श्रीकृष्ण नारायण रातंजनकर
पंडित श्रीकृष्ण नारायण रातंजनकर (जानेवारी १ १९०० - फेब्रुवारी १४, १९७४) ऊर्फ अण्णासाहेब रातांजनकर हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक, संगीत गुरू व आग्रा घराण्याचे गायक होते. विष्णू नारायण भातखंडे व बडोदा संस्थानाचे उस्ताद फैय्याज खान यांचे ते अग्रतम शिष्य होत. त्यांनी लखनौच्या भातखंडे म्युझिक इन्स्टिट्यूट (भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालय)चे मुख्याध्यापकपद कैक वर्षे भूषविले व संगीत क्षेत्रातील अनेक नामी मंडळींना संगीत शिक्षण दिले.
पूर्वायुष्य
त्यांचे वडील श्री नारायण गोविंद रातंजनकर हे ब्रिटिश राजवटीत पोलीस अधिकारी होते, तसेच उत्तम सतारवादकही होते. वयाच्या सातव्या वर्षी श्रीकृष्ण नारायण रातंजनकरांनी कारवारच्या पं. कृष्णम् भट्ट (कृष्णभट्ट होनावर) यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. त्यांना ग्वाल्हेर घराण्याचे पं.अनंत मनोहर जोशी व नंतर आग्रा घराण्याचे उस्ताद फैय्याज खान यांचेही मार्गदर्शन लाभले. किशोर वयातच त्यांनी अनेक संगीत परिषदांना आपली उपस्थिती लावली. इ.स. १९११ मध्ये त्यांनी गायक व संगीतज्ञ पं. विष्णू नारायण भातखंडे यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली व आजमितीला ते भातखंडेबुवांचे सर्वात ख्यातनाम शिष्य मानले जातात. इ.स. १९२६ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.
सांगीतिक कारकीर्द
पं.रातंजनकर हे अनेक वर्षे लखनौ येथील भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. (या संस्थेचे आधीचे नाव मॉरिस म्युझिक कॉलेज असे होते.) नंतर त्यांची मध्य प्रदेशातील खैरागढ(हे आता छ्त्तीसगड राज्यात आहे) येथील इंदिरा संगीत कला विश्व विद्यालयाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली. तिथून त्यांना पुन्हा भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी २ वर्षांसाठी आमंत्रित केले गेले. मुंबईच्या भारतीय विद्या भवनाच्यी ’भातखंडे संगीत आणि नर्तन विद्यापीठा’ची स्थापना रातंजनकरांनी केली.तसेच शीव(मुंबई) येथील ’श्रीवल्लभ संगीतालय’ त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आकारास आले.
त्यांच्या शिष्यवर्गात के.जी. गिंडे, चिदानंद नगरकर, व्ही.जी. जोग, दिनकर कैकिणी, शन्नो खुराणा, सुमती मुटाटकर, आचार्य प्रभाकर चिंचोरे, सी.आर. व्यास, पं.एस.सी.आर.भट्ट, चिन्मय लाहिरी व संगीत दिग्दर्शक रोशनलाल यांचा समावेश होतो.
त्यांनी आग्रा घराण्याच्या ध्रुपद व ख्याल शैलीतील अनेक रचना गायल्या. आपले उस्ताद भातखंडेबुवा यांप्रमाणेच त्यांनी ८०० पेक्षा जास्त चिजा रचल्या. या चिजा त्यांनी 'सुजन' या टोपणनावाने बांधल्या होत्या. त्यांचे शिष्य के.जी. गिंडे यांनी त्या चिजांची पद्धतशीरपणे कागदोपत्री नोंद करून ठेवली आहे.
त्यांनी अभिनव गीतमंजरी, अभिनव संगीत शिक्षा, तानसंग्रह, हिंदुस्थानी संगीताची स्वरलिपी, यांसारखी अनेक पुस्तकेही लिहिली.
तसेच रजनी कल्याण, केदार बहार, सावनी केदार, मार्ग बिहाग, यमनी बिलावल, सालग वराळी, गोपिका वसंत, हंसरंजनी अशा नव्या रागांचीही रचना पंडित रातंजनकरांनी केली.
पुरस्कार
इ.स. १९५७मध्ये पं.रातंजनकरांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरविले. इ.स. १९६३मध्ये संगीत नाटक अकादमीने त्यांच्या संगीत विश्वातील योगदान व जीवनकार्याबद्दल त्यांना संगीत नाटक अकादमी फेलोशिप देऊन सन्मानित केले.
मृत्यू
वयाच्या ७४ व्या वर्षी, इ.स. १९७४मध्ये श्री.ना. रातंजनकर यांचे देहावसान झाले.
बाह्य दुवे
- श्रीकृष्ण ना. रातंजनकर 'सुजन' (१९०० - १९७४) तीन ध्वनिफिती
- पं. रातंजनकरांच्या ध्वनिमुद्रिकांची यादी Archived 2010-11-09 at the Wayback Machine.
- श्रीकृष्ण ना. रातंजनकर यांचे चरित्र Archived 2011-06-28 at the Wayback Machine.