संगोळी रायण्णा
संगोळी रायन्ना ( १५ ऑगस्ट १७९८ - मृत्यू २६ जानेवारी १८३१) हे स्वातंत्र्यपूर्व कित्तूर संस्थानचे सेनापती आणि भारतातील स्वातंत्र्यसेनानी होते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी ब्रिटिशांशी निकराची झुंज दिली.[१][२]
बालपण
त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १७९८ रोजी कित्तूर (कर्नाटक) मधील संगोळी या छोट्या गावात एका कुरुबा (धनगर) कुटुंबात झाला. लहानपणापासूनच संगोळी रायन्ना हे काटक आणि धाडसी होते. याच गुणांचा फायदा त्यांना ब्रिटिशांविरुद्ध लढताना झाला.
कित्तुरचे युद्ध
कित्तूर या राज्याची राणी होती राणी चेन्नम्मा. तिचा विवाह मल्लासर्जा यांच्याशी झाला होतं. त्यांना एक मुलगा होता. परंतु १८२४ मध्ये त्याचे निधन झाले. त्यामुळे राणी चेन्नम्मा ने शिवलिंगप्पा याला दत्तक घेतले आणि गादीवर बसवले. परंतु ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने या दत्तकपुत्राला मान्यता दिली नाही आणि त्याची सिंहासनावरून हकालपट्टी केली. परंतु स्वाभिमानी राणी चेन्नम्मा ने ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारले. हेच ते कित्तुरचे युद्ध. या युद्धात राणी चेन्नम्मा स्वतः घोड्यावर बसून ब्रिटिशांशी लढली. यावेळी राणी चेन्नम्माचा प्रमुख सेनापती होता संगोळी रायन्ना. संगोळी रायन्नानेही पराक्रमाची शर्थ केली. परंतु दुर्दैवाने राणी चेन्नम्माला बेल्लोन्गालच्या किल्ल्यावर पकडण्यात आले. तिचा मृत्यू २१ फेब्रुवारी १८२९ रोजी झाला.
त्यानंतर मात्र संगोळी रायन्नाने गनिमी काव्याने ब्रिटिशांना चांगलीच झुंज दिली. त्याने गोरगरीब, सामान्य प्रजेतून सैन्य उभे केले. त्यांच्या मदतीने सरकारी मालमत्तेवर हल्ले कारणे, ब्रिटिशांचा खजिना लुटणे, जे सावकार आणि जमीनदार गरिबांना लुबाडत होते त्यांचे जमिनीची कागदपत्रे जाळून टाकणे अशा प्रकारे संगोळी रायन्नाने सामान्य जनतेला उठाव करण्यास प्रोत्साहित केले. परंतु फितुरी आणि दगा हे भारतीय समाजावरील कलंक आहेत. अखेर दगा करूनच ब्रिटिशांनी संगोळी रायन्ना यांना पकडले. स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारा एक थोर योद्धा जेरबंद झाला होता. जेव्हा संगोळी रायन्ना यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या तोंडी शब्द होते, “या भूमीवर परत एकदा जन्म घेऊन ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावणे हीच माझी शेवटची इच्छा आहे.” मरण समोर दिसत असूनही आपल्या मातीच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा एकदा जन्म घेण्याची इच्छा बाळगणारे संगोळी रायन्ना खरोखर थोर क्रांतिकारक होते.
समाधी
२६ जानेवारी १८३१ रोजी बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात नंदगड येथे रायान्ना यांना फाशी देण्यात आले. नंदगड येथे रायान्ना नायकाची समाधी आहे.
संगोळी रायन्ना यांच्या कार्यावर चित्रपट
अखेर २६ जानेवारी १८३१ रोजी संगोळी रायन्ना यांचा मृत्यू झाला.कर्नाटक मध्ये मात्र काही प्रमाणात त्यांच्या स्मृती जपण्याचे कार्य सुरू आहे. हुबळी येथे संगोळी रायन्ना यांचा १३ फुटी ब्रांझचा पुतळा आहे. राष्ट्रीय समाज पक्षचे अध्यक्ष महादेव जानकर संगोळी रायन्नाच्या कार्याचा प्रसार करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. संगोळी रायन्ना यांच्या कार्यावर एका चित्रपटचीही निर्मिती करण्यात आली आहे. संगोळी रायन्ना यांचे कार्य फक्त कर्नाटक पुरते मर्यादित न ठेवता त्याला सर्व भारतभर पसरवण्यासाठी संघटीत प्रयत्न करणे गरजेचे आहे.
संदर्भ
- ^ "संगोळी रायन्ना". 2020-02-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-01-25 रोजी पाहिले.
- ^ "मराठी विश्वकोशातील उल्लेख". 2020-09-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-10-03 रोजी पाहिले.