Jump to content

विजेचा दिवा

विजेचा दिवा

वीजेचा दिवा निर्वात किंवा ज्वलनविरोधी वायूने भरलेल्या काचेच्या फुग्यात वीजवाहक तारेतून विद्युत्प्रवाह पाठवून त्यायोगे ती तार तापवून त्यातून प्रकाश निर्माण करण्याच्या तत्त्वावर हा शोध आधारित आहे.

१९०६ मध्ये जनरल इलेक्ट्रिक कंपनीने टंगस्ट्न फिलामेंट असलेला दिव्याचे पेटंट मिळवले. सूर्याचा एकमेव प्रतिस्पर्धी म्हणून जनरल इलेक्ट्रिक कंपनीने तो बाजारात आणला.तोपर्यंत जेवढे दिवे बनवले गेले तेवढे महाग तरी होते किंवा टिकाऊ तरी नव्हते.बल्बच्या एका शोधामुळे सर्वसामान्य जनतेची घरे व सार्वजनिक ठिकाणे प्रकाशमान होण्यास मदत झाली.

थॉमस अल्वा एडिसन याला बल्बच्या शोधाचे श्रेय दिले जाते परंतु त्याने केवळ तोपर्यंत प्रचलित असलेल्या संकल्पनेचा विस्तार केला ! विज्ञान इतिहासकारांनुसार जवळ्पास २२ संशोधकांचा हातभार लागला आहे. पण वैज्ञानिक शोधाचे श्रेय कल्पना कोणाला सुचली यापेक्षा ती कोणी जगापुढे मांडली त्यालाच नेहमी मिळते. सर्वमान्य व सर्वांना परवडेल असा कृत्रिम प्रकाशाचा स्रोत जनतेपुढे मांड्ण्याचे श्रेय निर्विवाद एडिसन याचेच आहे.

आदिम काळापासून माणूस प्रकाशाच्या कृत्रिम स्रोताच्या शोधात आहे.त्याने दगडातील खोबणीचा,शंख-शिंपल्यांचा ,मातीचा उपयोग करून त्यात तेल,चरबी इ.जळाऊ इंधन वापरून कृत्रिम प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

बल्बच्या शोधाचे मूळ हम्फ्रे डेवी याने केलेल्या एका प्रयोगात आहे.रॉयल सोसायटी,लंडन पुढे १८०२ साली त्याने केलेल्या प्रयोगात प्लॅटिनमची पट्टी तापवली.उच्च तापमानास पट्टी तापवली असता,तिच्यापासून झगझगीत प्रकाश निर्माण झाला.परंतू प्लॅटिनमचा एक गुणधर्म असा आहे की त्याची हवेशी प्रक्रिया होऊन वाफ होते. त्यामुळे त्याच्यापासून प्रकाश मिळणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य बनले. ते फार काळ टिकत नसे.

संशोधकांना आता नवीन प्रश्न सोडवायचा होता : हवेशी होणाऱ्या रासायनिक क्रियेमधून घड्णारे धातूचे बाष्पिभवन कसे टाळावे? त्यावर ज्या पोकळीत धातूची तार/पट्टी ठेवण्यात येई ती निर्वात करण्याचा तोडगा काढण्यात आला.ब्रिटिश संशोधक-वॉरेन डी ल –यू याने १८२० साली प्लॅटिनमच्या वेटोळ्यातून विजेचा प्रवाह सोडला.प्लॅटिनम निर्वात पोकळीत ठेवले होते.त्याच्या म्हणण्यानुसार निर्वात कक्षात हवेचे फारच थोडे रेणू शिल्लक असल्यामुळे हवेची प्लॅटिनमशी होणारी प्रक्रिया कमी होऊन दिव्याचे आयुष्य वाढेल.अर्थात त्याचा युक्तिवाद खरा होता परंतु प्लॅटिनम मूळात महाग होते ते सर्वसामान्यांना परवडेल अशी स्थिती नव्ह ती.

त्यातून कार्बनचा पर्याय पुढे आला .कार्बनची १७०० अंश सेल्शिअसला वाफ होते.तापवला असता हवेबरोबर क्रिया होऊन ऑक्सिडीकरण होते. अधिक चांगला पर्याय शोधण्याचा प्रयत्न चालू असताना १८४१ मध्ये फ्रेडरिक डी मॉलेन्स याने शुभ्र प्रकाश देण्याऱ्या दिव्याचे पहिले पेटंट घेतले. त्याच्या डिझाइनमध्ये दोन प्लॅटिनमच्या तारांमध्ये कोळशाची भुकटी (पावडर) तापवून त्यापासून प्रकाश निर्माण केला जात असे.हाइनरिक गोबेल या जर्मन संशोधकाने १८५४ मध्ये एक बल्ब तयार केला.त्या बल्बमध्ये त्याने कार्बनीकरण झालेल्या बांबूची फिलामेंट वापरली होती.या बल्बची रचना साधारणतः आपण सध्या वापरत असलेल्या बल्ब प्रमाणे होते. कार्बन व इतर तत्सम पदार्थ हे अतिशय उच्च तापमानास तापविले असता हवेबरोबर क्रिया होऊन जळून जात असत; त्याकरिता थोडीशी हवादेखील पुरेशी असे. बरेचदा बल्बना आगी लागत.त्यामुळे कार्बनचा अंतर्भाव असलेली बहुतेक डिझाइने वापरणाऱ्यांच्या दृष्टीने असुरक्षित होती. अर्थात संपूर्ण निर्वात पोकळी निर्माण करू शकतील असे पंप देखील त्याकाळी अस्तित्वात नव्हते.हा एक महत्त्वाचा अडथळा होता.परंतू १८६५ मध्ये स्प्रेंगेल पंपाचा शोध लागला आणि तो अडथळा दूर झाला.

आधुनिक बल्बच्या जन्मात असे बरेच अडथळे होते. विजेपासून प्रकाश मिळण्याकरीता विजेचा अखंड प्रवाह लागतो.त्याकाळी विजेचा स्रोत रासायनिक किंवा व्होल्टाचा घट हाच असे व ते प्रचंड महाग असत.त्याचप्रमाणे ज्या चुंबकांच्या साहाय्याने जनरेटरमध्ये चुंबकीय क्षेत्रे निर्माण केली जात ती चुंबके देखील विशेष कार्यक्षम नव्हती.हा अडथळा दूर झाला तो डायनामोच्या शोधानंतर. वर्नर सीमेन्स व चार्ल्स व्हिटस्टोन यांनी डायनामोचा शोध लावला.

हेसुद्धा पाहा

  • थॉमस अल्वा एडिसन.