Jump to content

शंकर काशिनाथ गर्गे

शंकर काशिनाथ गर्गे
जन्म नावशंकर काशिनाथ गर्गे
टोपणनाव दिवाकर
जन्म १८ जानेवारी १८८९
पुणे, महाराष्ट्र, भारत
मृत्यू १ ऑक्टोबर १९३१
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारनाट्यछटा

नाट्यछटाकार दिवाकर (शंकर काशिनाथ गर्गे) (जन्म : १८ जानेवारी,१८८९; मृत्य्पू : १ ऑक्टोबर, १९३१) हे मराठी लेखक होते. मराठीत नाट्यछटा हा लेखनप्रकार रुजवण्याचे श्रेय दिवाकर यांना दिले जाते. त्यांनी एकूण ५१ नाट्यछटा लिहिलेल्या आहेत. 'महासर्प' ही त्यांनी लिहिलेली पहिली नाट्यछटा होय. 'मग तो दिवा कोणता', 'पंत मेले राव चढले', 'वर्डस्वर्थचे फुलपाखरूं', 'चिंगी महिन्याची झाली नाही तोच', 'शिवी कोणा देऊं नये', 'फाटलेला पतंग' इ. त्यांच्या विशेष गाजलेल्या नाट्यछटा आहेत. पंत मेले राव चढले या नाट्यछटेच्या नावानेच वाक्प्रचारही मराठीत रुजलेला आहे.[]

बालपण

दिवाकरांचा जन्म पुणे येथे झाला. दिवाकरांचे वडील राजेवाडी या ठिकाणी स्टेशनमास्तर होते. कालांतराने ते पुण्यास राहाण्यास आले. दिवाकर हे त्यांचे दुसरे अपत्य होते. दिवाकर अडीच वर्षांचे असताना त्यांना आजीस दत्तक देण्यात आले. हे दत्तक विधान नाममात्र होते. आपल्या बालपणी झालेल्या या दत्तक विधानाबद्दल दिवाकरांनी मोठेपणी नाखुषी व्यक्त केली होती. त्यांच्या चुलत्यांनाही हे दत्तक विधान पसंत नव्हते. शंकर काशिनाथ गर्गे हे दिवाकरांचे दत्तक घराण्यातले नाव होते. पुढे त्यांनी त्यांचे सर्व लिखाण दिवाकर या नावाने प्रसिद्ध केले.

शिक्षण

दिवाकरांचे प्राथमिक आणि दुय्यम शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झाले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. शाळेतील शालान्त परीक्षा 'स्कूल फायनल' ते १९०८ मध्ये उत्तीर्ण झाले.

जीवन

जून २४ १९१० रोजी कोल्हापूरच्या श्री. विष्णू नरसिंह पाठक यांच्या सखू या मुलीशी दिवाकरांचा विवाह झाला. या कालावधीत दिवाकर असिस्टंट सुपरिन्टेंडंट ऑफ पोलीस यांच्या कचेरीत नोकरी करत होते. पुढे फेब्रुवारी १९१२ मध्ये दिवाकरांची ’डिस्ट्रिक्ट सुपरिन्टेंडंट ऑफ पोलिस' यांच्या कचेरीत बदली झाली. परंतु या दरम्यान दिवाकरांचे डोळे बिघडल्यावर सिव्हिल सर्जन डॉ. हॅमिल्टन यांनी तपासणीनंतर सादर केलेल्या अहवालानुसार त्यांना सरकारी नोकरी सोडून द्यावी लागली. पोलीस सुपरिन्टेंडंटच्या कचेरीतील नोकरी सुटल्यानंतर जून १९१२ पासून दिवाकरांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या सेंट्रल प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षक या पदावर (मासिक पगार पंधरा रुपये) काम करण्यास सुरुवात केली. जानेवारी १९१४ मध्ये असिस्टंट हेडमास्तर म्हणून (मासिक पगार वीस रुपये)तर जुलै १९१५ मध्ये शाळेचे हेडमास्तर म्हणून (मासिक पगार तेवीस रुपये)त्यांना बढती मिळाली. परंतु नोव्हेंबरमध्ये त्यांनी या नोकरीचा राजीनामा दिला व चार महिन्यांच्या शोधानंतर नूतन मराठी विद्यालयात पुन्हा एकदा शिक्षक म्हणून काम स्वीकारले. मार्च १९१६ मध्ये ते एस.टी.सी परीक्षा पास झाले. यावेळी त्यांना सुमारे तीस रुपये मासिक वेतन मिळत होते. नूतन मराठी विद्यालयात त्यांनी प्रथमच इंग्रजी हा विषय शिकवायला सुरुवात केली. सहकाऱ्यांच्या मदतीने दिवाकरांनी लवकरच प्रत्यक्ष पद्धतीने इंग्रजी शिकवण्यात कौशल्य हस्तगत केले आणि उत्तम इंग्रजी शिक्षक असा लौकिक प्राप्त केला. १९२३ पासून मृत्यूसमयी, १९३१ पर्यंत आठ वर्षांच्या कालावधीत दिवाकर शिक्षकी पेशाचेच काम करत होते. सप्टेंबर १९३१ मध्ये दिवाकर इन्फ्ल्युएंझाच्या तापाने आजारी पडले आणि ऑक्टोबर १ १९३१ रोजी या आजारामुळेच त्यांचे निधन झाले.

