Jump to content

वेदांग

वेद वाङ्मय हे भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणता येईल. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या वेदांना व्यक्ती मानून सहा उपयुक्त शास्त्रे ही त्या व्यक्तीची अंगे म्हणजेच अवयव आहेत अशी कल्पना केली आहे. हीच सहा शास्त्रे म्हणजे वेदांगे होत.

वेदांग :

छन्दः पादौ तु वेदस्य हस्तौ कल्पोSथ पठ्यते | ज्योतिषामयनं चक्षुर्निरूक्तः श्रोत्रमुच्यते|

शिक्षा घ्राणं तु वेदस्य मुखं व्याकरणं स्मृतम् | तस्मात् साङ्गमधीत्यैव ब्रह्मलोके महीयते |

छंदशास्त्र, कल्पसूत्रे,ज्योतिष, निरुक्त, शिक्षा आणि व्याकरण ही सहा शास्त्रे वेदवाङ्मयाचे अनुक्रमे पाय, हात, डोळे, कान, नाक आणि मुख आहे अशी कल्पना केली आहे. वेदांगांची निर्मिती ही वेदाध्ययनाला पूरक अभ्यास म्हणून झाली. मात्र त्यांचा वैदिकोत्तर काळातील शास्त्रे, कला,संस्कृती,साहित्य यांवर फार मोठा प्रभाव पडला.

१) शिक्षा:

शिक्षा म्हणजे उच्चारणशास्त्र! यज्ञकर्म करताना वेदांतील मंत्रांचे उच्चारण करावे लागते. त्यासाठी मंत्र कसे म्हणावेत, या मंत्रांमध्ये कोणकोणते वर्ण वापरले आहेत, तो वर्ण कसा उच्चारायचा इत्यादी प्रश्नांची उत्तरे शिक्षा शास्त्रामध्ये मिळतात.

शिक्षा या वेदांगाचे मूळ आपल्याला ऋग्वेदामध्ये सापडते. याशिवाय तैत्तिरीय उपनिषदामध्ये शिक्षा या वेदांगाची व्याख्या दिलेली आहे –

ॐ शीक्षां व्याख्यास्यामः ।

वर्णः स्वरः । मात्रा बलम् ।

साम सन्तानः । इत्युक्तः शिक्षाध्यायः ॥ १ ॥

म्हणजेच स्वर-व्यंजनांची संख्या, स्वरांचे संतुलन आणि परस्परसंबंध यांचा अभ्यास म्हणजे शिक्षा होय.

२) कल्पसूत्रे:

श्रौतसूत्रे, गृह्यसूत्रे, शुल्बसूत्रे आणि धर्मसूत्रे अशा चार प्रकारच्या ग्रंथांना कल्पसूत्रे असे म्हणतात. श्रुतींनी म्हणजेच वेदांनी सांगितलेले यज्ञ कसे करावेत हे सांगणाऱ्या ग्रंथांना श्रौतसूत्रे असे म्हणतात. अग्निष्टोम, अश्वमेध, वाजपेय इ. यज्ञांचे वर्णन यामध्ये येते. दैनंदिन जीवनात आवश्यक असणारे यज्ञ सांगणाऱ्या ग्रंथांना गृह्यसूत्रे असे म्हणतात. मनुष्य जन्माला आल्यापासून त्याच्या मृत्यू पर्यत करण्यात येणारे संस्कार, नवीन घर बांधतानाचा विधी, काही प्रकारच्या शांती इत्यादी वर्णन गृह्यसूत्रांमध्ये येते. यज्ञवेदी, अग्निकुंडे आणि यज्ञशाळा बांधताना मोजमापासाठी दोरी आवश्यक असते. या दोरीला शुल्ब असे म्हणतात. वेदी कशी बांधावी? अग्निकुंडाचे मोजमाप काय असावे ? इ. माहिती शुल्बसूत्रांमध्ये येते. तर मनुष्याने समाजात वागताना कोणते नियम पाळावेत या संबंधीचे विवेचन करणाऱ्या ग्रंथांना धर्मसूत्रे म्हणतात. एकंदर, यज्ञातील शारीरिक क्रिया आणि समाजातील आदर्श वर्तन यांचा उहापोह कल्पसूत्रांमध्ये आढळतो.

