Jump to content

संग्रामदुर्ग

'चाकणचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे.

चाकणचा भुईकोट किल्ला आजही इतिहासाची साक्ष देतो आहे.

फिरांगोजीने लेकराप्रमाणे मेहेनतीने राखला, सजविलेला चाकणचा संग्रामदुर्ग पोरकाच आणि साडेतीनशे वर्षांंपासून संवर्धनाच्या व जतनाच्या प्रतीक्षेत आहे.

पुण्यापासून २० मैलावर वसलेले चाकण पूर्वीचे खेडेगाव तर सध्याचे वाहन उद्योगाने प्रचंड विस्तारते शहर आहे. चाकणमध्ये दोन्ही पैकी कुठल्याही वेशीतून प्रवेश केल्यानंतर जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावरून चालत आल्यास अवघ्या काही अंतरावर भग्नावस्थेतील तटबंदी दिसू लागते. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या चाकण गावात संग्रामदुर्ग किल्ल्याचा कोट फक्त शिल्लक राहिला आहे.

शिवरायांच्या फक्त एका शब्दाखातर, आदिलशाहीची नोकरी सोडून स्वराज्यात सामील झालेले किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी स्वराज्यात येताना चाकणसारखा अतिशय देखणा आणि मजबूत किल्ला त्यांनी शिवरायांना हसत हसत नजर केला. शिवरायांसारखा रत्नपारखी राजा, त्यांनी ह्या अलौकिक रत्नाला नुसते स्वराज्यात सामीलच करून घेतले नाही तर फिरंगोजींना चाकणची किल्लेदारीपण बहाल केली. स्वराज्यावर एकापेक्षा एक भीषण संकटे येऊनसुद्धा फिरंगोजीनी चाकण आपल्या लेकराप्रमाणे संभाळला, अतिशय मेहेनतीने राखला, सजवला.

शहिस्तेखानाच्या बलाढ्य फौजेला चाकणचा भुईदुर्ग म्हणजे तसे अगदी मातीचे छोटेसे ढेकूळ. तरीही शाहिस्तेखानाच्या अवाढव्य लमाजम्याला हा एक किल्ला घ्यायला तब्बल ५६ दिवस लागले. फार फार उमेदीने आणि प्रचंड सैन्यानिशी हा खान दख्खनेत आला होता, मात्र चाकणच्या किल्ल्याचा एक टवका उडवायला एवढा संघर्ष करावा लागल्याने खान नाराज झाला. या किल्ल्याची सध्याची स्थिती पाहिल्यास काही वर्षानंतर 'इथे एक किल्ला होता' असे सांगावे लागेल, अशी चाकणच्या संग्रामदुर्गाची स्थिती आहे.

शिवशाहीतील एका पराक्रमाचा साक्षीदार असा हा चाकणचा दुर्ग आहे. बादशाह औरंगजेबाचा मामा अमीर उल उमरा शाहिस्तेखान हा मोठ्ठ्या फौजेनिशी स्वराज्यात आला. या भुईकोट दुर्गाला त्याने वेढा घातला. या दुर्गात फिरंगोजी नरसाळा नावाचा किल्लेदार होता. त्याने किल्ला लढवण्याची पूर्ण तयारी केली होती. संग्रामदुर्ग म्हणजे काही खूप भक्कम दुर्ग नव्हे. आधीच तो स्थलदुर्ग; पण खंदकाने वेढलेला. त्यामुळे थोडी बळकटी आलेला. खंदकात पाणीही होते, शिवाय दिवस पावसाचे होते. २१ जून १६६० रोजी किल्ल्याला मुघलांचा वेढा पडला. हा वेढा तब्बल ५६ दिवस चालला. तोफा -बंदुकांचा काही उपयोग होत नाही, हे पाहिल्यावर शाहिस्तेखानाने भुयार खणून सुरूंग ठासण्याची आज्ञा केली. ताबडतोब कामाला सुरुवात झाली. हे भुयार खंदकाखालून खणण्यात येत होते. आतल्या मराठ्यांना जर या भुयाराची कल्पना आली असती,तर कदाचित खंदकातील पाणी त्यात सोडून सुरूंग नाकाम करता आले असते. फिरंगोजी नरसाळ्याने सयाजी थोपटा, मालुजी मोहिता, भिवा दूधावडा, बाळाजी कर्डीला याच्यासह शूर ३०० - ३५० लोकांनीशी चाकण तब्बल ५६ दिवस झुंजवत ठेवला होता. १४ ऑगस्ट १६६० हा दिवस उगवला. मुघलांनी सुरूंगाला बत्ती दिली. पूर्वेच्या कोपऱ्याचा बुरुज अस्मानात उडाला. त्यावरचे भिवा दूधावडासह सव्वाशे मावळेही हवेत उडाले. आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडाराकडे धावले. फिरांगोजीनीही वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली. तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली. दुसऱ्या दिवशी मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मोघली सैन्याने चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला. मावळ्यांचे साहसपर्व कडू घोट घेत संपले.

त्यानंतर संग्राम दुर्गाच्या दुरवस्थेचे सुरू झालेले फेरे अद्यापही कायम आहेत २०१४ च्या फेब्रुवारीपासून या किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. राज्य शासनाने या किल्ल्याच्या जतनाच्या व दुरुस्तीच्या कामास प्रशासकीय मान्यता देत राज्याच्या अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची भरीव मदत जाहीर करून दोन वर्षे लोटली होती तरी दुरुस्तीच्या व संवर्धनाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली नव्हती; त्यामुळे दुर्गप्रेमी आणि चाकणकर नागरिकांमध्ये नाराजी होती. मात्र या ऐतिहासिक किल्ल्याच्या संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष वेगाने सुरुवात झाल्याने किल्ल्याच्या दुरवस्थेचे फेरे आता संपुष्टात येणार असून चाकणच्या संग्रामातील या साक्षीदाराची संवर्धनाची प्रतीक्षा आता संपली आहे. मात्र संपूर्ण किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि तटबंदीसाठी आणखी निधीची गरज असून, हा निधी केंव्हा उपलब्ध होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.