श्रावण
A month in Hindu calender | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | masa, calendar month | ||
---|---|---|---|
उपवर्ग | month of the Tamil calendar, month of the Gujarati calendar | ||
मागील. | |||
पुढील | |||
पासून वेगळे आहे |
| ||
| |||
श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे.[१]
खगोलीय महत्व
भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेतला श्रावण महिना हा जुलैच्या उत्तरार्धात पौर्णिमेपासून सुरू होतो आणि ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात पुढील पौर्णिमेच्या दिवशी संपतो. तमिळ कॅलेंडरमध्ये तो अवनी म्हणून ओळखला जातो आणि सौर वर्षाचा पाचवा महिना असतो. चंद्र धार्मिक कॅलेंडरमध्ये श्रावण हा अमावस्येपासून सुरू होतो आणि तो वर्षाचा पाचवा महिना असतो. श्राबोन (बंगाली: শ্রাবণ; श्रवण देखील म्हणतात) हा सौर बंगाली कॅलेंडरचा चौथा महिना आहे. तसेच नेपाळी कॅलेंडरचा चौथा महिना असतो. श्रावण हा वर्षा ऋतुचा(पावसाळ्याचा) दुसरा महिना असतो.
अधिक श्रावण
साधारणतः ८ किंवा ११ आणि क्वचित १९ वर्षांनी अधिक श्रावण य[२]ेतो. त्या महिन्यात येणाऱ्या शुक्ल किंवा वद्य या दोन्ही एकादश्यांना कमला एकादशी हे नाव आहे. उत्तर हिंदुस्थानात या एकादश्यांना अनुक्रमे पद्मिनी आणि परम एकादशी म्हणतात. एकादश्या वगळल्या तर अधिक श्रावणात कोणतेही हिंदू सण किंवा व्रताचे दिवस येत नाहीत. ज्यावर्षी अधिक श्रावण असतो त्यावर्षी पाच महिन्यांचा चातुर्मास असतो. चातुर्मासात लग्ने होत नसल्याने ती अधिक श्रावणातही होत नाहीत.
अधिक श्रावण असलेली गेली आणि येणारी काही वर्षे : इसवी सन १९०१, १९०९, १९२०, १९२८, १९३९, १९४७, १९५८, १९६६, १९७७, १९८५, २००४ आणि २०२३, २०४२, २०६१...वगैरे.
सणांचा राजा
श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा/सणांचा राजा म्हणले जाते.[३] श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्याना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू आणि जैनधर्मीयांची परंपरा आहे. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.[३] संपूर्ण भारतीय उपखंडासाठी श्रावण महिना खूप महत्त्वाचा आहे कारण तो नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी जोडलेला आहे.
श्रावण महिन्यातील सण
- श्रावण शुद्ध पंचमी-
मुख्य पान : नागपंचमी
या दिवशी नागांची पूजा करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत प्रचलित आहे.[४]
- श्रावण शुक्ल त्रयोदशी - नरहरी सोनार जयंती.
- श्रावण पौर्णिमा- रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा.
नारळी पौर्णिमा' हा सण हिंदू महिन्यांपैकी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.[६]
या दिवशी समुद्रकिनारी राहणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी मासेमारी करणारे महाराष्ट्रातले कोळी व समुद्राशी निगडित असलेल्या व्यवसायांतील इतर लोक समुद्राची पूजा करून त्यास नारळ अर्पण करतात.[७] पावसाळ्यात बंद असलेले मासे पकडणे या दिवसापासून परत सुरू होते. ज्या कुटुंबात रोजच्या खाण्यात नारळ नसतो, त्याही मराठी घरांमधून या दिवशी नारळीभात, नारळाच्या वड्या यांसारखे नारळापासून बनलेले खाद्य पदार्थ बनवतात.
याच दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते त्यावरून या पौर्णिमेला राखी पौर्णिमा असे म्हणतात.[८] ही पौर्णिमा पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते, कारण या दिवशी सुताची पोवती करून ती विष्णू, शिव, सूर्य इत्यादी देवतांना अर्पण करतात व मग कुटुंबातील स्त्री-पुरुष ती पोवती हातात बांधतात.