३) निरुक्त:

वैदिक मंत्रांचा अर्थ समजण्यासाठी निरुक्ताचा उपयोग होतो. निरुक्त म्हणजे शब्दाची व्युत्पत्ती. वैदिक शब्दांचा अर्थ दुर्बोध होऊ लागल्यावर एक समानार्थी शब्दांचा कोश तयार करण्यात आला होता त्याला निघण्टु असे म्हणत. याच निघण्टु वर यास्काचार्यांनी निरुक्त ही टीका लिहिली. यामध्ये शब्दांच्या व्युत्पत्ती दिलेल्या आहेत. यास्कांनी व्युत्पत्ती देताना काही भाषाशास्त्रीय सिद्धांत सांगितलेले आहेत. यास्काचार्यांच्या निरुक्त ग्रंथांवर आज तीन टीका उपलब्ध आहेत. त्यापैकी एक दुर्गासिंह, दुसरी स्कंद-महेश्वर आणि तिसरी टीका नीळकंठ यांनी लिहिलेली आहे.

४) व्याकरण:

वैदिक मंत्रांचे अर्थ समजण्यासाठी निरुक्ताच्या जोडीला व्याकरणाचीही आवश्यकता असते. व्याकरणामुळे शब्दाची नेमकी जात आणि रूप ओळखता येते. पाणिनी ऋषींनी लिहिलेला अष्टाध्यायी हा ग्रंथ व्याकरणावरील सर्वोत्कृष्ट ग्रंथ समजला जातो. पाणिनीपूर्व काळातही अनेक व्याकरणकार होऊन गेले. शाकटायन, गार्ग्य, आत्रेय, शाकल्य हे त्यापैकी काही होय. पाणिनीच्या व्याकरणावर पतंजलींनी महाभाष्य नावाचा टीकाग्रंथ लिहिला आहे.

५) छन्दःशास्त्र:

वैदिक पद्यमंत्र विशिष्ट छंदांमध्ये रचलेले होते. यज्ञात ते त्या छंदात म्हणले जात. छंदाची शास्त्रीय माहिती छन्दःशास्त्र या ग्रंथात दिलेली आहे. सध्या उपलब्ध असलेले छन्दःशास्त्र पिंगलाचार्यांनी रचलेले आहे. संस्कृत भाषेमध्ये ७ प्रमुख छंद सांगितले आहेत.

गायत्रेण प्रति मिमीते अर्कमर्केण साम त्रैष्टुभेन वाकम् ।

वाकेन वाकं द्विपदा चतुष्पदाक्षरेण मिमते सप्त वाणीः ॥२४॥

गायत्री, अनुष्टुप्, त्रिष्टुभ, जगती,उश्निह, बृहति,पङ्क्ती हे ते सात छंद आहेत.

६) ज्योतिष:

ज्योतिः म्हणजे चमकणारे, प्रकाशणारे म्हणजेच आकाशातले ग्रहगोल. त्यांचे शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र ! कोणताही विधी करण्यासाठी योग्य वेळ, योग्य ऋतू कोणता हे ज्योतिषशास्त्र सांगते. लगधाचा वेदाङ्गज्योतिष हा या शास्त्रावरील प्रसिद्ध ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या दोन संस्करणे आहेत. त्यापैकी एक संस्करण ऋग्वेदाशी तर दुसरे संस्करण यजुर्वेदाशी निगडित आहे.[]

संदर्भ

  1. ^ संस्कृत वैजयंती – इयत्ता बारावी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,२०१३.