विठ्ठल तो आला आला
विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. विठ्ठल तो आला आला ही पु ल देशपांडे यांची रंगभूमीवर अत्यंत गाजलेली विनोदी एकांकिका आहे ती प्रहसन किंवा फार्स या प्रकारची आहे.[१]
कथानक
१९६१ मध्ये पु. ल. देशपांडे यांची ‘विठ्ठल तो आला आला’ ही विनोदी एकांकिका रंगभूमीवर गाजली. मानवी स्वभावातील विसंगती, भक्तांची दांभिक वृत्ती, यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला आहे. पु. ल. देशपांडे हे लोकप्रिय लेखक, नाटककार, नट, कथाकार, पटकथाकार, दिग्दर्शक अशा अनेक भूमिकांमध्ये वावरले. ‘बटाट्याची चाळ’, ‘अपूर्वाई’, ‘असामी आसामी’, ’खोगीरभरती’, ‘गोळाबेरीज’, ‘नसती उठाठेव’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘हसवणूक’, ‘अंमलदार’, ‘ती फुलराणी’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’, ‘म्हैस’, ‘विठ्ठल तो आला आला’ अशा त्यांच्या अनेक कलाकृती लोकप्रिय झाल्या. विठ्ठल तो आला आला ही एकांकिका १९६१ मध्ये प्रसिद्ध झाली. विटेवर उभा असलेला परमेश्वर आणि आरती म्हणणारे भक्तगण या प्रमुख पात्रांच्या सानिध्यात ही एकांकिका घडते. या एकांकिकेत साक्षात विठ्ठल वैतागला आहे, भक्तांच्या तावडीतून वाचवा अशी विनवणी करत आहे. भटजी, मास्तर, वकील, डॉक्टर, शेटजी, शिंपी, सखुबाई, द्वारकाबाई या दांभिक भक्तांचे परमेश्वराकडे लक्षही नाही. अंतःकरणातील भक्तीभावापेक्षा दिखाऊपणा करणारे भक्त एकमेकांवर दोषारोप करतात.
मी तुम्हाला जन्माला घातले, माझ्याकडे कोणी पाहिल का जरा? असे विठ्ठल म्हणतात, तेव्हा हे वाक्य मास्तर म्हणाले, असे समजून भटजी त्यांच्या मुस्काटात मारतात. रात्रीचा गांजा उतरला नाही भटजींचा असे म्हणतात. ही माणसं आहेत की जनावरं? असे उद्गार विठ्ठल काढतात यामुळे वकिलांना वाटते हे वाक्य डॉक्टर म्हणाले. पण डॉक्टर म्हणाले जनावरं तुमच्यासारखी देवळात येऊन गाढवपणा करीत नाही. लबाडी करणारे वकील काय निर्लज्ज आहेत लोक? असे संतापाने वाद-विवाद करणा-या लबाड भक्तांना उद्देशून विठ्ठल म्हणतात. कोणाचेही परमेश्वराकडे लक्ष नाही पण लुच्चे लोक एकमेकांना दोष देत असताना आंधळा म्हातारा येतो .त्याला विठ्ठलाचा आवाज ओळखता येतो. विठ्ठलाने प्रत्येकाचे काही तरी काढून घेतले आणि काहीतरी ज्यादा ही दिले आहे तरी परमेश्वर त्याला डोळस करतो. सर्व भक्तजन परमेश्वराची उलट तपासणी घेतात. विठ्ठल म्हणतात आता मला या विटेवर उभे राहण्याचा कंटाळा आला आहे. मास्तर सांगतात किती कामे करावी लागतात. जनावरांचे डॉक्टर ही आपल्या व्यवसायातील गा-हाणे सांगतात. शेटजी, वकील, शिंपी देखील आपले दुःख सांगतात. आंधळा पुन्हा मला आंधळे करा म्हणतो. कारण भीक मिळणार नाही. देवही त्याची मागणी पूर्ण करतात. आलिया भोगासी असावे सादर याप्रमाणे विठ्ठल पुन्हा विटेवर उभे राहतात आणि भक्तगण हेचि दान देगा देवा... तुझा विसर न व्हावा. अशी आरती म्हणतात.