वेताळ पंचविशी
वेताळ पंचविशी हा संस्कृत भाषेतील अद्भुत कथांचा कथासंग्रह आहे. या संग्रहात एकूण पंचवीस कथा आहेत. (म्हणून पंचविशी हे नाव!). या कथासंग्रहाच्या अन्य भारतीय तसेच विदेशी भाषांमध्ये आवृत्त्या निघाल्या आहेत. तसेच या कथांवर दूरदर्शन मालिकेची निर्मितीही झाली आहे.
वेताळ पंचविशीचे उगमस्थान :
गुणाढ्याची बृहत्कथा हा संस्कृत कथावाङ्मयातील कथांचा सर्वात मोठा संग्रह आहे. मात्र आज हा ग्रंथ उपलब्ध नाही. यानंतर सोमदेव कवींनी कथासरित्सागर या ग्रंथाची रचना केली. या ग्रंथातील विविध कथांमधूनं पुढे शुकसप्ततिः, सिंहासनद्वात्रिंशिका, बृहत्कथामंजरी इत्यादी स्वतंत्र कथासंग्रह रचले गेले. त्यातीलच एक संग्रह म्हणजे वेतालपंचविंशतिः होय.
संस्करणे :
आज वेताळ पंचविशीची संस्कृत भाषेत एकूण ३ संस्करणे उपलब्ध आहेत.
१) कवी शिवदासाने संपादित केलेला वेताळपंचविशी हा संग्रह गद्य-पद्यमिश्रित होता.
२) वल्लभदासाने देखील या कथांचे पुनर्लेखन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने बऱ्याच ठिकाणी शिवदासाचे अनुकरण केले. व त्याला कथालेखनाची शैलीदेखील तितकीशी साध्य झाली नाही.
३) जम्भलदत्त या कवीने केलेले या कथांचे संस्करण आज सर्वात प्रसिद्ध आहे. या संस्करणामध्ये श्लोकांची संख्या कमी होऊन केवळ १९ श्लोक राहिले व बाकीचा बहुतांश भाग हा गद्यस्वरूपात लिहिला गेला.
जम्भलदत्ताविषयी :
जम्भलदत्ताविषयी आज दुर्दैवाने फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र त्याच्या लिखाणावरून आपण त्याच्या आयुष्याविषयी अंदाज बांधू शकतो. जम्भल या शब्दाचा अर्थ होतो कुबेर. व दत्त ही एक पदवी असावी. आपल्या लिखाणामधून त्याने शंकर व विष्णू यांना वंदन केले आहे असे आढळते. मात्र त्याच वेळी त्याने मंजुश्री या बुद्ध देवतेलासुद्धा वंदन केल्याचे आढळून येते.
कथानक :
कोण्या एका राज्यामध्ये शांतिशील नावाचा मांत्रिक राहत असतो. त्याला एका यज्ञाद्वारे भरपूर धन मिळवायचे असते. मात्र त्या यज्ञासाठी एक अट असते ती म्हणजे अग्नी हा एखाद्या प्रेताच्या तोंडामध्येच प्रज्वलित केला पाहिजे. म्हणून तो मांत्रिक मदत मागण्यासाठी विक्रमसेन राजाकडे गेला. मांत्रिकाला मदत करण्यासाठी विक्रमसेन राजा स्मशानातून वेताळाला आणायला गेला. त्यावेळी वेताळाने अट घातली की तुझ्याबरोबर येत असताना मी तुला काही गोष्टी सांगेन. प्रत्येक गोष्टीच्या शेवटी मी तुला एक प्रश्न विचारेन; जर तुला त्या प्रश्नाचे उत्तर आले नाही किंवा उत्तर माहीत असूनही सांगितले नाहीस तर तू तत्काळ मरण पावशील. त्याचबरोबर मी तुझ्याबरोबर येताना तू पूर्णपणे मौन बाळगले पाहिजेस. जर तू मौन सोडलेस तर मी त्याक्षणी तुला सोडून निघून जाईन. अशा पंचवीस गोष्टी झाल्यानंतर वेताळ मांत्रिकाच्या मनातील दुष्ट हेतूबद्दल राजाला सांगतो. तो मांत्रिक जगावर राज्य करण्यासाठी राजा विक्रमाचा बळी देणार असतो. मात्र वेताळाच्या मदतीने राजा विक्रम त्या मांत्रिकावर विजय मिळवतो. प्रसन्न होऊन वेताळ राजाला एक वर देतो तेव्हा राजा त्या मांत्रिकाच्या ह्रदयातील सर्व पापे नष्ट होवो असा वर मागतो. अशा प्रकारे कथेचा शेवट होतो. या प्रवासात वेताळाने राजा विक्रमाला सांगितलेल्या २५ गोष्टींचा संग्रह म्हणजेच वेताल पंचविंशति होय.[१]
वेताळ पंशविशीच्या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित 'बिक्रम और बेताल' ही एक हिंदी दूरदर्शनवर आलेली एक चित्र मालिका होती. २६ भागांनंतर ती संपली. या मालिकेत दारासिंगने, अरुण गोविलने आणि अरविंद त्रिपाठीने कामे केली होती. सन १९८५ आणि नंतर १९८८मध्ये ती प्रसारित झाली. पहिला एपिसोड १३ ऑक्टोबर १९८५ आणि शेवटचा ६ एप्रिल १९८६ रोजी प्रसारित झाला.
- वेताळ पंचविशी हे राज कुलकर्णी यांचे पुस्तक ग्रंथाली प्रकाशनाने जानेवारी २०२०मधे प्रकाशित केले आहे.
अन्य पुस्तके
- विक्रम वेताळ मालिका : जादुची साखळी आणि इतर कथा (लेखिका - वैशाली कार्लेकर, बालसाहित्य)
- विक्रम वेताळ मालिका : टेकडीवरचं देऊळ आणि इतर कथा (लेखिका - वैशाली कार्लेकर, बालसाहित्य)
- विक्रम वेताळ मालिका : दैवी सिंहासन आणि इतर कथा (लेखिका - वैशाली कार्लेकर, बालसाहित्य)
- विक्रम वेताळ मालिका : पुतळे जिवंत झाले आणि इतर कथा (लेखिका - वैशाली कार्लेकर, बालसाहित्य)
- विक्रम वेताळ मालिका : राजपुत्राचा निर्णय आणि इतर कथा (लेखिका - वैशाली कार्लेकर, बालसाहित्य)
- विक्रम वेताळ मालिका : समुद्रातील अप्सरा आणि इतर कथा (लेखिका - वैशाली कार्लेकर, बालसाहित्य)
पूरक
# Ep 1 - Walk through Digital Philology by Adheesh Sathaye - संशोधक आधीश साठे यांचे वेताळ पंचविशीवरील इंग्रजी व्याख्यान