शकुंतला परांजपे
शकुंतलाबाई परांजपे | |
---|---|
जन्म | १७ जानेवारी १९०६ पुणे |
मृत्यू | ३ मे २००० पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
शिक्षण | एम. ए. |
प्रशिक्षणसंस्था | केंब्रिज विद्यापीठ |
प्रसिद्ध कामे | संतती नियमन |
मूळ गाव | पुणे |
जोडीदार | युरा स्लेप्टझॉफ |
अपत्ये | सई परांजपे |
वडील | रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे |
पुरस्कार | पद्मभूषण(१९९१) |
शकुंतलाबाई परांजपे यांचा (जन्म : १७ जानेवारी १९०६; - ३ मे २०००) या त्यांच्या संततिनियमनाच्या कार्यासाठी प्रसिद्ध आहेत.
शकुंतलाबाईंचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. माध्यमिक शिक्षण पुण्याच्या हुजूरपागा शाळेत झाले. मॅट्रिक झाल्यानंतर त्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बी. एस्सी. झाल्या. रँग्लर र.पु. परांजपे या आपल्या वडिलांसारखे त्यांना रँग्लर व्हायचे होते. त्यासाठी १९२६मध्ये शकुंतलाबाई परांजपे इंग्लंडला गेल्या.
केंब्रिज येथे न्यू हॅम कॉलेज मधून त्या गणितात एम. ए. झाल्या. पॅरिस आणि कोलोन येथे जाऊन त्या फ्रेंच आणि जर्मन भाषाही शिकल्या. गणितातली अवघड ट्रायपास पदवी आणि केंब्रिज विद्यापीठातून गणितात अधिस्नातक पदवी मिळवली. त्यांनी १० वर्षे युरोपमध्ये राहून जिनेव्हा इंटरनॅशनल लेबर ऑफिसमध्ये काम करून अनुभव मिळविला. त्या महाराष्ट्रातील समाजसेविका होत्या. त्यांनी भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, कुटुंबनियोजनाचा पुरस्कार केला. शकुंतलाबाई परांजपे यांचे व्यक्तिमत्त्व कुटुंब नियोजनाच्या पहिल्या प्रचारक, शिक्षणतज्ज्ञ, लेखिका, आमदार, खासदार, उत्तम वक्त्या, परखड व स्वतंत्र विचारांच्या विचारवंत, असे विविधांगी होते. व्ही शांताराम यांच्या कुंकू चित्रपटात सुद्धा शकुंतलाताईनी काम केले होते. [१]
व्यक्तिगत माहिती
त्यांचे वडील रँग्लर परांजपे हे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. आई मॅट्रिक (संस्कृतमध्ये) प्रथम आलेल्या होत्या. त्यामुळे घरात वातावरण बौद्धिक, उच्चशिक्षित व वाचनव्यासंगाने परिपूर्ण होते.
युरोपमध्ये काम करत असतांना त्यांचा युरा या रशियन चित्रकाराशी परिचय झाला आणि मग लग्न झाले. दीड वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला आणि लहान मुलीसह त्या भारतात परतल्या.[२] सई परांजपे ही त्यांची कन्या आहे. आपल्या आईच्या जीवनावर सई परांजपे यांनी पर्स्वेशन हा लघुपट बनविला. शकुंतलाबाई परांजपे या लेखिकाही होत्या. यांनी काही पुस्तके आणि नाटकेही लिहिली आहेत.
लेख
- आमच्या लाडक्या मांजरांचा इतिहास
- माझी प्रेतयात्रा
इंग्रजी पुस्तके
- थ्री इयर्स इन ऑस्ट्रेलिया
- सेन्स ॲन्ड नाॅनसेंन्स
शकुंतलाबाई परांजपे यांनी लिहिलेली पुस्तके
- अरे संसार संसार
- काही आंबट काही गोड (आठवणी)
- दुभंग
- निवडक शकुंतला परांजपे (संपादन - विनया खडपेकर)
- पाळणा लांबवायचा की थांबवायचा
- भिल्लिणीची बोरे (कथासंग्रह)
पुरस्कार
संततिनियमनाच्या बाबतीत त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (१९९१)
संदर्भ
- ^ कर्वे, स्वाती (२०१४). १०१ कर्तृत्त्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. १२५. ISBN 978-81-7425-310-1.
- ^ परांजपे, सई (१७ जानेवारी २०१४). "एकमेवाद्वितीय! माझी आई.. शकुंतला परांजपे". लोकसत्ता. ४ जुलै २०१८ रोजी पाहिले.