Jump to content

व्हेस्तोनीस

व्हेस्तोनीसचे चेक प्रजासत्ताकातील स्थान

व्हेस्तोनीस हे चेक प्रजासत्ताकातील पावलॉव टेकड्यांच्या पायथ्याशी असलेले पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ आहे.

पुरातत्त्व

याठिकाणी उत्तर-पुराश्मयुगीन काळात मानवाने बांधलेल्या झोपड्यांचे अवशेष मिळाले. या झोपड्या पाण्याच्या झर्याजवळ उभारलेल्या होत्या. यातील एका झोपडीची जमीन चुनखडी टाकून केलेली होती. याच झोपडीत मधोमध खोलगट खड्ड्याभोवती दगड ठेवून पाच चुली मांडलेल्या होत्या. येथील झोपड्यांच्या छताचे पुरावे मिळाले नाहीत. झोपड्यात शेकडो दगडी व हाडाची हत्यारे त्याचप्रमाणे हाडाची आभूषणे मिळाली.[]

याठिकाणीच आढळलेल्या दुसऱ्या दोन झोपड्या गोल आकाराच्या होत्या. या झोपडीभोवती चुनखडी आणि मातीची सहा मीटर लांबीची भिंत बांधलेली आढळून आली. या झोपड्यांच्या मध्यभागीही खड्डा खोदून भट्टी केलेली होती. या भट्टीच्या कडा भाजून लाल झालेल्या होत्या व तिच्यात काजळी जमलेली होती. या भट्टीत मातीचे गोळे, प्राण्यांच्या मूर्ती व स्त्रीमूर्तीही भाजलेल्या स्वरूपात आढळल्या. त्यापैकी काहींवर मानवी बोटांचे ठसेही उमटलेले होते.

येथे झर्याच्याकाठावर रेनडियर, घोडा आणि कोल्हा या प्राण्यांची हाडे टाकून दिलेली आढळली. एका झोपडीजवळ एका चाळीस वर्षाच्या स्त्रीचे दफन केलेले होते. एका उथळ खड्ड्यात तिचे प्रेत ठेवून त्याभोवती दगडी हत्यारे ठेवलेली होती आणि तिचे प्रेत प्रचंड हत्तीच्या हाडांनी झाकून टाकलेले होते.

व्हेस्तोनीसच्या झोपड्यात सापडलेला कोळसा कोनीफेरस झाडाचा असून त्यावरून व प्रण्यांच्या अवशेषांवरून उत्तर-पुराश्मयुगात येथे अत्यंत थंड हवामान होते असा निष्कर्ष तज्ञांनी काढलेला आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Vestonice and Pavlov sites" (इंग्रजी भाषेत). ३० ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)
  2. ^ सर लिओनार्ड वूली. (PDF) (इंग्रजी भाषेत) http://unesdoc.unesco.org/images/0007/000782/078200eo.pdf. ३० ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |पुस्तकtitle= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)