लिखाण

दिवाकरांनी इंग्रजी लेखकांच्या साहित्याचे वाचन केलेले होते. यातूनच त्यांच्या लेखनाला प्रेरणा मिळाली असे म्हणता येईल. मार्च २७ १९११ रोजी त्यांनी थॉमस मिडलटनच्या 'यॉर्कशायर ट्रॅजेडी' या नाटकाच्या आधारे 'रंगेल रंगराव' नामक नाटक लिहिण्यास सुरुवात केली. काही कालावधीनंतर गटेच्या 'फ्राउस्ट' हे नाटक वाचल्यानंतर त्यांनी या नाटकाच्या आधारे 'पंडित विद्याधर' नावाचे नाटक लिहिण्याचे काम हाती घेतले. ब्राउनिंगच्या 'ड्रॅमॅटिक मोनोलॉग' या लेखनप्रकारावरूनच दिवाकरांनी नाट्यछटा हा लेखनप्रकार विकसित केला. सप्टेंबर १८ इ.स. १९११ रोजी दिवाकरांनी पहिली नाट्यछटा लिहिली. पुढच्या दोन वर्षांतच दिवाकरांनी त्यांच्या एकूण नाट्यछटांपैकी बहुतेक नाट्यछटा लिहिल्या. ’नाट्यछटा’ हा शब्द दिवाकरांना वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी सुचविला. नाट्यछटा हा प्रकार लिहिण्याची प्रेरणा दिवाकरांना पटवर्धनांनीच दिली असे मानले जाते.

१९१३ नंतर मात्र दिवाकरांचे नाट्यछटांचे लेखन मागे पडले. 'शोकान्‍त' हा नाट्याचा नवीन प्रकार दिवाकरांनी १९१३ मध्ये लिहिण्यास सुरुवात केली. १९१४ साली "मी माझ्याशी!" ही नाट्यसंवादांची लेखमालिका लिहिण्यास दिवाकरांनी सुरुवात केली. 'पाऊस', 'निजलेले मूल', 'सुट्टी! शाळेला सुट्टी!', 'ती बिचारी रडतेच आहे!' हे नाट्यप्रसंगही दिवाकरांनी १९१४ सालीच लिहिले. 'कारकून' हे तीन अंकी नाटकही त्यावर्षीच पूर्ण झाले. १९१५ साली 'सगळेच आपण ह्यः ह्यः' , 'ऐट करू नकोस!' आणि 'आय.सी.एस.'(अप्रकाशित) या नाटिका लिहल्या. १९१६ मध्ये दिवाकरांनी मेटरलिंकच्या 'द साइटलेस' ( Les Aveugles ) या नाट्यकृतीचे रूपांतर केले. १९२३ ते १९३१ या आठ वर्षांच्या काळात दिवाकरांनी दहा नाट्यछटा लिहिल्या. शेवटी दिवाकरांनी 'अहो मला वाचता येतंय!', 'कमीचा मन्या', 'मसालेदार ताजा चिवडा', 'आले कोठून, 'गेले कोठे', 'भर चौकात' असे साध्या शब्दांतून-प्रसंगांतून जीवनविषयक खोल आशय सुचविणारे नाट्यप्रवेश लिहिले. कारकुनासारख्या सामान्य माणसांच्या वास्तविक आयुष्याचे स्वाभाविक स्वरूपात चित्रण करणारे तीन अंकी नाटक ’कारकून’ लिहिले. .

