Jump to content

विषुवांश

खगोलाच्या आतून दिसेल असे विषुवांश आणि डेक्लिनेशन. या प्रणालीची मुख्य दिशा वसंतसंपात बिंदू (पिवळा बिंदू), खगोलीय विषुववृत्त (निळे) आणि क्रांतिवृत्त (लाल) आहे. विषुवांश या मुख्य दिशेपासून खगोलीय विषुववृत्तावर पूर्वेकडे मोजले जाते.

खगोलीय विषुववृत्तावर[श १] वसंतसंपात[श २] बिंदूपासून पूर्वेकडे असलेल्या खगोलीय वस्तूच्या (उदा., ताऱ्याच्या) होरावृत्तापर्यंतचे[श ३] कोनीय अंतर म्हणजे विषुवांश (इंग्रजी: Right Ascension (RA) - राईट असेन्शन; चिन्ह: α) होय.[]

स्पष्टीकरण

ज्याप्रमाणे पृथ्वीवरील ठिकाणाचे निश्चित भौगोलिक स्थान दर्शविण्यासाठी अक्षांशरेखांश हे सहनिर्देशक वापरतात; त्याचप्रमाणे खगोलीय पदार्थांचे खगोलावरील (इतर ताऱ्यांच्या संदर्भातील) स्थान अथवा दिशा दर्शविण्यासाठी विषुवांश किंवा होरा आणि क्रांती हे दोन खगोलीय निर्देशक वापरतात. यांपैकी विषुवांश रेखांशाशी व क्रांती अक्षांशाशी समतुल्य आहे.[]

खगोलीय विषुववृत्त व क्रांतिवृत्त (सूर्याचा वार्षिक भासमान गतीचा मार्ग) ही एकमेकांना वसंतसंपात व शरदसंपात या बिंदूंमध्ये छेदतात; खगोलीय उत्तर व दक्षिण ध्रुवबिंदूंमधून जाणारी वर्तुळे म्हणजे होरावृत्ते ही विषुववृत्ताला लंब असतात. अशा प्रकारे एखाद्या स्वस्थ पदार्थाचे होरावृत्त खगोलीय विषुववृत्ताला ज्या बिंदूत छेदते त्या बिंदूचे वसंतसंपात या संदर्भबिंदूपासून पूर्वेकडे असलेले कोनीय अंतर म्हणजे विषुवांश होय. म्हणजे वसंतसंपात व खगोलीय पदार्थ यांच्यातून जाणाऱ्या दोन होरावृत्तांमधील कोनीय अंतर विषुवांशाने मोजले जाते. विषुवांश बहुधा अंशांऐवजी तास, मिनिटे व सेकंद या एककात देतात. हे अंतर ० ते २४ तास एवढे असू शकते. याचा अर्थ ० ते ३६० अंशांचे २४ भाग (वा एकके) करून त्यांना तास म्हणतात. अशा तऱ्हेने १ तासात १५ अंश येतात व १ अंशाची ४ मिनिटे होतात. पृथ्वीचे एक अक्षीय भ्रमण पूर्ण होताना २४ तासांत तारे एक फेरी पूर्ण करताना दिसतात. म्हणून अंशांऐवजी तास हे एकक निवडण्यात आले आहे. विषुवांश व क्रांती हे सहनिर्देशक बव्हंशी स्थलनिरपेक्ष व कालनिरपेक्ष आहेत. म्हणजे ते निरीक्षकाचे स्थान आणि पृथ्वीचे स्थान यांवर अवलंबून नसतात. अर्थात संपात बिंदूंच्या विलोम (उलट्या) गतीमुळे कालांतराने विषुवांशात किंचित फरक पडत जातो. म्हणून विषुवांश देताना त्यासाठी कोणत्या वर्षाचा संपात बिंदू हा संदर्भबिंदू मानला होता, ते नमूद करावे लागते.[]

अगस्त्य ताऱ्याचा विषुवांश ६ ता. २०मि. आहे. याचा अर्थ या ताऱ्यांतून जाणारे होरावृत्त हे खगोलीय विषुववृत्ताला वसंतसंपाताच्या पूर्वेस ६ तास २० मि. (म्हणजे ९५ अंश) अंतरावर असलेल्या बिंदूमध्ये छेदते.[]

चिन्हे आणि लघुरूप

एकककिंमतचिन्हषष्टिक-मान प्रणालीरेडियनमध्ये
तास २४ वर्तुळ( h )१५°π१२ rad
मिनिट ६० तास, १,४४० वर्तुळ( m )°, १५'π७२० rad
सेकंद ६० मिनिट, ३,६०० तास, ८६,४०० वर्तुळ( s )२४०°, ', १५"π४३,२०० rad

संदर्भ

  1. ^ a b c d अ. ना. ठाकूर. "विषुवांश". मराठी विश्वकोश. खंड १६. १० मार्च २०१६ रोजी पाहिले.

पारिभाषिक शब्दसूची

  1. ^ खगोलीय विषुववृत्त (इंग्लिश: Celestial Equator - सेलेस्टिअल इक्वेटर)
  2. ^ वसंतसंपात (इंग्लिश: Vernal Equinox - व्हर्नल इक्विनॉक्स)
  3. ^ होरावृत्त (इंग्लिश: Hour Circle - अवर सर्कल)