Jump to content

श्रीनाथ कलबाग


डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग
जन्म नाव डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग
जन्म २३ ऑक्टोबर १९२८
मुंबई (महाराष्ट्र)
मृत्यू ३० जुलै, इ.स.२००७
राष्ट्रीयत्व भारतीय
वडील शेषगिरी कलबाग
पत्नी मीरा श्रीनाथ कलबाग


विज्ञान आश्रमाचे संस्थापक डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९२८ रोजी दसऱ्याच्या दिवशी झाला. त्यांच्या वडिलांचे पॉप्युलर फार्मसी नावाचे मुंबईत दुकान होते. श्रीनाथ यांचा शाळेत असल्यापासूनच विज्ञानाकडे त्यांचा कल होता. घरी ते विविध प्रयेाग करत. उदा. साबण तयार करणे, रसायने वापरून कपडे ब्लीचिंग करणे, कागदावर छपाई इत्यादी.

त्यांनी शालेय शिक्षण मुंबईतील रॉबर्ट मनी शाळेतून झाले. तर बी.एस्‌सी. ही पदवी मुंबईच्या रॉयल इन्स्टिटयूट ऑफ सायन्स येथून मिळवली आणि एम.एस्‌सी.(टेक.) ही पदवी मुंबईतल्याच UDCT (University Institute of Chemical Technology)मधून १९५२मध्ये मिळवली. १९५३ साली अमेरिकेतील शिकागो येथील (Ilinois University)मध्ये त्यांनी खाद्य तंत्रज्ञानातील (Food Technology)मधील Ph.D. (विद्यावाचस्पती) अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. प्रा.कुमाराओ यांनी त्यांना मार्गदर्शन केले. अमेरिकेतील २ वर्षाच्या वास्तव्यात डॉ. कलबाग जवळपासच्या ग्रामीण भागांत फिरत होते व तेथील लोकांचे विशेषतः शेतकऱ्यांच्या जीवनाचे निरीक्षण करत होते. त्यांच्या लक्षात आले की तेथील शेतकरी केवळ शेतीतच नव्हे तर रोजच्या जीवनात पण विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. त्यांच्या या निरीक्षणातच भविष्यातील पाबळ येथील विज्ञान आश्रमाच्या स्थापनेची मुळे दडलेली आहेत.

महाविद्यालयामध्ये असतांना त्यांनी पारले कंपनीच्या कामगारांना त्यांचे अधिकार व कर्तव्यांची जाणीव करून देण्यासाठी साक्षरता वर्ग चालवले.

डॉक्टरचा दर्जा मिळवल्यावर त्यांच्या प्राध्यापकांनी त्यांना अमेरिकेतील एका नामवंत कंपनीत संशोधक पदावर काम करण्याचे सुचवले. परंतु श्रीनाथ कलबागांनी भारतात परतण्याचा निश्चय केला. भारतात आल्यावर १९५५ साली ते Central Food Technological Research Institute (CFTRI) या म्हैसूर येथील संस्थेत सहाय्यक वैज्ञानिक संशोधक अधिकारी म्हणून रुजू झाले. त्या ठिकाणी त्यांनी १९६३पर्यत काम केले. त्यानंतर ते हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड या कंपनीच्या संशोधक विभागात अभियांत्रिकी शास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम करू लागले. त्यावेळी मुलाखतीच्या वेळीच त्यांनी आपण वयाची २६ वर्षे शिक्षणासाठी म्हणजे ब्रम्हचारी आश्रमासाठी दिली. तशी पुढील २६ वर्ष गॄहस्थाश्रमात घालवणार व त्यानंतरची वर्षे वानप्रस्थाश्रम म्हणजे ग्रामीण भागात जाऊन काम करण्यात व्यतीत करणार असे सांगितले होते. त्या निश्चयाप्रमाणे १९८२ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवॄत्ती घेतली.