लेखन प्रसिद्धी

'दिवाकरांच्या नाट्यछटा' या पुस्तकाचे मुखपृष्ठ

नरसिंह चिंतामण केळकर यांच्याशी असलेल्या ओळखीमुळे दिवाकरांच्या काही नाट्यछटा केसरी या पत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या. हरिभाऊ आपटे यांनी 'तारीख ७ नोव्हेंबर' ही दिवाकरांची केशवसुतांवरची नाट्यछटा 'करमणूक' या मासिकात प्रसिद्ध केली होती. 'उद्यान' आणि 'ज्ञानप्रकाश' या मासिकातही त्यांच्या काही नाट्यछटा प्रसिद्ध झालेल्या होत्या. 'रत्‍नाकर' मासिकाच्या गोखले यांनी दिवाकर यांचे अखेरचे जवळजवळ सर्वच लिखाण-- नाट्यछटा, नाट्यसंवाद, नाटिका आणि छोट्या गोष्टी इत्यादी -- आपल्या मासिकात प्रसिद्ध केले. प्रा. पोतदार यांनी 'साहित्य सोपान' या पत्रात दिवाकरांच्या दोन नाट्यछटा प्रसिद्ध केल्या होत्या.

दिवाकरांच्या सर्वच्या सर्व एक्कावन नाट्यछटांचा संग्रह काँटिनेन्टल प्रकाशनाने 'दिवाकरांच्या नाट्यछटा' या नावाने प्रसिद्ध केलेला असून या पुस्तकाला प्रा. रा.कृ. लागू यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे तर विजय तेंडुलकर यांनी नाट्यछटांचे रसग्रहण केलेले आहे. याशिवाय दिवाकरांचे एकूण एक लेखन 'संपूर्ण दिवाकर' या नावाखाली १९३३ मध्ये प्रसिद्ध केले गेले.

वाचन

दिवाकर यांनी मोठ्या प्रमाणावर इंग्रजी साहित्याचे वाचन केलेले होते. शेक्सपियर, शेली, ब्राउनिंग, कीट्स, वर्डस्वर्थ यांसारख्या इंग्रजी लेखकांचे साहित्य त्यांनी अभ्यासलेले होते. शेक्सपियर या इंग्रजी नाटककाराच्या संपूर्ण साहित्याचा अभ्यास (काळ-१९११) त्यांनी केलेला होता. याशिवाय मोलियर, टॉलस्टॉय इ. लेखकांचे ग्रंथही त्यांनी वाचलेले होते. नाटककारांपैकी इब्सेन, गाल्सवर्दी, मेटरलिंक, हाउप्टमान इत्यादींची नाटके त्यांनी (काळ-१९१३) वाचलेली होती. १९१८ ते १९२२ या काळात दिवाकर यांनी ऑस्कर वाइल्ड, पुश्किन, पिनिअरो, गॉर्की या लेखकांचे ग्रंथ वाचले तर आयुष्याच्या शेवटच्या आठ वर्षात बॅरी, ए.ए. मिलन, ड्रिंकवॉटर, कॅथरिन मॅन्सफिल्ड या लेखक लेखिकांची पुस्तके वाचून त्यावरील टीकावाङ्‌मयही दिवाकरांनी वाचून पूर्ण केले.

