Jump to content

विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य

'विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य' हा डॉ. अशोक चोपडे यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. डॉ. अशोक चोपडे हे सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ते व विद्यमान व्यासंगी अभ्यासक आहेत. या ग्रंथात त्यांनी विदर्भातील गावोगावी पसरलेल्या सत्यशोधक चळवळीतील साहित्याचा अभ्यास मांडला आहे.

सत्यशोधक चळवळीने भारतीय प्रबोधनात मोठे योगदान दिले आहे. विदर्भातही या चळवळीने भारावलेला एक काळ राहिलेला आहे. विलक्षण प्रभावीशाली असलेल्या या चळवळीतून निर्माण झालेले साहित्य महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाचा मोलाचा दस्तऐवज आहे. या जाणीवेतून डॉ. अशोक चोपडे यांनी विदर्भातील सत्यशोधक साहित्याचा परिश्रमपूर्वक शोध घेऊन त्याविषयीचे मौलिक चिंतन या ग्रंथात मांडलेले आहे.

या ग्रंथाचे संशोधनपूर्ण लेखन करताना डॉ. अशोक चोपडे यांनी विदर्भातील गावोगावी फिरून सत्यशोधक साहित्य गोळा केले. वार्ध्यकाकडे झुकलेल्या ७० - ९० वर्षांच्या वयोवृद्ध सत्यशोधकांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्याशी चर्चा केल्या. महाराष्ट्रभरातील अनेक कार्यकर्ते व अभ्यासक, विचारवंत यांच्याशी भेटून माहितीचे संकलन केले. तसेच विविध ग्रंथालयांना भेट देऊन संदर्भ साहित्य मिळवले. अशा अथक प्रयत्नांतून प्रस्तुत ग्रंथातील विवेचन पुढे आले आहे.

ग्रंथात एकूण सहा प्रकरणे असून चार परिशिष्टे जोडण्यात आली आहेत. या ग्रंथात सुरुवातीला सत्यशोधक चळवळीची पार्श्वभूमी विशद केली आहे. विदर्भातील सत्यशोधक चळवळीच्या प्रचार आणि प्रसाराचे अनेक महत्त्वाचे ऐतिहासिक संदर्भही दिले आहेत. विदर्भातील सत्यशोधक कार्यकर्त्यांची ओखळ करून देण्यासह त्यांच्या साहित्याचे स्वरूप आणि योगदान यावर मार्मिक भाष्यही करून या साहित्याची समीक्षाही केली आहे. त्यांची ही समीक्षा तत्कालीन सामाजिक - सांस्कृतिक व साहित्यिक पर्यावरणाच्या पार्श्वभूमीवर येत असल्याने तिचे स्वरूप बहुविध पैलूंवर भाष्य करणारे आहे. विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे मराठी साहित्यातील योगदानाविषयीही या ग्रंथात चर्चा करण्यात आली आहे. विविध चळवळीतून पुढील काळात मांडण्यात आलेल्या साहित्यविचारावर सत्यशोधकीय साहित्याचा प्रभाव कसा राहिला आहे, याविषयीचेही भाष्य यामध्ये करण्यात आले आहे. परिशिष्टामध्ये अमरावती येथील दुसऱ्या ब्राह्मणेतर काँग्रेसच्या परिषदांमधील छायाचित्रे, काही कार्यकर्त्यांची पत्रे, वर्तमान पत्रे व परिषदांची पत्रके, काही कार्यकर्त्यांची दुर्मिळ छायाचित्रे जोडलेली आहेत.

आपल्या या ग्रंथाविषयी डॉ. अशोक चोपडे म्हणतात की, " प्रत्यक्ष सत्यशोधक-ब्राह्मणेतर चळवळीच्या कालखंडात राष्ट्रीय, देशभक्त समजणारे मान्यवर व्यक्ती व संस्था यांची विचारसरणी आणि विद्येचा कोणताही वारसा नसणारे, ग्रामीण पर्यावरणाचे घट्ट संस्कार असणारे सत्यशोधक-ब्राह्मणेतर व्यक्ती व संस्था यांची मुलभूत विचारसरणी या दोहोतील फरक या प्रस्तुतच्या ग्रंथातून वाचकांना येईल आणि सत्यशोधक चळवळीची मुलभूत समग्र परिवर्तनाची भूमिका नेमकी कशी होती. विशिष्ट वळणावर ती कशी बदलत गेली, तिच्या मुलभूत गाभ्यात नेमका फरक पडला काय ? या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे काही प्रमाणात या ग्रंथातून वाचकांना व अभ्यासकांना मिळेल असे वाटते." ( प्रास्ताविक - पृ. क्र. ०९)

ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेत म्हणतात, "सुमारे दीडशे वर्षाच्या इतिहासात सामाजिक-सांस्कृतिक स्वातंत्र्यासाठी असंख्य लोकांनी कसकसा संघर्ष केला, साहित्याच्या व त्याच्याशी निगडीत अशा इतर माध्यमांच्याद्वारे आपल्या स्वत्वाचा आविष्कार कसा केला, याचे एका वेगळ्याप्रकारचे विश्वरूप दर्शनच त्यांच्या या ग्रंथात घडते. हा ग्रंथ विदर्भातील साहित्यापुरता मर्यादित आहे, असे वरवर वाटत असले तरी, सर्व मराठी भाषिकांना आणि सत्यशोधानाच्या दिशेने प्रवास करू इच्छिणाऱ्या सर्व स्वातंत्र्यप्रेमींना हा ग्रंथ " आपल्या स्वतःच्या प्रवासाचाच इतिहास" आहे असे वाटल्याखेरीज राहणार नाही." (प्रस्तावना )

एकूणच प्रस्तुत ग्रंथातून विदर्भातील सत्यशोधक चळवळीतील साहित्याविषयीचे विवेचन आले असले तरी त्यात विदर्भाबाहेरील सत्यशोधक चळवळीविषयीचे मूलगामी चिंतन व्यक्त झाले आहे. आधुनिक भारताच्या जडण-घडणीचे अनेक संदर्भ त्यात समाविष्ट आहेत. सदर पुस्तकाने महाराष्ट्रभरातील सत्यशोधक चळवळीच्या साहित्याच्या संशोधनाला, चर्चेला, प्रकाशनाला, निर्मितीला चालना दिली आहे. प्रस्तुत ग्रंथ कॅन्डिड प्रकाशन, वर्धा द्वारे (प्रथम आवृत्ती २००३) प्रकाशित झाला आहे.