Jump to content

श्रीधरस्वामी नाझरेकर

श्रीधरकवी ब्रह्मानंद नाझरेकर (जन्म : इ.स. १६५८ च्या आसपासचा; - इ.स. १७३०) हे इ.स.१७ व्या शतकातील एक प्रसिद्ध आख्यानकवी होते. पंढरपूराहून ५० किलोमीटर अंतरावर असलेले नाझरे हे त्यांचे मूळ गाव होय. हे काशीच्या आनंद संप्रदायातले आठवे वंशज होत. यांचे घराणे मोगलाईतील खडकी येथील असल्याने त्यांचे आडनाव खडके होते. पुढे यांच्या घराण्यातील एक पुरुष घोडदळात अधिकारी बनल्याने त्यानी घोडके आडनाव घेतले. त्यानंतर राघोपंत नाझरे महालाचे कुलकर्णी झाल्यावर त्यांनी नाझरेकर आडनाव घेतले. श्रीधरांचे वडिलांचे नाव ब्रम्हानंद आणि आईचे नाव सावित्री होते. श्रीधर हे इ.स. १६७८मध्ये आपल्या वडिलांसोबत पंढरपूर क्षेत्री आले. येथेच त्यांचे पुराणे, पंचकाव्ये, रामायण, भागवत आदी ग्रंथाचे अध्ययन झाले व संतकवींची कविताही त्यांनी वाचली. वडिलांकडून अनुग्रह घेतल्यानंतर स्वामींनी आनंद संप्रदायाच्या प्रसाराचे कार्य सुरू केले. याच काळात त्यांनी एकूण ५८ हजारावर ओळींचे ११हून अधिक काव्यग्रंथ रचले.

संतकवी श्रीधरस्वामी हे मराठी काव्याच्या महोदय पर्वातील, सुवर्णकाळातील एक अग्रणी कवी होते. छत्रपती शाहूमहाराजांनी सातारा दरबारात त्यांचा मोठा सन्मान करून त्यांना एक गाव इनाम दिले होते. श्रीधरांचे घराणे योगी व पुराणिकांचे होते. समकालीन व उत्तरकालीन साधुसंतांनी श्रीधरांची अपार थोरवी गायलेली आहे. "श्रीधरांची अफाट लोकप्रियता सर्वांनाच थक्क करणारी आहे" अशा शब्दात महाराष्ट्र सारस्वतकार वि.ल. भावे यांनी श्रीधर यांचा गौरव केलेला आहे.

श्रीधरस्वामी नाझरेकरांनी लिहिलेल्या शिवलीलामृत या ग्रंथाला २३ फेब्रुवारी २०१९ रोजी ३०० वर्षे झाली. काशी विश्वेश्वराच्या देवळात बसून त्यांनी हा ग्रंथ लिहिला. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील शिवभक्त या ग्रंथाची पारायणे करतात. शिवलीलामृतात १४ अध्याय असून एकूण २४५० ओव्या आहेत. सोवळ्याविना वाचता येईल असा, या ग्रंथाचा कोणताही विशिष्ट अध्याय वाचण्याचे बंधन नाही. शिवलीलामृताची भारतातील अनेक भाषांत भाषांतरे झाली आहेत. या ग्रंथाची अनेक प्राचीन हस्तलिखिते करण्यात आली होती. यातील काही नमुने भारत इतिहास संशोधक मंडळात आहेत. भारतामध्ये छापखाना सुरू झाल्यानंतर म्हणजेच अंदाजे १८९२ सालापासून हा ग्रंथ छापील स्वरूपात मिळू लागला. शिवलीलामृतातील अकराव्या अध्यायाचे भारतभर मोठ्या प्रमाणात पठण केले जाते. . चिंतामणी नीळकंठ जोशी हे मराठी भाषेत लिहिलेल्या या ग्रंथाचे आणि श्रीधरस्वामी यांच्याविषयीच्या इतिहासाचे अभ्यासक आहेत.

श्रीधरस्वामींचे शेवटचे वास्तव्य पंढरपुरात विठ्ठलाच्या मंदिराजवळ असलेल्या घरात होते. त्याच घरात सध्या (२०१९ साली) त्यांची नववी पिढी राहते आहे. त्यांच्याकडे श्रीधरस्वामींच्या हस्ताक्षरातील शिवलीलामृत आणि मल्हारी माहात्म्य या पोथ्या आजही (२०१९ साली) जपून ठेवलेल्या आहेत.

श्रीधरस्वामी नाझरेकरांनी लिहिलेले काही ग्रंथ

  • अंबिका उदय
  • पांडवप्रताप
  • पांडुरंग माहात्म्य
  • मल्हारी माहात्म्य
  • रामविजय
  • व्यंकटेश माहात्म्य
  • शिवलीलामृत
  • हरिविजय
  • ज्ञानेश्वर चरित्र


नाझरेकरांविषयीची पुस्तके

  • (श्रीरामविजय, पांडवप्रताप, हरिविजय आणि शिवलीलामृत कर्ते) संतकवी श्रीधर स्वामी नाझरेकर (चरित्र, विद्याधर मा. ताठे)