केशवसुत आणि दिवाकर

जानेवारी ४ १९१२ रोजी दिवाकरांनी केशवसुतांच्या कविता सर्वप्रथम वाचल्या. केशवसुतांच्या कवितांनी दिवाकर मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले. त्यांच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत हा प्रभाव कायम होता. वासुदेवराव पटवर्धनांबरोबरच्या मैत्रीप्रमाणेच दिवाकर आणि केशवसुत यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. केशवसुतांच्या सर्व कविता छापून निघाव्यात, आणि त्यांचे जतन व्हावे यासाठी दिवाकर यांनी बरेच प्रयत्‍न केले. याकामी त्यांनी हरिभाऊ आपटे आणि केशवसुतांचे धाकटे भाऊ सीतारामपंत दामले यांचे साहाय्य मिळवण्याचे प्रयत्‍न केले. परंतु त्यांना अपेक्षित असे सहकार्य मिळाले नाही. तरीही दिवाकर यांनी केलेल्या प्रयत्‍नांमुळेच आज केशवसुतांचे समग्र काव्य उपलब्ध आहे.

रविकिरण मंडळ आणि दिवाकर

......ते ........ कालावधीत दिवाकर रविकिरण मंडळाचे सदस्य होते आणि या मंडळाच्या रविवारच्या बैठकीत आणि चर्चेत ते भाग घेत असत.

दिवाकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाट्यछटा स्पर्धा

पुण्याच्या नाट्यसंस्कार कला अकादमीच्या वतीने शंकर काशीनाथ गर्गे उर्फ दिवाकर यांच्या स्मृतिनिमित्त होत असलेल्या या स्पर्धा इ.स. १९९२ साली सुरू झाल्या. २०१६ साल हे दिवाकर स्मृतीनाट्यछटा स्पर्धांचे रौप्य महोत्सवी वर्ष होते.

दिवाकरांच्या ५१ नाट्यछटा

  • अरेरे! ओझ्याखाली बैल मेला !
  • अशा शुभदिनी रडून कसें चालेल ?
  • असें केल्याशिवाय जगांत भागत नाही
  • अहो, आज गिऱ्हाईकच आलें नाही
  • अहो कुंभारदादा ! असे कां बरें रडतां?
  • आनंद ! कोठें आहे येथें ?
  • एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे
  • एका नटाची आत्महत्या
  • एका हलवायाचें दुकान
  • एः ! फारच बोवा
  • कशाला उगीच दुखवा!
  • काय ! पेपर्स चोरीस गेले ?
  • कार्ट्या ! अजून कसें तुला जगातलें ज्ञान नाही
  • कारण चरित्र लिहायचें आहे
  • किती रमणीय देखावा हा ! पण इकडे?
  • कोकिलाबाई गोडबोले
  • कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही.
  • चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच
  • जातिभेद नाही कोठें ?
  • झूट आहे सब
  • तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी; कशाला? एवढ्यासाठीच की नाही?
  • तेवढेंच 'ज्ञानप्रकाशां'त
  • त्यांत रे काय ऐकायचंय
  • दिव्याभोंवती पतंग उडत आहेत !
  • देवा ! मीच मंगळ जर जन्माला आलों नसतों!
  • नासलेलें संत्रें
  • पण बॅट नाहीं !
  • पंत मेले - राव चढले
  • पाण्यांतील बुडबुडे
  • पोरटें मुळावर आलें !
  • फाटलेला पतंग
  • फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन !
  • बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें !
  • बोलावणं आल्याशिवाय नाहीं !
  • मग तो दिवा कोणता ?
  • महासर्प
  • माझी डायरेक्ट मेथड ही !
  • मुंबईत मजा गमतीची ।
  • म्याऊं - म्याऊं - म्याऊं !
  • म्हातारा इतुका न | अवघें पाऊणशे वयमान
  • यांतही नाहीं निदान - ?
  • रिकामी आगपेटी
  • वर्डसवर्थचें फुलपांखरुं
  • शिवी कोणा देऊं नये !
  • शेवटची किंकाळी !
  • सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ?
  • सायकॉलॉजिकली !
  • स्वर्गांतील आत्मे !
  • हें काय उगीचच ?
  • हें काय सांगायला हवें !



अधिक माहिती

  1. ^ "संग्रहित प्रत". 2009-10-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-10-29 रोजी पाहिले.