शुभांगी गोखले
शुभांगी गोखले | |
---|---|
जन्म | शुभांगी गोखले ०२ जून १९६८ खामगांव |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके | खजिन्याची विहीर, आत्मकथा |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | श्रीयुत गंगाधर टिपरे, काहे दिया परदेस |
वडील | व्यंकटेश संगवई |
आई | विजया व्यंकटेश संगवई |
पती | मोहन गोखले |
अपत्ये | सखी गोखले |
शुभांगी मोहन गोखले (जन्म : खामगाव, २ जून, १९६८) यांचे विवाहापूर्वीचे नाव शुभांगी व्यंकटेश संगवई असे आहे. मराठी लेखिका, महाराष्ट्र टाइम्सच्या स्तंभलेखिका, कवयित्री आणि संतसाहित्याच्या अभ्यासक विजया व्यंकटेश संगवई या शुभांगी संगवई यांच्या आई होत्या तर वडील व्यंकटेश संगवई हे निवृत्त न्यायाधीश आहेत. शुभांगी गोखले या प्रख्यात अभिनेते कै.मोहन गोखले यांच्या पत्नी आणि टी.व्ही./चित्रपट अभिनेत्री सखी गोखले यांच्या माता आहेत. संजय संगवई व रवींद्र संगवई हे त्यांचे मोठे बंधू. रवींद्र व्यंकटेश संगवई हे मराठी, हिंदी चित्रपटांत काम करणारे चरित्र अभिनेता असून ते रिझर्व बँक ऑफ इंडियात अधिकारी आहेत.
बालपण आणि शिक्षण
खामगाव येथील एका आदर्शवादी कुटुंबात शुभांगी गोखले यांचे बालपण गेले. वडील न्यायाधीश असल्याने त्यांच्या जालना, मलकापूर, बुलढाणा, हिंगोली, जालना, परभणी, पुणे, नाशिक, धुळे, अकोला, नागपूर अशा तब्बल १३हून अधिक जिल्ह्यात बदल्या झाल्या. शुभांगीसह त्यांचे कुटुंब मग त्यांच्याबरोबरच बदलीच्या ठिकाणी जाई. औरंगाबादच्या संगवई कॉलेजात गेल्यावर मात्र त्या स्थिरावल्या. तेथूनच त्यांनी मानसशास्त्रात पदवी मिळवताना अभिनय आणि नाट्यशास्त्राचे प्रशिक्षण घेतले.
धुळ्यात असताना राज्य नाट्यस्पर्धेत शुभांगी गोखले यांनी बसविलेल्या रॉय किणीकरांच्या ’खजिन्याची विहीर’ या नाटकाला पहिला पुरस्कार मिळाला. एका नाटकात काम करताना त्यांना मोहन गोखले भेटले आणि त्यांनी लग्न केले व दहा वर्षे फक्त संसार केला. मोहन गोखले यांच्या १९९९ मधील निधनानंतर शुभांगी गोखले यांनी २००१ मध्ये श्रीयुत गंगाधर टिपरे मध्ये काम करून परत अभिनयाची कारकीर्द सुरू केली.
दूरचित्रवाणी मालिका
- एका लग्नाची तिसरी गोष्ट (ओमची खोटी आई)
- मिस्टर योगी
- श्रीयुत गंगाधर टिपरे (श्यामला टिपरे)
- लापतागंज (हिंदी, मिश्री मावशी)
- हम हैंना (हिंदी)
- काहे दिया परदेस (सरिता सावंत)
- राजा राणीची गं जोडी (कुसुमावती ढाले-पाटील)
- येऊ कशी तशी मी नांदायला (शकुंतला खानविलकर)
नाटके
- आत्मकथा (पदार्पणातले नाटक)
- खजिन्याची विहीर (नाट्यस्पर्धेतले नाटक)
- हीच तर प्रेमाची गंमत आहे
चित्रपट
- अगं बाई अरेच्चा! (चित्रपट)
- कोण आहे रे तिकडे?
- झेंडा (चित्रपट)
- बोक्या सातबंडे (मराठी चित्रपट)
- स.... सासूचा
- हजार चौरासी की माँ (चित्रपट) (हिंदी)
- हसतील त्याचे दात दिसतील
- क्षणभर विश्रांती
पुरस्कार
- शुभांगी गोखले यांच्या ’रावा’पुस्तकाला महाराष्ट्र राज्य सरकारचा ’प्रथम प्रकाशन- ललितगद्य’ या श्रेणीतला ताराबाई शिंदे पुरस्कार मिळाला आहे. (इ.स. २०१४)
बाह्य दुवे
उत्तम, उदात्ततेची आस Archived 2016-03-04 at the Wayback Machine.