संकल्पनेचा उगम

मुंबईतील डॉ.व्ही.जी. कुलकर्णी व पुण्यातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डाॅ. जे.पी.नाईक यांच्याबरोबर त्यांनी शिक्षणातील प्रश्नांविषयी चर्चा केली. मुंबईत फिरतांना त्यांनी कुठलेही शालेय शिक्षण न घेतलेली बरीचशी मुले आयुष्यात यशस्वी झालेली पाहिली होती. त्यांच्या व्यवसायाला आवश्यक असलेली कौशल्ये ही मुले कशी आत्मसात करतात याचा त्यांनी अभ्यास केला. ही सर्व जण 'शिकण्याच्या नैसर्गिक पद्धतीने' म्हणजेच 'काम करत करत शिकतात'. शिकण्याची ही पद्धत इतकी परिणामकारक आहे की आपण ज्यांना अभ्यासात ‘ढ’ म्हणतो त्यांनासुद्धा ती प्रभावीपणे शिकवू शकते. खरे म्हणजे जर १०वी पर्यंत गळती होणाऱ्या ९०टक्के मुलांना ही पद्धत उपयोगी असेल तर हीच शिक्षणाची खरी पद्धत असली पाहिजे हे डॉ. कलबागांच्या लक्षात आले. यापूर्वी पण महात्मा गांधी यांनी ‘नयी तालीम’ मध्ये ‘हाताने काम करत करत शिकणे’ या पद्धतीचा पुरस्कार केला होता. मात्र नयी तालीम म्हणजे तंत्रज्ञान, विज्ञान व आधुनिकीकरणाला विरोध असा भ्रम सर्वसामान्यांचा झाला होता. त्यामुळे या कल्पनांवर स्वतंत्रपणे काम करून त्याला विज्ञान व तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक होते. या सर्व विचार मंथनातून विज्ञान आश्रमाची स्थापना झाली. जे.पी. नाईक व डॉ. चित्रा नाईक यांच्या सहकार्याने पुण्यातील ‘भारतीय शिक्षण संस्थेचा’ एक स्वतंत्र स्वायत्त विभाग म्हणून विज्ञान आश्रमाचे काम सुरू झाले. जे.पी.नाइकांनी त्यांच्या परिचयातील ४-५ गावांची नावे डॉ. कलबागांना सुचवली. त्यापैकी पाबळ हे गाव दुष्काळी होते, तसेच शहरापासून व हमरस्त्यापासून दूर होते. खेड्यात असणारे सर्व प्रश्न इथे हजर होते. अशा परिस्थितीत जर आपण शिक्षणाचा प्रयोग यशस्वी केला तर तो भारतातील सर्व गावांमध्ये राबवता येईल, असे कलबाग यांना वाटले. पाबळमधील ऑईल मिलमध्ये विज्ञान आश्रमाचे काम सुरू झाले. त्यानंतर गावाने व शासनाने गावाजवळील ५ एकर जागा या प्रयोगाला दिली. त्याठिकाणीच आज विज्ञान आश्रम उभा आहे.

सुरुवातील गावकऱ्यांबरोबर राहून डॉ. कलबागांनी त्यांच्या गरजा व विकासाच्या संकल्पना यांचा जवळून अभ्यास केला. त्यातून ‘ग्रामीण तंत्रज्ञान’ हा अभ्यासक्रम तयार झाला. या अभ्यासक्रमाची डॉ. कलबागांनी विकसित केलेली तत्त्वे पुढील प्रमाणे :

  1. विद्यार्थांना परिणामकारक पद्धतीने शिकवण्यासाठी ‘हाताने काम करत करत शिकवणे’. थोडक्यात कामाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध संकल्पना, विज्ञान, भाषा व गणित शिकवणे.
  2. विद्यार्थ्यांना ‘बहुविध कौशल्यांचे शिक्षण’ देणे, ज्याद्वारे त्यांच्या बुद्धिमत्तेला विविध पैलू पडतील.
  3. विद्यार्थ्यांनी लोकउपयोगी कामे करावीत. विद्यार्थ्यांनी विविध सेवा समाजाला पुरवाव्यात. त्या सेवांचा मोबदला गावाने शाळेला द्यावा, ज्याद्वारे गावाला सेवा मिळतील व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल.
  4. शिक्षकाने पण उद्योजक असावे. शिक्षकाकडे प्रत्यक्ष करून दाखवता येतील, अशी कौशल्ये असावीत. लोकोपयोगी सेवांमधील उत्पन्नाचा वाटा शिक्षकाला मिळावा.
  5. शाळा हे गावामध्ये समुचित तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासाठीचे केंद्र व्हावे. समाजातील तांत्रिक समस्या राष्ट्रीय पातळीवरील संशोधन संस्थेपर्यंत पोहचवण्याचे शाळा हे माध्यम असावे.
  6. विद्यार्थ्यांमार्फत शाळेच्या दैनंदिनीचा भाग म्हणून विविध माहितीच्या नोंदी ठेवल्या जाव्यात व त्यांचा उपयोग नियोजनासाठी व्हावा.

