Jump to content

विष्णू भास्कर लेले

योगी विष्णू भास्कर लेले
योगी विष्णू भास्कर लेले

विष्णू भास्कर लेले (१८६७ - १९३८) हे एक महाराष्ट्रीय योगी होते. त्यांचा जन्म अमरावती येथे झाला. त्यांचे वडील भास्करराव हे अमरावती येथे मामलतदार या पदावर कार्यरत होते. लहानपणापासून विष्णू देव, देश आणि संतसत्पुरुष यांच्या सेवेत गढून जात असत. ते अमरावतीच्या डिस्ट्रीक्ट कोर्टात कर्मचारी म्हणून कार्यरत होते. आपली मातृभूमी स्वतंत्र व्हावी म्हणून त्यांनी अहोरात्र परिश्रम केले, आसेतु हिमाचल प्रवास केला. इ.स. १९०८-०९ या कालावधीत माणिकतोळा बॉम्ब केस प्रकरणातसुद्धा त्यांचे नाव गोवण्यात आले होते.[]

त्यांचे वास्तव्य वाईस असे. पुढील आयुष्यात योगी श्रीअरविंद म्हणून प्रसिद्ध झालेल्या अरविंद घोष यांना विष्णू भास्कर लेले यांचे योगसाधनेसंदर्भात मार्गदर्शन मिळाले होते. ३१ डिसेंबर १९०७ रोजी श्रीअरविंद व योगी लेले यांची प्रथम भेट झाली. []

त्यांच्या मार्गदर्शनाने योगाभ्यासाची सुरुवात झाली आणि अरविंद घोष यांना अवघ्या तीनच दिवसात मनाची निस्तब्धता ही अवस्था प्राप्त झाली. त्या तीन दिवसांत या दोघांनी बडोदा येथे सरदार मुजुमदार यांच्या वास्तुमध्ये एकत्रित साधना केली होती. []

लेले यांनी गिरनार पर्वतावर जाऊन दत्तोपासना केली होती. पुढे साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी अनेकांना अध्यात्ममार्गावर साहाय्य केले होते. अरविंद घोष यांचे बंधू बारीन्द्र घोष हे लेले यांचे शिष्य होते. योगिक अनुभव इतरांमध्ये संक्रमित करण्याची शक्ती त्यांच्यापाशी होती, श्रीअरविंद यांना तसा अनुभव आला होता.[]

दि. २५ ऑगस्ट १९३८ रोजी त्यांचे श्रीक्षेत्र वाई येथे निधन झाले. साताऱ्याच्या अवधूताश्रमात त्यांच्या अस्थींची स्थापना करण्यात आली आहे.[]

संदर्भ

  1. ^ कारंजकर, भि.दे. "अमरावतीमधील आध्यात्मिक संत पुरुष". दैनिक हिंदुस्थान (अमरावती).
  2. ^ a b LELE, VISHNU BHASKAR. "sri-aurobindo.co.in".
  3. ^ Purani, A.B. (1995). Evening Talks with Sri Aurobindo. Sri Aurobindo Ashram Trust. ISBN 81-7060-093-6.
  4. ^ कारंजकर, भि.दे. "अमरावतीमधील आध्यात्मिक संत पुरुष". दैनिक हिंदुस्थान.
  • स्फूर्ति-कथा, लेखक व संकलक - भा.द.लिमये व विमल भिडे, संजीवन कार्यालय, श्रीअरविंद आश्रम, प्रथम आवृत्ती १९९८ ISBN 81-7058-515-5
  • योगी लेले के सान्निध्य में
  • योगेश्वर विष्णू भास्कर लेले - जीवनदर्शन, ले.बा.म.दीक्षित, श्रीगजानन बुक डेपो, दादर, मुंबई २८.