याच दिवशी श्रवण नक्षत्र असल्याने ब्राह्मण पुरुष उपाकर्म करून नवीन यज्ञोपवीत धारण करतात. या विधीला श्रावणी असे नाव आहे.[९]
श्रावणी ही श्रावण पौर्णिमेलाच करतात असे नाही, श्रावणी हस्त नक्षत्रात चंद्र असताना 'श्रावण शुक्ल पंचमी'लाही असू शकते. पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्यास श्रावण पौर्णिमेला श्रावणी नक्कीच करत नाहीत. ऋग्वेद्यांची श्रावणी, यजुर्वेद्यांची श्रावणी, तैत्तिरीय शाखा व तिच्या अंतर्गत येणाऱ्या हिरण्यकेशी उपशाखेच्या ब्राह्मणांची श्रावणी या वेगवेगळ्या दिवशी असू शकतात.
श्रावण महिन्यात लागोपाठच्या दोन दिवशी पौर्णिमा असेल, तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा असते. राखी पौर्णिमेच्या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्याच्या चंपावत जिह्यातल्या देईपुरी इलाख्यात बरही देवीला खुश करण्यासाठी गावातल्या दोन गटांत एकमेकांवर दगडफेक होते. दगडफेकीत अनेकजण घायाळ होतात. २०१९ साली १२० लोक जखमी झाले होते. मात्र हायकोर्टाने दगडफेकीवर बंदी आणल्याने काही लोकांनी दगडांऐवजी सफरचंदे फेकून मारली.
- श्रावण वद्य प्रतिपदा (मध्य प्रदेशातील भाद्रपद वद्य प्रतिपदा) : भुज(जा)रिया पर्व. राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी भुजरिया पर्व असते. भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील खेड्यांमध्ये हे धूमधडाक्यात साजरे होते.[१०] भुजरिया पर्वाची तयारी नागपंचमीपासून होते. या दिवशी घरांघरांत टोपल्यांमध्ये किंवा मातीच्या छोट्या कुंड्यांमध्ये माती भरून घरातले गव्हाचे बी पेरतात. अंकुर फुटल्यावर ती रोपे राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी उपटून नदीच्या पाण्यात बुचकळून धुतात आणि एकमेकांना वाटतात. रोपांना कजलिया म्हणतात. गावातील वृद्ध माणसे कजलिया पाहून एक प्रकारे मातीचे आणि बियांचे परीक्षण करतात, व रोपे आणणाऱ्या मुलांना खाऊ देतात.
या निमित्ताने गावातले स्त्री-पुरुष टिमकी, ढोलक, झांजा, यांच्या तालावर नाचतात. स्त्रिया मंगलगीते गात गात नदीवर, जलाशयांवर जाऊन भुजारियांचे विसर्जन करतात.
- श्रावण वद्य अष्टमी- श्रीकृष्ण जयंती/'कृष्ण जन्माष्टमी'
श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी असे म्हणतात, कारण या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला.[११] या दिवशी भाविक स्त्रीपुरुष उपवास करतात व कृष्ण जन्माचा सोहळा करतात. श्रावण वद्य नवमी या दिवशी बालगोपाल गोपाळकाला किंवा दहीहंडी साजरी करतात.[१२]
- पिठोरी अमावास्या/दर्भग्रहणी अमावास्या/ पोळा
श्रावण महिन्यातील अमावास्येला पिठोरी अमावास्या असे नाव आहे. संततीच्या प्राप्तीसाठी सौभाग्यवती स्त्रिया पिठोरी व्रत करतात.[१३] याच दिवशी काही ठिकाणी शेतकरी पोळा नावाचा सण साजरा करतात.[१४]हा सण बैलांसंबंधी असून, या दिवशी बैलांना शृंगारून त्यांची मिरवणूक काढतात.[१५]
व्रते
व्रत म्हणजे व्रतवैकल्ये! वैकल्यांचा अर्थ विकलता ! म्हणजे बारीक होणे. स्वार्थ व परमार्थ साधणारे हे व्रत आहे.[१६]
सोमवार- श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.[१७]
मंगळवार-नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात.[१८] पहिली पाच वर्षे मंगळागौर केल्यानंतर, नंतरच्या एखाद्या वर्षी उद्यापन करतात. त्यावेळी आपल्या आईला वाण म्हणून सोन्याचा नाग देतात.