समाजाभिमुख अभिनव शिक्षण पद्धती

‘शिक्षणातून गावातील विकास व विकास कामांमधून शिक्षण’ हे डॉ. कलबागांच्या शिक्षण संकल्पनेचे ब्रीद होय. डॉ. कलबांगाच्या प्रयोगाचे यश लगेचच दिसू लागले. ग्रामीण तंत्रज्ञान अभ्यासक्रम पूर्ण झालेली शेकडो विद्यार्थी आज स्वतःचे व्यवसाय करत आहेत. गावातील गरजा व समस्या ओळखून त्यावर उपाय शोधण्यासाठी स्वतःच प्रयत्न करायचे हा पण विज्ञान आश्रम संकल्पनेचा एक भाग आहे. त्यातून पाबळमधील आश्रमाला भेडसावणाऱ्या समस्यांना उत्तर म्हणून विविध तंत्रज्ञान विषयक प्रकल्प आश्रमाच्या विद्यार्थ्यांनीं तयार केले. पाबळ जिओडेसिक डोम ही कमी खर्चातील घरे, भूगर्भातील पाणी शोधण्यासाठी पाणी तपासण्याचे यंत्र, बैलाला वर्षभर पुरेल एवढा चारा उपलब्ध नाही म्हणून छोटया शेतीसाठी कमी अश्वशक्तीचा ‘मेक बुल’ ट्रॅक्टर असे कितीतरी प्रकल्प डॉ. कलबागंच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले. आश्रमाच्याच विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानावर आधारित उद्योग सुरू केले व त्या तंत्रज्ञानात सुधारणाही केली. लातूरच्या भूकंपाच्या वेळी गुबाळ हे गाव पाबळ डोम वापरून पुनर्वसित करण्यात आले. गुजरातचा भूकंप, आंध्र प्रदेशातील चक्रीवादळग्रस्त भागातही पुनर्वसनासाठी पाबळ डोम वापरले गेले आहेत. पाणी शोधण्याच्या यंत्राचा वापर करून हजारो विंधन विहिरींचे शोध आश्रमाने केले.

आधुनिकतेची कास

१९९० च्या सुमारास आश्रमात पहिल्यांदा संगणक आला. १९९८मध्ये मल्टिमीडिया तंत्रज्ञानाचा वापर करून मराठीतून ‘कॉम्प्युटर धडे’ बनवायला डॉ.कलबागांनी सुरुवात केली. अशा प्रकारचे धडे शिक्षकांना सहजपणे बनवता यावेत म्हणून डॉ. कलबागांनी, रिचर्ड पाईप यांच्या सहकार्याने ‘रियालिटी लर्निंग इंजिन’ या सॉफ़्टवेअरची निर्मिती केली. डॉ. कलबाग नेहमी म्हणत, 'विज्ञान आश्रमाचे महत्त्वाचे संशोधन म्हणजे ‘आमची शिक्षणपद्धती'. आश्रमातील इतर शोध व तयार झालेले उद्योजक व ग्राम विकासाची कामे ही तर त्या शिक्षण पद्धतीची फळे आहेत.'भारत सरकारच्या ‘डिपार्टमेंट ऑफ सायन्स आणि टेक्नॉलॉजी’ विभाग, कपार्ट (Council for Advancement of People's Action and Rural Technology - CAPART), हिंदुस्थान लिव्हर, टाटा ट्रस्ट अशा अनेक संस्थांनी आश्रमाची कल्पना विकसित होण्यासाठी अर्थसहाय्य केले.

शासनाची मान्यता

पाबळमध्ये ‘विज्ञान आश्रम’ ही शिक्षणाची प्रयोगशाळा आहे. प्रत्येक गावापर्यंत ही शिक्षणसंकल्पना न्यायची असेल तर औपचारिक शिक्षण पद्धतीतच बदल व्हायला हवा हे डॉ. कलबाग ओळखून होते. १९८७ पासून पाबळ मधील ‘श्री भैरवनाथ विद्या मंदिर, पाबळ’ या शाळेत इ.८ वी ते १० वी साठी ‘ग्रामीण तंत्रज्ञान’ हा अभ्यासक्रम सुरू केला गेला. पुढील वर्षी तो जवळच्या तीन शाळांमध्ये राबवला गेला. शासनाची परवानगी घेऊन या प्रयोगाचे मूल्यमापन केले गेले आणि मग ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यास समितीने या विषयाला शासनमान्य विषय म्हणून मान्यता दिली. अभ्यास समितीने या विषयाची उपयुक्तता ग्रामीण विद्यार्थ्यांप्रमाणे शहरी भागालाही आहे म्हणून या विषयाचे नाव ‘मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख’ (Introduction to Basic Technology) (IBT)असे ठेवले. अभ्यासक्रमातील पहिला पूर्वव्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून याला V1 हा सांकेतिक क्रमांक मिळालेला आहे.

शाळेचे सध्याचे स्वरूप, पुस्तकी अभ्यासाला महत्त्व, शिक्षकांचा कार्यभार, तासिका इ. तांत्रिक बाबी यांचा तसेच अभ्यासक्रमातील शैक्षणिक उद्दिष्टे यांचा बारकाईइने अभ्यास करत डॉ. कलबागांनी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (national eligibility entrance test (NEET))ची आखणी केली. त्यासाठीची पुस्तके, दूरचित्रवाणी, सीडी तयार केल्या. डॉ.कलबागंच्या निधनापर्यंत २३ शाळांमध्ये नीट राबवला गेला. या कल्पनेचे सर्वत्रीकरण व्हावे यासाठी डॉ. कलबाग नेहमी आग्रही राहीले होते.

