शंभुधन फुंगलोसा
शंभुधन फुगलोंसा हे एक आसामी क्रांतीकारक होते. त्यांचा जन्म आसाम राज्यातल्या माईब-लकेर गावातील रहिवासी दीपेन्द्र फुंगलोसा यांच्या घरी इ. स. १८५० मध्ये झाला.
तरुणपण
लहानपणापासूनच इंग्रज अधिकाऱ्याचा उन्मत्तपणा व अत्याचार पाहून इंग्रजाबद्दल शंभुधनच्या मनात तिरस्कार निर्माण झाला होता. तरुण वयात शंभुधनने युद्धशास्त्रात शिक्षण घेतले होते. त्यांनी समविचारी तरुण मित्रांच्या सहाय्याने तरुणांचे संघटन बनविले. शंभुधनांनी त्या सर्वांनाही सैनिकी शिक्षण दिले होते. इंग्रज अत्याचाराच्या विरोधात शस्त्राने प्रतिकार करण्याची मानसिकता त्यांचात ठासून भरली होती. त्यामुळे ठिकठिकाणी इंग्रजाविरोधात संघर्ष सुरू झाले होते.
इंग्रजांविरूद्ध युद्ध
इंग्रज सरकार शंभुधन फुगलोंसांना पकडण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्यांनी आपल्या कचार जातीच्या आदिवासी सहकाऱ्यांच्या सहाय्याने इंग्रजांशी छापामार युद्ध सुरू ठेवले होते. ते भूमीगत राहून इंग्रजाविरोधात जनतेला चेतवित होते. मेजर वायडने शंभूधनना एका खेड्यात गाठले. शंभूधन आणि मेजर वायड यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झाले. शंभुधनने मेजर वायडचा खातमा केला. इंग्रज अधिकाऱ्यांनी कूटनीतीचा अवलंब करून शंभुधनांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण एका गद्दाराने इंग्रजांना शंभुधनाचा ठावठिकाणा दिला. मोठी सेना घेऊन इंग्रज अधिकारी मेजर विल्यमने शंभुधनला घेरले. त्यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले. त्या युद्धात शंभुधनजी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार वेळेवर न झाल्याने त्यांची शारीरिक स्थिती अधिकच बिघडली. शेवटी १२ जानेवारी, इ.स. १८८३ रोजी शंभुधन फुंगलोसा यांचा मृत्यू झाला.