वा.बा. केळकर
वासुदेव बाळकृष्ण केळकर (१८६०-१८९५) हे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये इंग्रजी विषयचे लोकप्रिय अध्यापक होते. त्यांचे इंग्रजी-मराठी भाषांवर प्रभुत्व होते. इंग्रजी नाटकातील परकीय वातावरणाला आपल्या इकडचा रंग कसा चढवावा, याबाबतीत ते सिद्धहस्त होते.
रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांनी सुरू केलेल्या विविधज्ञानविस्तार (१८६७ – १९३७) या मासिकात वा.बा. केळकर यांचे लेख प्रकाशित होत असत. शेक्सपियरच्या टेमिंग ऑफ द श्रू या नाटकाचा त्यांनी केलेला ‘चौदावे रत्न अर्थात संगीत त्राटिका’ हा मराठी अनुवाद खूप लोकप्रिय झाला होता. बलवंत संगीत मंडळी या नाटकाचे प्रयोग करीत असे. १९२५ साली मे महिन्यात अमरावतीच्या मुक्कामात हे नाटक रंगभूमीवर आले. संगीत त्राटिकातील भूमिका आणि ती करणारे कलावंत असे होते :-
तान्या-गणपतराव मोहिते व इंदूरकर, त्राटिका-मा.दीनानाथ मंगेशकर, धनाजीराव-मराठे, पिल्या-परशुराम सामंत, प्रतापराव-चिंतामणराव कोल्हटकर, येसाजी-पुरुषॊत्तम बोरकर, रणधीरराव-दामुअण्णा मालवणकर, रंभाजीराव-कृष्णराव मिरजकर, राणोजीराव-दिनकर ढेरे, वगैरे. या नाटकातली पदे अ.ब. कोल्हटकर यांनी लिहिली होती.
‘त्राटिका’ नाटकातले धनाजीराव हे हैदराबाद संस्थाचे रहिवासी असून त्यांचा पोशाख निजामी पद्धतीचा असल्याचे दाखवले आहे. त्यांच्या मुली त्राटिका आणि कमळा यांची वेषभूषा कर्नाटक-तेलंगणातील स्त्रियांसारखी असे. प्रतापराव कोल्हापूर-साताऱ्याकडचे व रणधीरराव हे ग्वाल्हेरकडचे, त्यांचा पोषाख शिंदेशाही; राणोजीराव होळकर हे इंदूरचे आणि संभाजी-येसाजी हे बडोद्याचे म्हणून गायकवाडी थाटाचा पोषाख घालीत. या नाटकाच्या निमित्ताने प्रेक्षकांना बृहन्महाराष्ट्राच्या संस्कृतीची अनुभूती येत असे. ‘पतिव्रता ललना’ या दीनानाथांच्या गझल अंगाच्या पदामुळे आणि तान्या-पिल्यांच्या लावण्यांमुळे या नाटकाचे सांगीतिकरण बलवंतला लाभदायक ठरले.
वा.बा. केळकर यांची अन्य पुस्तके
- लटपट्या पद्या
- वीरमणी आणि शृंगार सुंदरी (नाटक)
- शिवसंभव