वि.वि. चिपळूणकर
विद्याधर विष्णू चिपळूणकर (जन्म : विलेपार्ले-मुंबई, १३ एप्रिल १९२९; - औरंगाबाद, १८ सप्टेंबर २०१८) हे शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक होते.
वि.वि. चिपळणकरांचे शालेय शिक्षण मुंबईमधील पार्ले टिळक विद्यालयात झाले. संस्कृत विषयात बी.ए. केल्यानंतर त्यांनी एम.ए.,एम.एड. या पदव्या घेतल्या. १९४८मध्ये ते खार (मुंबई) येथील विद्यामंदिर शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. पुढे १९५६मध्ये ते कोकण एज्युकेशन सोसायटीच्या अलिबाग जवळील पोयनाड येथील शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. १९५९मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांची महाराष्ट्राच्या शिक्षण संचालक या पदावर नेमणूक झाली.
चिपळूणकरांनी महाराष्ट्रात प्रदीर्घ काळ, विविध पदांवर, शिक्षण विभागात काम केले.
वि.वि. चिपळूणकरांची शिक्षणविषयक कारकीर्द
- कोल्हापूर व मुंबई येथील बी.एड. महाविद्यालयांचे ते वेगवेगळ्या वेळी प्राचार्य होते.
- सन १९६६ ते १९७१ या काळात औरंगाबाद येथील 'शासकीय विद्यानिकेतन'मध्येही त्यांनी प्राचार्यपदावर काम केले.
- बीड येथे शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी सेवा केली.
- पुण्याच्या राज्य शिक्षणशास्त्र संस्थाेचे संचालकपद त्यांनी भूषविले.
- पुण्याचे 'पाठ्यपुस्तक मंडळ - बालभारती' येथे ते संचालक होते.
- जपानमध्ये तोक्यो येथील शैक्षणिक संशोधन कार्यशाळा झाली होती. तीत ते सहभागी झाले होते.
महाराष्ट्र राज्याचे शिक्षणसंचालक असताना हाती घेतलेले शैक्षणिक उपक्रम
- शालेय गुणविकासाचा कार्यक्रम. या योजनेनुसार सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी शाळांची प्रतवारी, शाळानिहाय योजना, शाळा सुधार कार्यक्रम, शाळासमूह संरचना, कार्यक्रमांचे आयोजन, स्थानिक समाजाचा सहभाग, मूल्यमापन आणि अनुधावन (चिंतन) अशी सातकलमी उपाययोजना निश्चित करण्यात आली. या सप्तपदीचा प्रयोग, स्वतः शिक्षण संचालकांनी दत्तक घेतलेल्या, चऱ्होली बुद्रुकच्या वाघेश्वरी विद्यालयाच्या शालासमूहात करून पाहण्यात आला. केंद्रशासनाने या प्रयत्नांची दखल घेतली. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय शैक्षणिक व प्रशासन संस्था (नीपा-National Institute of Educational Planning and Administration) यांनी सर्व राज्यांच्या प्रतिनिधींचा एक अभ्यासगट नेमून महाराष्ट्राच्या या योजनेचा अभ्यास केला. केंद्र शासनाने या प्रयोगाची शिफारस सर्व राज्यांना केली.
वि.वि. चिपळूणकरांनी लिहिलेली पुस्तके
- आव्हान प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेचे
- उत्कृष्टाचा ध्यास
- कणा शिक्षणाचा
- गीतेतील जीवनसंस्कार
गौरवग्रंथ
- वि.वि. चिपळूणकरांवर एक गौरवग्रंथ लिहिला गेला. त्याचे संपादन वसंत कुंभोजकर यांनी केले आहे.
(अपूर्ण)