Jump to content

शारदाबाई चितळे

शारदाबाई गणेश चितळे
जन्म १ जानेवारी, १९०६
खानदेश
मृत्यू१९९२
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण बी.ए.
पेशा समाजसेविका, शिक्षणतज्ज्ञ
धर्महिंदू
जोडीदार जी.के. चितळे
वडील ग. स. मराठे

शारदाबाई गणेश चितळे (१ जानेवारी, १९०६:खानदेश - १९९२) या महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञ होत्या.

जीवन

महाराष्ट्रातील पहिले विमाशास्त्रज्ञ ग. स. मराठे हे त्यांचे वडील होते. शारदाबाई यांचा विवाह जी.के. चितळे यांच्याशी झाल्यावर त्या मुंबईत पार्ले येथे आल्या. १९३८ साला पर्यंत पार्ल्यात एकही मराठी भाषिक बालमंदिर नव्हते. त्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी मुलाला एकदम प्राथमिक शाळेत घालत असत. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक ह्यांच्या दादर येथील ‘शिशुविहार’ मुळे तेथील पालकांना बालमंदिराची कल्पना समजली व पटली. शारदाबाई चितळे ह्यांच्या ‘विद्या मंदिर’ ह्या घरात दादरमधील शांताबाई कशाळकर ह्यांनी बालकांसाठी एक वर्ग सुरू केला होता. पण काही काळानंतर शांताबाई दादरला राहायला गेल्या. याच सुमारास शारदाबाई चितळे यांनी एस.एन.डी.टी. विद्यापीठाची बी.ए. पदवी मिळविली. शांताबाईंनी चालविलेल्या वर्गाचे त्यांनीे बालमंदिरात रूपांतर करायचे ठरविले. त्यासाठी ताराबाई मोडक यांच्या दादरमधील शिशुविहारात त्यांनी प्रशिक्षण घेतले.

शिशुशिक्षण कारकीर्द

शिशुशिक्षण व संगोपन ह्या विषयातील तज्ज्ञ  इटालियन पंडिता मादाम मॉंटेसेरी १९३८ मध्ये हिंदुस्थानात चेन्नई जवळील अडियार गावी आल्या होत्या. शारदाबाई अडियारला जाऊन राहिल्या व मॉंटेसेरी यांच्या हाताखाली त्यांनी प्रशिक्षण घेतले. पार्ल्याला परत आल्यावर शारदाबाईंनी चितळे ह्यांच्या मदतीने बालमंदिर सुरू केले. ह्या शिक्षणाच्या प्रचारासाठी माहितीपत्रके काढून ती पालकांना दिली. सकाळी अकरा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत हे मंदिर चालू लागले. एक रुपया फी ठेवली. मुले शाळेत येऊ लागली. शिक्षणासाठी लागणारी साधने शारदाबाईंनी घरी तयार केली. त्यांचे वडील मराठे ह्यांनी दिलेल्या देणगीतून काही शैक्षणिक साहित्य खरेदी केले. पालकांसाठी त्यांनी ताराबाई मोडकांचे मार्गदर्शक व्याख्यान ठेवले. शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन मांडून त्यात प्रात्यक्षिके दाखविली. पालकांमध्ये जागरूकता निर्माण झाली. बालकांची संख्या वाढत गेली. समाजसेवेची आवड असणाऱ्या परिसरातील भगिनींची मदत मिळाली. बाल मंदिराच्या कार्याला गती प्राप्त झाली. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य केंद्र, क्रीडांगण, वाचनालयाची सोय केली. नृत्य, संगीत असे वर्ग सुरू केले. त्या अनुषंगाने स्त्रियांसाठी प्रथमोपचार, पाककला असेही वर्ग आयोजित केले. संस्थेचे काम वाढले. शारदाबाईंनी बालविकास केंद्राची स्थापना केली. पार्ल्याचे दानशूर नागरिक विष्णू बाळकृष्ण परांजपे यांनी त्यांच्या पत्नी रमाबाई ह्यांच्या स्मरणार्थ सातशे पन्नास चौरस वाराची जागा केंद्रासाठी दिली. या जागेवर ‘सौ. रमाबाई परांजपे बालमंदिर, बालविकास केंद्रा’ची इमारत बांधली. अल्पावधीत शारदाबाईंनी सुरू करून वाढविलेली ही संस्था ‘आदर्श बालमंदिर’ म्हणून ओळखली जाऊ लागली. ११९२ साली शारदाबाईचा मृत्यू झाला.