विनायक जोशी
विनायक जोशी (जन्म : ११ मे १९६१; - १५ फेब्रुवारी, २०२०) हे मराठी भावगीतांवर आधारित कार्यक्रम करणारे एक गायक होते. ते बँक ऑफ इंडियात नोकरी करत होते.
विनायक जोशी यांचे शास्त्रीय संगीतातील औपचारिक प्राथमिक शिक्षण पं. एस.के. अभ्यंकर यांचेकडे झाले. त्यानंतर संगीतकार बाळ बर्वे, दशरथ पुजारी यांचेकडे सुगम संगीताचे शिक्षण घेतल्यानंतर गजल गायनासाठी पं. विजयसिंह चौहान यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
विनायक जोशी हे सुधीर फडके स्मृती समितीचे ते विश्वस्त होते. चतुरंग प्रतिष्ठानचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. 'गीत नवे गाईन मी', 'सरींवर सरी', 'बाबुल मोरा', 'चित्रगंगा', 'स्वरभावयात्रा', 'तीन बेगम आणि एक बादशहा' यांसारख्या असंख्य सांगीतिक कार्यक्रमांचे ते संकल्पक होते.
अमेरिकेतील न्यू जर्सी व रिचमंड येथे सोलो कार्यक्रम, दिल्ली-जालंधर जम्मू येथे सैगल गीतांवरचे कार्यक्रम इत्यादी त्यांनी सादर केले.
२०१९ च्या गुढीपाडव्याला डोंबिवलीकर मासिक परिवारातर्फे आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार देऊन विनायक जोशींना सन्मानित करण्यात आले होते. विनायकने लोकसत्तासाठी लिहिलेल्या स्वरभावयात्रा या स्तंभाचे त्याच शीर्षकाचे पुस्तक परममित्र प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.
विनायक जोशी यांनी सादर केलेले कार्यक्रम
- वसंत प्रभू, वसंत पवार, वसंत देसाई यांच्या गाण्यांवर बेतलेला 'वसंत बहार'
- गझलकार संदीप गुप्ते यांच्या गजलांवर आधारलेला 'जरा सी प्यास'
- खगोल अभ्यासक हेमंत मोने यांच्या माहितीपूर्ण निवेदनासह साकारलेला 'सूर नभांगणाचे'
- सुधीर फडके यांनी गायलेल्या/संगीत दिग्दर्शन केलेल्या गीतांवर आधारित 'भाभी की चूडियाँ'
- वसंत आजगावकर-मधुकर जोशी यांच्या गीतांना ५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने बेतलेला 'करात माझ्या वाजे कंकण', वगैरे.