Jump to content

शंकर वरदप्पन

शंकर वरदप्पन (जन्म : इ.स. १९९१) हा एक क्रिकेट खेळाडू आहे.

तमिळनाडूमधील नमक्कल जिल्ह्यामध्ये पाचाल नावाचे एक गाव आहे. ह्या गावातील बहुतेक मुले शालेय शिक्षण सोडून त्या गावातल्या त्रिची-कन्याकुमारी मार्गावरील कापड गिरणीत काम करतात. शंकर वरदप्पनालाही सहावीमध्ये शाळा सोडायची जबरदस्ती झाली. पण घरचा विरोध असूनही, त्याच्या मोठ्या भावाच्या पाठिंब्याने शंकरचे शिक्षण सुरूच राहिले.

शाळेत जात असतानाच शंकर गावातल्याच एका क्रिकेट क्लबच्या आसपास घोटाळायचा. त्या क्लबवर शनिवार-रविवारी काही उत्साही कर्मचारी मंडळी क्रिकेट खेळायला येत. त्यांनी शंकरला पाहिले आणि बाॅलबाॅयचे काम दिले. चौकार-़षट्कारानंतर चेंडू फार लांब गेला की पळतपळत जाऊन तो चेंडू घेऊन यायचा हे त्याचे काम, तो अतिशय खुशीने करत असे. शंकरच्या घरी तक्रार आली की शंकर बाॅलबाॅयचे काम करून फुकट आपला वेळ दवडतो, त्यापेक्षा त्याने गिरणीत कामाला जावे. घरच्या लोकांनी वाया गेलेला मुलगा म्हणून त्याचा नाद आधीच सोडून दिला होता; त्यांनी या तक्रारीला काही किंमत दिली नाही.

पुढे शंकर नववीत गेला आणि त्याला क्लबच्या मैदानावर क्रिकेट खेळायला मिळू लागले. क्लबच्या टीममधून शंकर नमक्कलमध्ये आणि जवळपासच्या अन्य गावांत जिल्हास्तरावरील सामने खेळू लागला. तो पुढे पदवीधर झाला, त्याचे लग्न झाले आणि तो नोकरीच्या निमित्ताने दुबईला गेला.

इसवी सन २०१४ साली शंकरची दुबईच्या कंपनीत क्वालिटी कंट्रोल इंजिनिअरची नोकरी सुरू झाली, आणि काही दिवसांतच तो तिथल्या क्रिकेट संस्कृतीमध्ये सामील झाला. दुबईमधले बरेच लोक मूळ केरळचे असल्याने तिथल्या क्रिकेट क्लबांची नावेही 'कोचीन हरिकेन्स', 'पँथर्स मल्लपुरम्' अशी होती. शंकर तिथल्या 'राॅयल किंग्स त्रिवेंद्रम' नावाच्या क्लबतर्फे खेळू लागला व ८६ सामन्यांत १६८.५५ च्या स्ट्राईक रेटने त्याने ३,१६७ धावा जमवल्या. त्यापूर्वी शंकरने 'तामिळनाडू प्रीमियर लीग'मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला यश मिळाले नव्हते. त्यामुळे त्याने घरीच नेट प्रॅक्टिस सुरू करून अपल्या खेळाचा दर्जा सुधरवला.

आज २०१९ साली २८ वर्षांचा मेकॅनिकल इंजिनिअर शंकर वरदप्पन सिंगापूरमध्ये होणाऱ्या टी-२० एशिया क्वालिफायरमध्ये कुवेतच्या नॅशनल क्रिकेट टीमचा ओपनिंग बॅट्समन होण्याच्या तयारीत आहे. कुवेत क्रिकेट क्लबने या सामन्यांसाठी ज्या १८ खेळाडूंचा समावेश संभाव्य टीममध्ये केला आहे, त्यांत शंकरचे नाव आहे. कुवेतची ही टीम पुढे जाऊन २०२० साली ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० सामन्यांत सहभागी होईल. शंकर वरदप्पन त्या टीममध्ये असेल.