वारूळ पुराण
माधव गाडगीळ आणि नंदा खरे यांनी मिळून लिहिलेले हे पुस्तक दोन भागांत आहे. पुस्तकाचा उद्देश एडवर्ड विल्सन यांनी लिहिलेल्या अँट हिल या आत्मचरित्रात्मक कादंबरीचा संक्षिप्त मराठी अनुवाद उपलब्ध करून देणे हा आहे. नंदा खरे यांनी असा अनुवाद केला आहे. एडवर्ड विल्सनचा विद्यार्थी माधव गाडगीळ याने या कादंबरीत हाताळलेल्या विषयाचा विस्तृत परिचय ‘सातेरीचा वाडा चिरेबंदी’ नावाच्या प्रस्तावनेत करून दिलेला आहे.
पार्श्वभूमी
एडवर्ड विल्सन अमेरिकेच्या दक्षिणेकडील अल्बमा या पुराणमतवादी व गोऱ्यांचे वर्चस्ववादी मतांचा प्रभाव असलेल्या प्रांतात जन्मला. लहानपणी त्याला निसर्ग निरीक्षणाची आवड निर्माण होऊन त्याने मुंग्या या प्राण्यांचा अभ्यास सुरू केला.यातून त्याचा उत्क्रांती या विषयाशी परिचय झाला तो पुढे चालू ठेवण्यासाठी हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेऊन या विषयावर संशोधनात्मक प्रबंध लिहिला. येथे त्याच्या मूळच्या मतांमध्ये हळूहळू बदल होऊ लागला आणि तो जास्त उदारमतवादी विचारसरणीकडे झुकू लागला. या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचा नायक पुनश्च अल्बमामध्ये गेल्यावर तेथील बायबल हेच पूर्ण सत्य आणि उत्क्रांती हे थोतांड आहे असे मानणाऱ्या मंडळीच्या संपर्कात आला आणि ह्या मंडळींनी त्याच्यावर हिंसक हल्ला करण्याचा प्रयत्न केला असे कथानक अँट हिल कादंबरीत मांडलेले आहे.
माधव गाडगीळ एडवर्ड विल्सनचा विद्यार्थी असल्याने त्याला विनंती केल्यावर त्याने मराठी अनुवादास संपूर्ण परवानगी दिली व काहीही रॉयल्टीची अपेक्षा नाही असे सांगितले. त्याप्रमाणे नंदा खरे यांनी तो अनुवाद केला. माधव गाडगीळने “सातेरीचा वाडा चिरेबंदी” या विस्तृत प्रस्तावनेत उत्क्रांती या विषयाचे विवेचन करून मग सामाजिक जीवन जगणाऱ्या प्राण्यांच्या उत्क्रांतीचा परामर्श घेतला आहे व ज्ञानसंपन्न मानवाची उत्क्रांती आणि त्याच्या कृत्रिम जगाच्या निर्मितीचे काय प्रभाव पडत आहेत याची मांडणी केली आहे. मनोविकास प्रकाशनाने हे पुस्तक २०१५ साली प्रकाशित केले.
प्रतिपादन
“सातेरीचा वाडा चिरेबंदी” प्रस्तावनेत पुढील विषयांची मांडणी केली आहे: १. निसर्ग निवडीच्या प्रभावातून जीवसृष्टीत सहेतुकता कशी निर्माण होते. २. सजीवांच्या परस्पर संबंधांतून अप्पलपोटेपणा तसेच एकमेका करू सहाय्य असे आचरण कसे विकसित होऊ शकते ३. आचरणाच्या अनुकरणातून जनुकांसारखीच एकाकडून दुसऱ्याकडून पसरणारी स्मरुके कशी निर्माण होतात ४. माणसाची निसर्ग पूजेची तसेच बायबल सारखे धर्मग्रंथ मानण्याची स्मरुके ५. आप्त निवड ६. एकांड्या आणि संघप्रिय पशूंच्या स्पर्धा ७. भाषा कोविद मानव ८. खरे आणि खोटे संदेश ९ . कृत्रिम निर्मितीचे विश्व १० . आदिमानव ११. अत्यंत विषमता असलेले समाज १२ . बुद्ध १३. चीन व मुघल १४.युरोपातील औद्योगिक क्रांती १५. गांधींचे हिंद स्वराज १६ . स्वातंत्र्योत्तर विकासनीती १७ . गोव्यातील खनिज उत्पादन आणि पर्यावरणाची हानी १८ . हिंसेकडून सहयोगाकडे
बाह्य दुवे
वारूळ पुराण - पुस्तक परिचय Archived 2023-04-20 at the Wayback Machine.