शांतता! कोर्ट चालू आहे
शांतता! कोर्ट चालू आहे हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले आणि मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेले मराठी नाटक आहे. या नाटकाला २० डिसेंबर २०१७ रोजी ५० वर्षे पूर्ण झाली.
नाटकासाठी संस्थांची निर्मिती
'शांतता...' या नाटकासाठी 'रंगायन’ आणि नंतरच्या टप्प्यात ‘आविष्कार’ या नाट्यसंस्थांची निर्मिती झाली.
सुलभा बेणारे
या नाटकात 'सुलभा बेणारे' ही भूमिका करणाऱ्या सुलभा देशपांडे यांना अमाप लोकप्रियता मिळाली.
नाट्यस्पर्धेने बाद ठरवलेले नाटक
मुंबईच्या दादर येथील छबिलदास मुलींच्या शाळेत कोंडून ठेवल्यानंतर विजय तेंडुलकर यांनी तासाभरात शांतता! कोर्ट चालू आहे' नाटकाचा दुसरा अंक लिहून दिला.
श्री.पु. भागवत हे ‘रंगायन’चे अध्यक्ष तर, विजय तेंडुलकर उपाध्यक्ष होते. राज्य नाट्य स्पर्धेमध्ये ‘एन्ट्री’ करताना भागवतांनी नाटककार तेंडुलकर एवढेच लिहिले होते. नाटक लिहून तयार नव्हते आणि तेंडुलकर यांना विषय सुचत नव्हता. एक दिवस ते रेल्वे स्टेशनवरून पार्ल्याला पायी घरी जात होते. त्यांच्यापुढे काही तरुण मुले चालली होती. त्यांतील एकाने देशस्थ ऋग्वेदी संघाचा हॉल कुठे आहे, अशी विचारणा तेंडुलकर यांच्याकडे केली. हे तरुण तेथे ‘अभिरूप न्यायालय’ सादर करणार होते आणि त्याविषयी त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होती. त्यांच्यामध्ये सुरू असलेली चर्चा ऐकतच तेंडुलकर घरी पोहोचले. घरी गेल्यावर त्यांनी अरविंद देशपांडे यांना फोन करून नाटकाचा विषय सुचल्याचे सांगितले आणि लगोलग पहिला अंक लिहून दिला. तेंडुलकर यांच्या ज्येष्ठ बंधूंच्या निधनानंतर अंत्यसंस्कार आटोपले आणि सायंकाळी तालमीच्या ठिकाणी आलेल्या तेंडुलकर यांना निर्मात्यांनी शाळेच्या खोलीत कोंडून ठेवले. तासाभरात दुसरा अंक आणि बेणारेचे स्वगत झाल्याचे तेंडुलकर यांनी सांगितल्यानंतरच बाहेरून कडी उघडली गेली. बेणारेचे हे स्वगत रंगभूमीवरील ऐतिहासिक स्वगत झाले आहे.
असे असले तरी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतच परीक्षकांनी ‘हे नाटकच नाही’ असे म्हणत या नाटकाला बाद ठरविले.
अन्य भाषांत रूपांतरे
मराठी, हिंदीसह विविध १६ भारतीय भाषांत 'शांतता...' रंगभूमीवर सादर झाले आणि त्याला इंग्रजीसह परदेशी भाषांमध्ये चित्रपटाद्वारे झळकण्याचा बहुमान लाभला.
'शांतता...' नाटकावरून बनलेली अन्य नाटके/चित्रपट
- मराठी चित्रपट - शांतता कोर्ट चालू आहे, दिग्दर्शक सत्यदेव दुबे, कलावंत सुलभा देशपांडे.
- हिंदी नाटक - खामोश अदालत जारी है, दिग्दर्शक - ओम शिवपुरी. प्रमुख भूमिका - सुधा शिवपुरी.
- हिंदी चित्रपट - शांतता कोर्ट शुरू है. दिग्दर्शक सत्यदेव दुबे, कलावंत [[सुलभा देशपांडे], अरविंद देशपांडे, अमरीश पुरी, अमोल पालेकर, एकनाथ हट्टंगडी.
शांतता! कोर्ट चालू आहे' या नाटकाला मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
- कमलादेवी चटोपाध्याय पुरस्कार
- शंभू मित्रा यांनी नाटक [बंगाली भाषा|बंगालीत]] नेले.
- सत्यदेव दुबे यांनी नाटक हिंदीत नेऊन त्यावर नाटक चित्रपट केला.
- या नाटकाचे ‘रंगायन’ने सुलभा देशपांडे यांना घेऊन शंभर तर, रोहिणी हट्टंगडी यांना घेऊन ‘आविष्कार’ने नव्वद प्रयोग केले.