शरू रांगणेकर
शरू रांगणेकर (निधन : ९३व्या वर्षी, 17 जानेवारी २०२१)हे व्यवस्थापन तज्ज्ञ आणि लेखक होते. त्यांनी व्यवस्थापन विषयांवर बरीच इंग्रजी पुस्तके लिहिली आहेत. पुस्तकांचे मराठी अनुवाद किशोर आरस आणि इतरांनी केले आहेत.
शरू रांगणेकर हे ‘भारताचे स्वतःचे’ म्हणून विकास पावलेल्या व्यवस्थापनशास्त्राची संकल्पनात्मक देणगी आणि तिचे निर्विवाद जनक होते. म्हणूनच त्यांना ‘व्यवस्थापन गुरू’ अश्या समर्पक उपाधीने संबोधले जायचे.
लेखक, चिंतक, व्याख्याते, प्रभावी वक्ते, प्रशिक्षक, संघटक व कुशल नेते अश्या वेगवेगळ्या भूमिकांसह शरू रांगणेकर यांची व्यवस्थापन सल्लागार क्षेत्रात चार दशके मुशाफिरी राहिली. पीटर ड्रकर, फिलिप कोटलर, मायकेल पोर्टर आदी जगाच्या विकसित कप्प्यातील बड्या नावांच्या पंक्तीत शरू रांगणेकर यांना मानाचे स्थान आहे.
नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी कौन्सिल (एनपीसी), इंडियन सोसायटी फॉर ट्रेनिंग ॲन्ड डेव्हलपमेंट (आयएसटीडी), इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कन्सल्टंट्स ऑफ इंडिया (आयएमसीआय) अशा अनेक व्यावसायिकांच्या संघटनांच्या उभारणीत रांगणेकर यांचे योगदान आहे. उद्योग-व्यवसायांना उपलब्ध संसाधनांचा इष्टतम वापर करण्याचा सल्ला देऊन, त्यांचे उत्पादकता व पर्यायाने नफ्याचे गणित रांगणेकर जुळवून देत आले.
कॉर्पोरेट जगतात वावर, जग पालथे घालणारी भ्रमंती, प्रचंड मोठा अनुभव आणि दांडगा व्यासंग असणारे रांगणेकर अतिशय साधे होते. परिषद-परिसंवादासाठी वक्ते म्हणून आलेले निमंत्रण : मग ते साताऱ्यातून येवो अथवा जबलपुरातून; प्रवास रेल्वेने करावा लागो अथवा बसने; सवड असेल तर आलेले निमंत्रण नाकारायचे नाही हा शिरस्ता त्यांनी कायम पाळला.
शरू रांगणेकर यांनी लिहिलेली पुस्तके
- आपल्या पत्नीकडून व्यवस्थापन कसं शिकावं? (Management for the Housewife)
- In the World of Corporate Managers (मराठी अनुवाद - 'व्यवस्थापनाची मूलतत्त्वे' अनुवादक - किशोर आरस)
- In the Wonderland of Indian Managers (मराठी अनुवाद - 'भारतीय व्यवस्थापकांच्या अद्भुत दुनियेत : व्यवस्थापन कसं नसावं याचा आदर्श वस्तुपाठ' अनुवादक - किशोर आरस)