वि.ग. कानिटकर
विनायक गजानन कानिटकर (जन्म : २६ जानेवारी १९२६; - ३० ऑगस्ट २०१६) (टोपणनावे : ग्यानबा. रा. म. शास्त्री) हे एक मराठी विचारवंत लेखक होते. कानिटकर यांनी अनेक ऐतिहासिक पुस्तकांचे लिखाण केले. त्यांचा जागतिक राजकारणाचा दांडगा व्यासंग होता. जगाच्या राजकारणात उलथापालथ घडवणाऱ्या अनेक महापुरुषांची चरित्रे त्यांनी ओघवत्या शैलीत शब्दबद्ध केली होती.
कानिटकरांनी बीए (ऑनर्स), बी.एस्सी. ही पदवी घेऊन ३७ वर्षे अकाउंटंट जनरलच्या ऑफिसात सरकारी नोकरी केली. नोकरीदरम्यानच त्यांनी विविध नियतकालिकांतून लेखनास सुरुवात केली. मनातले चांदणे हा त्यांचा पहिला कथासंग्रह होता. त्यानंतर इतिहास, चरित्र, कथा, कादंबरी, अनुवाद अशा विविध वाङ्मय प्रकारातील त्यांची चाळीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. नोकरीमुळे पुण्यात स्थायिक झाल्यानंतर त्यांच्या लेखमाला माणूसमध्ये प्रकाशित झाल्या. याशिवाय त्यांनी इतिहास आणि आंतरराष्ट्रीय घटनांचा वेध घेणारी पुस्तके लिहिली.
नाझी भस्मासुराचा उदयास्त ही लेखमाला प्रथम माणूसमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यांनी रा.म. शास्त्री या टोपण नावाने ती लिहिली होती. मात्र, कानिटकर यांचे नाव वाचकांना पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीनंतर कळले. या पुस्तकाच्या सव्वीसहून अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.
वि.ग. कानिटकरांनी कन्नड, हिंदी, इंग्रजी भाषेतील साहित्यही मराठीत अनुवादित केले. त्यांनी मराठीतल्या १०० महत्त्वाच्या कादंबऱ्यांचे कथासार संक्षेपाने लिहिले आहे.
कानिटकर ललित मासिकात गप्पांगण या नावाचे सदर काही महिने लिहित होते. त्यांनी स्वाक्षरी नावाचे आत्मचरित्रवजा पुस्तक लिहिले आहे. माणूसमध्ये वेगवेगळ्या टोपण नावांनी अनेक उपरोधिक सदरे त्यांनी लिहिली. त्यापैकी ग्यानबा या टोपण नावाने लिहिलेले मुक्ताफळे हे सदर (व पुस्तक) प्रसिद्ध झाले. आणीबाणीच्या कालखंडात त्यांनी अनेक स्फुटे माणूसमध्ये लिहिली.
पुस्तके
- अकथित कहाणी (अनुवादित)
- अॅडॉल्फ हिटलरची प्रेमकहाणी
- अब्राहम लिंकन : फाळणी टाळणारा महापुरुष
- अयोध्या आणि हिंदू समाजापुढील प्रश्न (अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - कॉन्राड एल्स्ट, सहअनुवादक - शुभदा गोगटे)
- आणखी पूर्वज (कथासंग्रह)
- आसमंत (कथासंग्रह)
- एका रात्रीची पाहुणी (अनुवादित, मूळ हिंदी, अजनबी - लेखक गुलशन नंदा)
- इस्रायल : युद्ध, युद्ध आणि युद्धच
- कळावे, लोभ असावा (कथासंग्रह)
- कालखुणा (कादंबरी)
- खोलां धावे पाणी (कादंबरी)
- जोगवा (कथासंग्रह)
- धर्म महात्मा गांधींचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (संकलन/संपादन)
- गाजलेल्या प्रस्तावना (संपादित)
- नाझी भस्मासुराचा उदयास्त
- श्री नामदेव चरित्र
- ने मजसी ने परत मातृभूमीला (दलाई लामांविषयीची लेखमाला)
- परिभ्रमणे कळे कौतुक (प्रवासवर्णने)
- पूर्वज (कथासंग्रह)
- फाळणी : युगान्तापूर्वीचा काळोख
- मनातील चांदणे (कथासंग्रह)
- महाभारत : पहिला इतिहास
- माओ क्रांतीचे चित्र आणि चरित्र
- मी पाहिलेला लाल हुकूमशहा (मिलोव जिलोसच्या पुस्तकाचा स्वैर अनुवाद)
- मुक्ताफळे (आधी सदररूपात प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह). या संग्रहाचे मराठी वृत्तपत्रात आलेले परीक्षण डा. रमेश तेंडुलकर यांच्या 'अभिप्राय' या पुस्तकात आले आहे. जालावर वाचता येते.
- रणावीण स्वातंत्र्य जेव्हा मिळाले (हिंदुस्थानची फाळणी या विषयावरील लेखमाला)
- लाटा (कथासंग्रह)
- वय नव्हतं सोळा (अनुवादित, मूळ कन्नड लेखक - रंगनाथ शामाचार्य लोकापुर)
- विन्स्टन चर्चिल
- व्हिएतनाम - अर्थ आणि अनर्थ
- शहरचे दिवे (कादंबरी)
- संस्कार (अनुवादित, मूळ कन्नड - लेखक : यू.आर. अनंतमूर्ती))
- सुखाची लिपी (कथासंग्रह)
- स्वाक्षरी (कौटुंबिक नोंदी व हकीकती)
- हिटलरचे महायुद्ध
- होरपळ (कादंबरी)
पुरस्कार
- उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीसाठी महाराष्ट्र सरकारचे तीन आणि इतर खासगी संस्थांचे अनेकानेक पुरस्कार कानिटकरांना मिळाले.