शिवनामा
शिवनामा हा कवी मुबारक शेख यांचा काव्यसंग्रह आहे. ह्या काव्यसंग्रहात कवीने कवितेचे निरनिराळे आकृतिबंध वापरून शिवाजीच्या चरित्राची काव्यात्मक मांडणी केली आहे. या कवितांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी, किल्ल्यांशी, बुरूजांशी, किल्ल्याच्या चिराचिरांशी आणि तत्कालीन काळाशी कवीने केलेला मुक्त संवाद अतिशय नावीन्यपूर्ण असा आहे. अर्थवाही 'संवादात्मकता' ही 'शिवनामा' काव्यसंग्रहाची मोठी जमेची बाजू आहे.
आदर्श राज्यकारभार कसा करावा याचे मूर्तिमंत रूप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. राजांच्या आदर्श राज्य कारभाराचे अनेक दाखले आणि संदर्भ मुबारक शेख यांच्या कवितांतून मिळत राहतात.
शिवाच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतच्या कालखंडातील अनेक कर्तृत्वाच्या व स्फूर्तीच्या घटना 'शिवनामा'मध्ये मांडलेल्या आहेत. त्यात गीत, गझल, अंताक्षरी, अभंग, द्विपदी, पोवाडा, मुक्तछंद आदी काव्यप्रकारांचा अंतर्भाव आहे. राजशेखर पाटील यांनी पुस्तकात काढलेल्या समर्पक चित्रांमुळे सचित्र शिवचरित्र वाचल्यासारखे वाटते.