बुधवार- बुधाची पूजा
गुरुवार- बृहस्पती पूजा
शुक्रवार - जिवती देवीचे पूजन, पुरणाच्या दिव्यांनी अपत्यांना ओवाळणे आणि हळदी-कुंकू करण्याचीही प्रथा आहे.[१९]
शनिवार- ब्रह्मचारी किंवा ब्राह्मण यांचे पूजन[२०]
रविवार- आदित्य राणूबाई पूजन[२१]
सत्यनारायण पूजा - श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करण्याची पद्धती महाराष्ट्रात प्रचलित झाली आहे.[२२]
दान - श्रावण हा चातुर्मासातील श्रेष्ठ महिना मानला जात असल्याने कित्येक धनिक लोक प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत ब्राह्मणांना व गोरगरिबांना भोजन देतात. देवस्थानांतही या महिन्यात कथापुराणादी कार्यक्रम ठेवतात.[२३]
- कावड नेणे- उत्तर भारतात विशेषतः बिहार मधील वैजनाथ या ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या शिवमंदिरात गंगेचे पाणी कावडीतून वाहून नेऊन शिवपिंडीला अभिषेक करण्याची परंपरा आहे.[३] अशी कावड खांद्यावर घेऊन चालत जाणाऱ्या भाविकांना कावडिया असे संबोधिले जाते.[२४]
भारतात अन्य ठिकाणी
उत्तर भारतात या महिन्यात झुलन यात्रा, रक्षाबंधन, जन्माष्टमी व नंदोत्सव हे उत्सव विशेष महत्त्वाचे मानतात. झुलन जत्रा हा दोलोत्सव आहे. पौर्णिमेच्या दिवशी राधा व कृष्ण यांना हिंदोळ्यावर बसवून झोके देतात व स्त्रिया त्यांच्यासंबंधी गीते गातात. हा उत्सव एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत चालतो. कृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव करतात. नंदाला पुत्र झाला असे समजून या दिवशी हळदी-कुंकू मिसळलेले पाणी पिचकारीने उडवतात.[२५]
साहित्यात
- असा रंगारी श्रावण आला (क्रमिक पाठ्यपुस्तकातील कविता, कवी ऐश्वर्य पाटेकर)
- आकाशाचा अतिथी, आला श्रावण श्रावण. त्याच्या सुंदर पोतडीत सप्तरंगी तोरण
- आला आषाढ-श्रावण, आल्या पावसाच्या सरी, किती चातकचोचीने प्यावा वर्षांऋतू तरी! (कवी - बा.सी. मर्ढेकर)
- आला श्रावण श्रावण, होई मनही स्वच्छंद, सर्वाच्या मनी दरवळे, भक्तीचा सुगंध.
- इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी, संध्येच्या गगनी श्रावण आला
- कुरवाळित येतिल मजला, श्रावणातिल जलधारा, सळसळून भिजली पाने, मज करतिल सजल इशारा ... (कविता, कवी -मंगेश पाडगावकर)
- चल गं सये वारुळाला वारुळाला, नागोबाला पुजायाला पूजायाला (समूहगीत, गीतकार - ग.दि. माडगूळकर; संगीत दिग्दर्शक - सुधीर फडके; चित्रपट - जिवाचा सखा)
- चार दिसावर उभा ओला श्रावण झुलवा, न्याया पाठवा भावाला हिला माहेरी बोलवा (कवयित्री : शांता शेळके)
- पाउसाच्या मोहक थेंबात, श्रावण हे सजले, भिजुनी अंग अंग, ओले चिंब, मन हे भिजले (कवी - सचिन तळे)
- फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे . . पंचमिचा सण आला डोळे माझे ओले (ग.दि. माडगूळकर; गजानन वाटवे, गजानन वाटवे). . .
- भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे....श्रावणी पाऊस हास्याचा पडे, श्रीकृष्ण जन्माची दंगल उडे (कवी : शांताराम आठवले, संगीत : केशवराव भोळे, गायिका : वासंती चित्रपट : कुंकू, राग : देस)
- रात्र श्रावणी आज राजसा पाऊस पडतोय भारी | पाखरू पिरतीचं लाजून बसलंय उरी (लावणी, कवी अशोकजी परांजपे; गायिका सुलोचना चव्हाण; संगीत विश्वनाथ मोरे; नाटक -आतून कीर्तन वरून तमाशा)
- रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात, प्रियाविण उदास वाटे रात (भावगीत), कवी- मधुकर जोशी, संगीत दिग्दर्शक - दशरथ पुजारी, गायिका - सुमन कल्याणपूर)[२६]
- रिमझिम बरसत आला श्रावण, साजन नाही आला…. (कविता, कवयित्री -शांता शेळके)
- श्रावण आला गं वनी श्रावण आला, दरवळे गंध मधूर ओला (ग.दि. माडगुळकर, राम कदम, आशा भोसले, चित्रपट-वऱ्हाडी आणि वाजंत्री )
- श्रावण आला तरू तरूला बांधू हिंदोळा (गायिका आणि अभिनेत्री : लता मंगेशकर, स्नेहप्रभा प्रधान, संगीतकार : दादा चांदोरकर, चित्रपट : पहिली मंगळागौर-१९४२)
- श्रावणमासी, हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे " या बालकवी यांच्या कवितेत श्रावण महिन्याचे वर्णन आले आहे.[२७]
- श्रावणा कुणाचे मनस्वी हे क्षण? निसर्ग चित्रांत पावले स्पंदन! -कविता, कवयित्री- इंदिरा संत)
- भरलं आऽभाऽळ पावसाळी पाहुणा गऽ, बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेऽपेऽऽना (लावणी/चित्रगीत, चित्रपट : एक होता विदूषक, कवीे : ना.धों. महानोर, संगीतकार : आनंद मोडक, गायिका [[आशा भोसले||)
- श्रावणात घन निळा बरसला (कवी-मंगेश पाडगांवकर, संगीत दिग्दर्शक-श्रीनिवास खळे, गायिका लता मंगेशकर)[२८]
- सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा | गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा (कवी नीलेश मोहरीर/गुरू ठाकूर; गायक - अभिजित शिंदे, बेला शेंडे, चित्रपट - मंगलाष्टक वन्स मोअर)
- हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला, तांबुस कोमल पाऊल टाकीत, भिजल्या मातीत श्रावण आला ...(कविता, कवी -कुसुमाग्रज)[२९]
- क्षणात लपून जाशी क्षणात दिसून, जसे काही श्रावणाचे सोनसळी उन्ह (कवी : संदीप खरे, संगीत/गायक : सलील कुलकर्णी)
चित्रपटगीतांत सावन (कवी, संगीत दिग्दर्शक, गायक/गायिका, चित्रपट, राग)
- अजहुँ न आएँ बालमा सावन बीता जाएँ (हसरत जयपुरी, शंकर जयकिशन, सुमन कल्याणपूर-मोहम्मद रफी, साँझ और सवेरा, मधुवंती)
- अब के बरस भेज भैया को बाबुल, सावन में लीजो बुलाय रे (शैलेंद्र, सचिनदेव बर्मन, आशा भोसले, बंदिनी, ??)
- अब के सावन ऐसे बरसे (पारंपरिक, शुभा मुद्गल)
- अब के सावन घर आजा (पारंपरिक, मुरली मनोहर स्वरूप, ठुमरी-बेगम अख्तर)
- अब के सावन साजन घर आजा (इक्बाल बानू आणि बरकत अली खान आणि श्रुती सडोलीकर, अनुक्रमे तिलक कामोद आणि तिलक कामोद आणि मांड खमाज)
- अब के साजन सावन में, आग लगेगी बदनमें (आनंद बक्षी, सचिनदेव बर्मन, लता, चुपके चुपके, ??)
- आओगे तुम, जब साजना, अँगना फूल खिलेंगे, बरसेगा सावन, बरसेगा सावन, झूम झूम के (इरशाद कामिल, प्रीतम व संदेश शांडिल्य, राशीद खान, जब वी मेट, ??)
