Jump to content

वालचंद हिराचंद

वालचंद हिराचंद

वालचंद हिराचंद जन्म : सोलापूर, २३ ऑक्टोबर १८८२; - इ.स. १९५३) हे एक भारतीय उद्योगपती होते.त्यांचे वडील हिराचंद नेमचंद दोशी हे पहिल्या मराठी जैन नियतकालिकाचे- जैन बोधक-चे संस्थापक संपादक होते.[]

वालचंद यांचा कल शिक्षणापेक्षा धंद्याकडे असल्याने त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून व्यवसायात पदार्पण केले. वडिलांच्या आडत कामात त्यांचे मन रमत नव्हते. त्यात त्यांना, ज्वारीच्या व कापसाच्या व्यापारात झळ सोसावी लागली होती, म्हणून ते जिद्दीने बांधकाम व्यवसायात उतरले. बांधकाम व्यवसायाचे माहीतगार असलेल्या फाटक यांच्याबरोबर फाटक-वालचंद लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू केले. बार्शी लाईट रेल्वेच्या कंत्राटापासून सुरुवात करून सुमारे १४ वर्षे त्यांनी भागीदारीत अनेक पुलांची उभारणी केली. एडशी-तडवळ, बोरीबंदर-करी रोड-ठाणे-कल्याण यांसारखे मोठे प्रकल्प त्यांनी हाती घेतले व तडीस नेले. मुंबईतील व ब्रिटिशांच्या मर्जीतील नावाजलेल्या व्यावसायिकांना मागे सारून त्यांनी ही कामगिरी केली. मुंबईचा तानसा प्रकल्प, बोरघाटातले बोगदे, सिंधू नदीवरील व इरावती नदीवरील पूल यांसह अनेक छोट्या मोठ्या प्रकल्प उभारणीमध्ये वालचंद हिराचंद यांनी त्यांच्यातील धडाडी दाखवली.

ब्रिटिश जहाज कंपन्यांना झुकते माप देण्याच्या भूमिकेमुळे या व्यवसायात त्यांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले होते; मात्र न डगमगता ब्रिटिश व्यवस्थेशी त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली; तसेच ब्रिटिशांच्या मर्जीतील जहाजे चालवणारी बीआय (ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी) ही कंपनी विकत घेण्याची भाषा केली.

जहाज बांधणीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह देशात प्रथमच बोगदा बनवण्याचे तंत्रज्ञान अंमलात आणले. बॉम्बे सायकल अँड मोटार ही मोटारनिर्मिती कंपनी आणि विमाननिर्मितीसाठी हिंदुस्तान एअरक्राफ्ट या कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. पाइप फाउंड्री, खाणकाम, रायफल बनवणे, सॉ मिल, चॉकलेट व साखर कारखाना आदी क्षेत्रे त्यांनी काबीज केली. साखर उद्योगासाठी साखर कारखाने निर्मितीचा प्रकल्प राबविला. उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याकरिता इंडियन मर्चंट्‌स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांची उभारणी केली.

प्रीमिअर इलेक्‍ट्रॉनिक्‍स, हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड, सिंदिया स्टीमशिप कंपनी, रावळगाव शुगर फॅक्टरी, अ‍ॅक्रो इंडिया, बॉम्बे सायकल अँड मोटार कंपनी, हिंदुस्तान कन्स्ट्रक्‍शन, इंडियन ह्यूम पाइप, प्रीमिअर ऑटोमोबाईल्स, नॅशनल रायफल्स, वालचंद कूपर लिमिटेड, वालचंदनगर इंडस्ट्रीज आदी कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. कामगारांशी सलोख्याचे संबंध राखून त्यांच्या अडचणी जाणून पावले टाकली.

उल्लेखनीय

  • डिसेंबर २३, इ.स. १९४० रोजी हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना त्यांनी, तत्कालीन म्हैसूर राज्यात बंगलोर येथे सुरू केला. याच 'हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड' कंपनीचे पुढे इ.स. १९६४ साली हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असे नाव झाले. या कंपनीने आजपर्यंत, भारतातील अत्याधुनिक विमानांच्या निर्मितीचे आणि देखभालीचे काम केले आहे.

संदर्भ

सकाळ संकेतस्थळ[permanent dead link]

  1. ^ जोहरापूरकर, अमित (2023). चरित्र त्यांचे पहा जरा. ISBN 9789391708146.