तज्ञांकडून तांत्रिक समस्यांना उत्तरे मिळण्यासाठी इंटरनेटचा उपयोग होऊ शकेल हे डॉ. कलबागांनी ओळखले. पाबळमध्ये इंटरनेट देण्यास कुठलीही कंपनी तयार नसल्याने डॉ.कलबागांनी आय.आय.टी(IIT) चेन्नईच्या सहकार्याने पाबळ व जवळपासच्या गावांना वायरलेसच्या तंत्रज्ञाने आंतरजालाची सेवा सुरू केली. इंटरनेटच्या व संगणकाच्या सaहाय्याने गावांना विविध सेवा देण्याचा विचार त्यांनी केला. ज्या काळात विज्ञान म्हणजे प्रयोगशाळेत करण्याचा गहन विषय अशी धारणा होती. त्या काळात डॉ. कलबागंनी 'कार्यकेंद्री शिक्षण पद्धती' किती परिणामकारक असते हे नापास विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सिद्ध केले. त्याचबरोबर ही शिक्षण पद्धती कशा प्रकारे आजच्या शिक्षणात राबवता येईल हे प्रत्यक्ष राबवून दाखवले. त्या कार्यक्रमाला शासनाची विषय म्हणून मान्यता पण मिळवली.

डॉ. कलबागांनी विविध शिक्षण समित्यांवर सदस्य म्हणून काम केले. भारत सरकारने ‘कम्युनिटी पॉलिटेक्निक’साठी नेमलेल्या ‘कलबाग समिती चे’ ते अध्यक्ष होते. त्यांनी ‘कम्युनिटी पॉलिटेक्निक'च्या माध्यमातून शिक्षण व विकास ही कल्पना कशी राबवता येईल याची संपूर्ण योजना त्यात मांडली .हा अहवाल भारताच्या संसदेसमोर ठेवला गेला व शिफारशी स्विकारल्या गेल्या.

ग्रामीण तंत्रज्ञानाचा अर्थ कमी खर्चातील, कमी दर्जाचे असे तंत्रज्ञान असा नव्हे. उलट ग्रामीण भागाचा वेगाचा विकास करायचा असेल तर आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञान आवश्यक आहे. असे तंत्रज्ञान कमी खर्चात कसे उपलब्ध करायचे याचा विचार करावा. मात्र तंत्रज्ञानाची निवड सर्वोत्तम असावी असा डॉ.कलबागांचा आग्रह होता. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT)च्या सहकार्याने विकसित झालेल्या फॅब लॅब संकल्पनेत डॉ. कलबागांचा मोलाचा सहभाग होता. लोकांना त्यांच्या दैनंदिन समस्यांवर उत्तर शोधता यावे यासाठी तंत्रज्ञान विकासाची सोय उपलब्ध करून द्यावी, त्यायोगे विद्यार्थी, शेतकरी, युवक इत्यादी कोणाही कल्पक व्यक्तीला मनातील कल्पना प्रत्यक्षात आणता यावी, यासाठी अत्याधुनिक मशिने असलेली अमेरिकेबाहेरील पहिली फॅब लॅब पाबळ येथे सुरू झाली. आज अनेक देशात फॅब लॅबची कल्पना स्वीकारली जात आहे.

डॉ. कलबागांच्या कार्याचा समाजाने नातू फाऊंडेशन, जमनालाल बजाज आदी अनेक पुरस्कार व सन्मान देऊन गौरव केला. डॉ.कलबागांच्या पत्नी मीरा कलबाग यांनी पण त्यांना बरोबरीने साथ दिली. विशेषतः महिलांच्या उपक्रमांत त्यांनी पुढाकार घेतला. डॉ. कलबागांचे ३० जुलै २००३ साली वयाच्या ७५ व्या वर्षी आश्रमातच निधन झाले. आज विज्ञान आश्रमाचा कार्यक्रम महाराष्ट्राबाहेरही राबवण्यासाठी अनेक संस्था पुढे येत आहेत. शासकीय पातळीवर ही या कल्पना स्विकारल्या जात आहे. शिक्षण ‘कार्यकेंद्री’ करण्यासाठी देशभरांत जे महत्त्वाचे प्रयेाग झाले त्यांत विज्ञान आश्रमाचा प्रयोग नक्कीच अद्वितीय आहे. ‘शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण विकास’ या कल्पनेच्या विकास व प्रसाराच्या कार्यासाठी डॉ. कलबाग नेहमीच स्मरणात राहतील.