- आया सावन झूम के (आनंद बक्षी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, लता मंगेशकर-मोहम्मद रफी, आया सावन झूम के, ??)
- आया है सावन का मस्त महीना (अज़ीज़ कश्मीरी, विनोद, ??, आशा भोसले, एक दोन तीन, ?? )
- कई बार पहले बरसा था ये सावन (हिंदी चित्रपटगीत; चित्रपट - यूँही कभी; कवी - योगेश गौर; गायक/गायिका - उदित नारायण+कविता कृष्णमूर्ती; संगीतकार - निखिल-विनय)
- कितने सावन बरस गये (आनंद बक्षी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, अनुराधा पौडवाल, बीस साल बाद, ??)
- गरजत बरसत सावन आयो रे, लायो न संग में, हमरे बिछडे बलमवा (साहिर लुधियानवी, रोशन, कमल बारोत-सुधा मल्होत्रा-सुमन कल्याणपूर, बरसात की रात, ??)
- गरज बरस सावन घिर आयो (अली अझमत-सबीर जफर, अन्नू मलिक, अली अझमत, पाप, ??)
- झिलमिल सितारों का आँगन होगा झिम झिम बरसता सावन होगा (आनंद बक्षी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, मोहम्मद रफी-लता, जीवनमृत्यु, ??)
- तू मिला दे मिला दे (गायक सोनू निगम, चित्रपट : सावन - द लव्ह सीझन) (गाण्याच्या शब्दांत सावन सापडला नाही)
- मौसम है आशिक़ाना, ऐ दिल कहीं से उनको, ऐसें में ढूँढ लाना,.....काली घटा के साएँ, बिरहन को डस रहे हैं, डर हैना मार डालें, सावन का क्या ठिकाना (कमाल अमरोही, गुलाम मोहम्मद, लता मंगेशकर, पाकीज़ा)
- बदला छाए कि झूले पड गये, हाय कि मेले लग गये, कि आया सावन झूम के (आनंद बक्षी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, लता मंगेशकर-मोहम्मद रफी-साथी, आया सावन झूम के, ??)
- बागों में पडे झुले, तुम भूल गये हमको; हम तुमको नहीं भूले..सावन का महिना है, साजन से जुदा रह कर जीना भी क्या जीना है (गायक - बडे गुलाम अली)
- बालम आये बसो मेरे मन में, सावन आया तुमना आये (पारंपरिक, तिमिर बरन, कुंदनलाल सैगल, देवदास, काफी)
- मेरे नैना सावन भादों (आनंद बक्षी, राहुलदेव बर्मन, किशोर. लता, मेहबूबा)
- मौसम है आशिकाना... काली घटा के साए, बिरहन को डस रहे है, डर हैना मार डाले, सावन का क्या ठिकाना, सावन का क्या ठिकाना (कमाल अमरोही, गुलाम मोहम्मद, लता, पाकिज़ा)
- मोहोब्बत बरसा देना तू, सावन आया है (गीत-अरिजीतसिंग)
- रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन (योगेश गौर; राहुलदेव बर्मन; किशोरकुमार+लता मंगेशकर; चित्रपट - मंज़िल)
- रुमझुम बरसे बदरवा, मस्त हवाएं आई, पिया घर आजा आजा, पिया घर आजा | सावन कैसे बीते रे, मै यहाँ तुम वहाँ, हमको नींद न आयें रे, याद सताये तेरी.. (दीनानाथ मधोक, नौशाद, जोहराबाई अंबालावाली, रतन, ??)
- सावन का महीना पवन कॆे सोर (आनंद बक्षी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, मुकेश-लता, मिलन, ??)
- सावन का महीना शादीबिना मुश्किल है जीना (एम.जी. हशमत, अनू मलिक, विनोद राठोड, हलचल, ??)
- सावन के झूले पडे (आनंद बक्षी, राहुलदेव बर्मन, लता मंगेशकर, जुर्माना, पहाडी)
- सावन के झूलों ने (??, ??, मोहम्मद अज़ीज़, निगाहें, ??)
- सावन के नज़ारे हैं, अहा अहा (वली साहब, गुलाम हैदर, शमशाद बेगम-गुलाम हैदर, खजांची, ??)
