात दीक्षा घेतलेल्या संन्याशाच्या नावाला आश्रम किंवा तीर्थ हे उपनाव लागते.
  • ज्योतिर्मठ : ज्योतिर्मठ हा उत्तराखंड राज्यात बद्रिकेदार येथे आहे. या आश्रमाकडून दीक्षा घेणाऱ्या संन्याशाला गिरी, पर्वत किंवा सागर हे संप्रदायाचे उपनाव मिळते.