संजाण
संजाण (गुजराती: સંજાણ) हे गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील गाव आहे. उमरगाम तालुक्यातील या गावाची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १५,५४४ होती.[१]
इतिहास
इ.स. ६९८च्या सुमारास भारतात आलेल्या पारशांनी या गावात सर्वप्रथम वसाहत केली होती. समुद्रकिनाऱ्यावर उतरल्यावर त्यांनी त्यावेळच्या तेथील राजा जडी राणाकडे तेथे राहण्याची परवानगी मागितली. राजाने उत्तर म्हणून दुधाने काठोकाठ भरलेला पेला पारशांना दिला. पारशांनी त्यात साखर घालून राजास परत केला. याद्वारे राजाने सुचविले होते की त्याच्या राज्यात वस्ती करण्यासाठी जागा नव्हती तर पारशांनी त्यास उत्तर दिले की दुधात जशी साखर विरघळते तसे ते स्थानिक प्रजेत मिळूनमिसळून राहतील आणि त्यात गोडी आणतील.[१] पारशांनी जेथे वस्ती केली त्या ठिकाणास इराणच्या खोरासान प्रांतातील आपल्या मूळ गावाचे नाव दिले.[२] हे गाव आता तुर्कमेनिस्तानमध्ये आहे.
१४८० च्या सुमारास संजाण आणि आसपासचा प्रदेश गुजरातचा बादशहा महमूद बेगड्याने जिंकून घेतला. सोळाव्या शतकाच्या शेवटी पोर्तुगीजांनी हा प्रदेश काबीज केला. मराठ्यांनी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली १७३३-३९ दरम्यान चालविलेल्या मोहीमेत हा भाग मराठा अंमलाखाली आला. त्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात स्पॅनिश आणि फ्रेंच मुस्लिम व्यापारी येउन राहिले. त्यांनी मसाल्याचे पदार्थ येथून युरोपमध्ये निर्यात करण्याचा धंदा चालविला होता. कालांतराने संजाण ब्रिटिश व नंतर स्वतंत्र भारतात समाविष्ट झाले. संजाण पोर्तुगीज वसाहत असलेल्या दमणपासून सर्वात जवळ असलेले भारतातील मोठे व्यापारी केंद्र होते. १९६१ पर्यंत भारत आणि दमणद्वारे पोर्तुगाल आणि युरोपशी होणाऱ्या व्यापारासाठी संजाण हे मोक्याचे स्थान होते.