Jump to content

श्रीमान योगी

श्रीमानयोगी ही रणजित देसाई यांनी लिहिलेली मराठी भाषेतील ऐतिहासिक कादंबरी आहे. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे. मेहता पब्लिशिंग हाउसद्वारे ही कादंबरी प्रकाशित करण्यात आली होती.

श्रीमान योगी
लेखकरणजित देसाई
भाषामराठी
देशभारत,महाराष्ट्र
साहित्य प्रकारकादंबरी
प्रकाशन संस्थामेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
चालू आवृत्तीऑगस्ट, २००८
मुखपृष्ठकाररविमुकुल
पृष्ठसंख्या१२००
आय.एस.बी.एन.८१-७७६६-६४०-१

ही कादंबरी वाचकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तकांमध्ये याची गणना होते.[][]

पुस्तकाविषयी

‘स्वामी’नंतर रणजित देसाईंची महत्त्वाकांक्षी कादंबरी म्हणजे ‘श्रीमानयोगी’. स्वामीनंतर तब्बल सात वर्षांनी श्रीमानयोगी वाचकांपुढे सादर झाली.. या पुस्तकाच्या नावातूनच पुस्तकाचा भारदस्तपणा वाचकांच्या मनाला स्पर्श करतो.


शिवाजी महाराजांसारख्या अष्टपैलू, अष्टावधानी युगपुरुषाची व्यक्तिरेखा उभी करणे हे प्रचंड मोठे आव्हानच. कारण शिवचरित्राबाबत इतिहासकारांत जेवढे दुमत आहे तेवढे दुमत असलेले दुसरे चरित्र नाही. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत इतिहासकारांचे दृष्टिकोन वेगळे. अशा अडचणीच्या वाटातून मार्ग काढून ललित वाङ्‌मयाच्या रूपात महाराजांना साकार करण्याचे काम जिकरीचे, त्यातून शिवाजी माहाराजांची ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे. तिचे शेकडो पैलू आहेत. शिवचरित्र हे कलावंतांपुढे कालातीत राहणारे असे आव्हान आहे. मराठी ऐतिहासिक कादंबरीच्या प्रांतात महाराजांना मराठी ललित वाङ्‌मयात वास्तवरूपात प्रथम चित्रित करण्याचे श्रेय निश्चितच रणजित देसाई यांचे आहे.

इतिहास आणि कल्पना याचा मनोरम संगम घडल्यानेच उच्च कोटीची ऐतिहासिक ललितकृती तयार होते. याचे प्रत्यंतर स्वामी मध्ये होतेच. श्रीमानयोगी वाचतानाही महाराजांची जी प्रतिमा नजरेसमोर उभी राहते. त्यातून इतिहास व काल्पनिकता वेगळी काढता येत नाही. ही कादंबरी लिहीताना देसाईंनी शिवाजीराजांबद्दलचा इतिहास, कल्पित दंतकथा, आख्यायिका या साऱ्यांचा वापर केला आहे.

भारताच्या किंबहुना जगाच्या इतिहासाचे अवलोकन केले तर नव्याने राज्य निर्माण करणारे थोर राजे, सेनानी आपणांस आढळतील. त्या प्रत्येक प्रसंगात नेभळट राजास पदच्युत करून आपले राज्य प्रस्थापित केलेले आढळते. येथे निर्मात्याला राज्याची सर्व व्यवस्था, सेना हातात आयती मिळालेली आहे व त्याच्या जोरावर प्रस्थापित राज्य उधळून जेत्याने स्वतःचे राज्य स्थापन केले. महाराजांच्या बाबतीत त्यांनी शुन्यातून सुरुवात केली आहे. चार बलाढ्य सत्तांचे राज्य कोरत महाराजांनी आपले स्वराज्य उभारण्यास सुरुवात केली. या सत्ता बलाढ्य होत्या. राजकारणी, युद्धशास्त्रात पारंगत होत्या. अशा शत्रूंशी अखंड झुंजत महाराजांनी स्वतःचे राज्य निर्माण केले. असे कर्तृत्त्व दाखवणारा दुसरा राजा इतिहासात आढळत नाही.

इथेच महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे अलौकिकत्त्व सिद्ध होते. प्रजाहितदक्ष राजा, थोर सेनानी, मुत्सद्दी, धर्मसहिष्णू या सर्व विशेषणांमधील महाराजांच्या तोडीची दुसरी व्यक्ती आढळत नाही. महाराजांचे राजकीय कर्तृत्व, संघर्ष, वेदना यांचे सुयोग्य प्रकटीकरण ‘श्रीमानयोगी’ मध्ये झालेले आहे. या कादंबरीत महाराजांच्या व्यक्तित्त्वाचा होणारा विकास क्रमाक्रमाने उदात्ततेकडे घडत गेलेला आढळून येतो.

स्वामीप्रमाणेच मराठी मनात अढळ स्थान प्राप्त करणारी ही कादंबरी आहे हे निश्वित.

संदर्भ

  1. ^ "Best MARATHI Books Of ALL TIME (62 books)". www.goodreads.com. 2022-01-13 रोजी पाहिले.
  2. ^ "11 Best Marathi Books Of All Time - Must Reads | Cart91". www.cart91.com (इंग्रजी भाषेत). 2021-12-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-13 रोजी पाहिले.