- सावन के बादलों, उनसे ये जा कहो (डी.एन. मधोक, नौशाद, करण दीवाण, जोहराबाई अंबाली, रतन, वृंदावनी सारंग)
- सावन के बादलों की तरह से भरे हुए, ये वो नयन हैं जिनसे के जंगल हरे हुए (कवी : सौदा)
- सावन घन गरजे बजाये मधुर मधुर मल्हार (विद्याधर गोखले, वसंत देसाई, प्रसाद सावकार, पंडितराज जगन्नाथ-नाटक, ??)
- सावन बरसता है ... तुझसे मिल कर भी यह दिल तरसता है (अंजान; बप्पी लाहिरी; अनुराधा पौडवाल; शानदार)
- सावन में मोरनी बन के, मैं तो छम छम नाचूँ, ओ मैं तो छम छम नाचूँ (मेहबूब, ललित सेन, फाल्गुनी पाठक, सांवरियाँ तेरी याद में, ??)
- अरे हाय हाय ये मजबूरी, ये मौसम और ये दूरी, अरे हाय हाय हाय मजबूरी, ये मौसम और ये दूरी, मुझे पल पल है तड़पाये, तेरी दो टकियाँ दी नौकरी वे मेरा लाखों का सावन जाये (वर्मा मलिक, लक्ष्मीकांत प्यारेलाल, लता मंगेशकर, रोटी, कपडा ऑर मकान, ??)
- हर दिल जो प्यार करेगा, वो गाना गायेगा...... अब कह दूँगी, करते करते, कितने सावन बीत गये, जाने कब इन आँखों का शरमाना जायेगा, दीवाना सैंकड़ों में पहचाना जायेगा (शैलेंद्र-आर.एस. शंकरसिंग, शंकर-जयकिशन, हर दिल जो प्यार करेगा, मुकेश-लता-महेंद्र कपूर, ??)
- हरियाला सावन ढोल बजाता आया, धिन तक तक मन के मोर नचाता आया (शैलेंद्र, सलील चौधरी. लता मंगेशकर-मन्ना डे आणि कोरस, दो बीघा जमीन)
चित्रदालन
- राखी पौर्णिमा पूर्वतयारी
- कृष्ण जन्माष्टमी
- दही हंडी
- शिवाचे मंदिर
- शिवपूजा
- सत्यनारायण पूजा
संदर्भ
- ^ जोशी, महादेवशास्त्री (मार्च २०१०). भारतीय संस्कृती कोश खंड नववा. पुणे: भारतीय संस्कृतिकोश मंडळ. pp. ४५६.
- ^ "अधिक मास २०२३: १९ वर्षानंतर जुळून येतोय श्रावण महिन्यात असा संयोग, रक्षाबंधन सणावर होईल परिणाम". Maharashtra Times. 2023-08-16 रोजी पाहिले.
- ^ a b c Ph.D, James G. Lochtefeld (2001-12-15). The Illustrated Encyclopoedia of Hinduism, Volume 2 (इंग्रजी भाषेत). The Rosen Publishing Group, Inc. ISBN 9780823931804.
- ^ Raghuvanshi, Deepa Singh (2019-06-10). Maihar Ke Angana (हिंदी भाषेत). Vani Prakashan. ISBN 9789388434331.
- ^ Underhill, Muriel Marion (1991). The Hindu Religious Year (इंग्रजी भाषेत). Asian Educational Services. ISBN 9788120605237.
- ^ Bhargava, S. C. Bhatt, Gopal K. (2005). Land and people of Indian states and union territories : (in 36 volumes). 16. Maharashtra (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 9788178353722.
- ^ Guides, Rough (2016-10-03). The Rough Guide to India (Travel Guide eBook) (इंग्रजी भाषेत). Rough Guides UK. ISBN 978-0-241-29539-7.
- ^ Kapoor, Subodh (2004-11). A Dictionary of Hinduism: Including Its Mythology, Religion, History, Literature and Pantheon (इंग्रजी भाषेत). Cosmo Publications. ISBN 9788177558746.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गुप्त, देवेंद्र कुमार (2010). सूत्र साहित्य में वर्णित भारतीय समाज एवं संस्कृति (हिंदी भाषेत). प्रतिभा प्रकाशन. ISBN 9788177022209.
