शाआर हाशमाईम
शाआर हाशमाईम (स्वर्गाचे प्रवेशद्वार) एकेकाळी व्यापारी केंद्र आणि बंदर म्हणून विकसित झालेल्या ठाण्यात वेगवेगळ्या समाजाचे लोक एकत्रितपणे, सलोख्याने राहतात. पहिल्या गॅझेटिअरमधील नोंदीनुसार इसवी सन १८८१ च्या ठाण्याच्या जनगणनेत हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन लोकांव्यतिरिक्त १६५ ज्यू नागरिक असल्याची नोंद आहे. इसवी सन १९८१ च्या अगोदरपासून ज्यू समाजाची वस्ती येथे होती. सध्या कॅडबरी कंपनीच्या पुढे जे ज्यू समाजाचे कब्रस्तान आहे, तिथे अलीकडेच झालेल्या रस्त्याच्या कामात पाचशे वर्षांपूर्वीचे ज्यू लोकांचे कब्रस्तान आढळून आले.तिथे बाळाजी मुसाजी डमडेंकर यांची कबर आढळली. ठाणे-मुंबई रेल्वे मार्गाच्या बांधण्यासाठी आणि नंतर रेल्वेचे मोटरमन, अधिकारी, हिशोब तपासनीस, इंजिनिअर म्हणून अनेक बेने इस्त्रायलीनी काम केले आहे. काही ठाण्यात राहिले आणि ज्यू समाजाची वस्ती वाढली. नंतर सरकारी खात्यांमधून निवृत्त झालेले बेने इस्त्रायलीसुद्धा ठाण्यात स्थायिक झाले.येथे डिसेंबर १८७९ मध्ये एक सिनेगॉग म्हणजे प्रार्थनास्थळ बांधले तेच शाआर हाशमाईम म्हणजे स्वर्गाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते.
ज्यू लोकांचे स्वतःचे राष्ट्र इस्त्रायल जेव्हा निर्माण झाले तेव्हा भारतातील अनेक ज्यू तेथे गेले. तरीही आजही भारतातील एकूण ज्यू समाजापैकी सुमारे चाळीस टक्के ठाणे शहर आणि परिसरात स्थायिक आहे. येथील ज्यू लोकांना प्रार्थनास्थळ नव्हते. त्यासाठी येथील ज्यू लोकांनी वर्गणी गोळा करून सव्वीस मार्च १८७८ मध्ये सिनेगागची पायाभरणी करून डिसेंबर १८७९ मध्ये प्रार्थनास्थळ बांधले. त्यावेळेस आठ हजार पाचशे चाळीस वर्गणीतून हे प्रार्थनास्थळ तयार करण्यात आले. ३० डिसेंबर १८७९ रोजी हनुखा सणाच्या मुहूर्तावर ते समाजाला अर्पण करण्यात आले. इसवी सन २००० मध्ये जुन्या प्रार्थनास्थळाचे नूतनीकरण करण्यात आले. मूळ वास्तू भक्कम दगडी बांधणीची आणि गाॅथिक वास्तूशैलीचा ठसा मिरवणारी होती तसेच जुने रूप ठेवून नूतनीकरण केले. या नूतनीकरणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील ज्यू समाजातून निधी उभारण्यात आला होता आणि ३ सप्टेंबर २००० रोजी नव्या रूपातील प्रार्थनास्थळ ज्यू समाजाला अर्पण करण्यात आले. या प्रार्थनास्थळांतील शोफर (मेंढीच्या शिंगाचे वाद्य) दीडशे वर्षे पुरातन आहे. हल्लीसुद्धा रोश हशनाह ह्या ज्यू नवीन वर्षाच्या दिवशी ते वाजविले जाते. ठाणे महापालिकेतर्फे ४ जून २००२ रोजी ह्या प्रार्थनास्थळाच्या चौकाला सिनेगाॅग चौक असे नाव देण्यात आले. ह्या सोहळ्याप्रसंगी कौन्सिल जनरल आॅफ इस्त्रायल श्री.डोव्ह सेगेव्ह स्टाइनबर्ग उपस्थित होते. ठाण्याच्या सामाजिक सांस्कृतिक-शैक्षणिक-आर्थिक घडामोडीमध्ये ज्यू समाज मिसळून गेलेला आहे. तद्वत गेली १४२ वर्षे हे प्रार्थनास्थळ ठाण्याच्या उथळसर विभागात मिसळले आहे.[१]
स्थान
मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात उतरल्यानंतर पश्चिमेला टेंभी नाक्याकडे येऊन पुढे सरळ उथळसरकडे जाणाऱ्या रस्त्याने जाताना उजव्या हाताला आधी जैन मंदिर लागेल आणि नंतर सिव्हिल रुग्णालय लागेल.तिथल्याच सिनेगाॅग चौकात डाव्या बाजूला या प्रार्थना मंदिराची दगडी बांधणीची मोठी इमारत आहे.[२]
संदर्भ
- ^ "Maharashtra - Shaar Hashamaim Synagogue" (इंग्रजी भाषेत).
- ^ "ज्यू समाजाचे स्वर्गाचे प्रवेशद्वार".