- ^ Chakravarty, Kalyan Kumar (1984). Rock-art of India: Paintings and Engravings (इंग्रजी भाषेत). Arnold-Heinemann. ISBN 978-0-391-03219-4.
- ^ Mishra, Vidyaniwas (2009-01-01). Hindi Ki Shabd Sampada (हिंदी भाषेत). Rajkamal Prakashan. ISBN 9788126715930.
- ^ Mukundananda, Swami (2015-01-04). Festivals of India (इंग्रजी भाषेत). Jagadguru Kripaluji Yog.
- ^ Feldhaus, Anne; Feldhaus, Professor of Religious Studies Anne (1996-01-01). Images of Women in Maharashtrian Literature and Religion: A Translation of the Pratyabhijnahrdayam with an Introduction and Notes, by Ksemaraja (इंग्रजी भाषेत). SUNY Press. ISBN 9780791428375.
- ^ Tribhuwan, Robin D. (2003). Fairs and Festivals of Indian Tribes (इंग्रजी भाषेत). Discovery Publishing House. ISBN 9788171416400.
- ^ भारतीय संस्कृती कोश खंड नववा
- ^ लेखक- य .शं. लेले (लेखक हे धर्मशास्राचे अभ्यासक असून त्यांच्या अभ्यासातून त्यांनी त्यांचे विचार मांडले आहेत.) विवेक २६ ऑगस्ट २००७
- ^ Reje, Shailaja Prasannakumar (1968). Mādheracā āhera.
- ^ Marathi, TV9 (2022-07-19). "Shravan 2022: श्रावणातल्या पहिल्या मंगळवारी ठेवतात मंगळागौरी व्रत, महत्त्व आणि पूजा विधी". TV9 Marathi. 2022-07-20 रोजी पाहिले.
- ^ Marathi, TV9 (2022-07-23). "Jivati 2022: या तारखेला आहे जिवती, महत्त्व आणि पूजा विधी". TV9 Marathi. 2022-07-23 रोजी पाहिले.
- ^ जोशी, महादेवशास्त्री. भारतीय संस्कृती कोष खंड नववा.
- ^ Feldhaus, Anne; Feldhaus, Professor of Religious Studies Anne (1996-01-01). Images of Women in Maharashtrian Literature and Religion: A Translation of the Pratyabhijnahrdayam with an Introduction and Notes, by Ksemaraja (इंग्रजी भाषेत). SUNY Press. ISBN 978-0-7914-2837-5.
- ^ Pandit, Bansi (2005). Explore Hinduism (इंग्रजी भाषेत). Heart of Albion. ISBN 9781872883816.
- ^ भारतीय संस्कृती कोश खंड नववा
- ^ Jul 18, Mahima Sharma / TOI-Online / Updated:; 2022; Ist, 10:06. "Kanwar Yatra 2022: Day, Date, History and Significance | - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-07-23 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ भारतीय संस्कृती कोश खंड नववा
- ^ "अब के सजन सावन में…". Loksatta. 2022-07-23 रोजी पाहिले.
- ^ "Balkavi : आज आहे बालकवींचा स्मृतीदिन, त्यानिमित्ताने वाचा त्यांनी लिहिलेल्या अजरामर कविता". www.timesnowmarathi.com. 2022-05-04. 2022-05-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-07-23 रोजी पाहिले.
- ^ author/lokmat-news-network (2018-08-30). "श्रावणात घन निळा बरसला..." Lokmat. 2022-07-23 रोजी पाहिले.
- ^ author/online-lokmat (2018-08-12). "हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला...!". Lokmat. 2021-08-12 रोजी पाहिले.
हिंदू पंचांगानुसार बारा महिने | |
← श्रावण महिना → | |
शुद्ध पक्ष | प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा |
कृष्ण पक्ष | प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्या |
भारतीय महिने |
---|
चैत्र · वैशाख · ज्येष्ठ · आषाढ · श्रावण · भाद्रपद · आश्विन · कार्तिक · मार्गशीर्ष · पौष · माघ · फाल्गुन |