वामन मल्हार जोशी
वामन मल्हार जोशी (जानेवारी २१, १८८२ - जुलै २०, १९४३) हे मराठी लेखक, पत्रकार होते. त्यांचा जन्म तत्कालीन कुलाबा जिल्ह्यातील (रायगड जिल्हा) तळा या गावी झाला होता. शालेय शिक्षण संपवून वा.म. जोशी पुण्यातील डेक्कन कॉलेजात आले आणि त्यांनी १९०४मध्ये बी.ए.ची आणि १९०६मधे एम.ए.ची पदवी मिळवली.
त्यांनंतर जोशी एका ‘राष्ट्रीय’ शाळेत शिक्षक झाले. (ब्रिटिश राज्यकर्ते असलेल्या भारतात ‘राष्ट्रीय’ शिक्षण देणाऱ्या शाळांवर सरकारचा डोळा असे.) त्यानंतर जोशींनी विश्ववृत्त नावाचे ‘राष्ट्रीय’ मासिक काढले. त्या मासिकात ब्रिटिश राजकर्त्यांविरुद्ध मजकूर असलेमुळे सरकारने वा.म. जोशी यांना ३ वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली.
तुरुंगातून सुटल्यावर जोशी दैनिक केसरीचे दोन वर्षांसाठी संपादक झाले. पुढे १९१८मधे त्यांनी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात स्थापन केलेल्या महिला महाविद्यालयात प्राध्यापकी सुरू केली. ते तेथे तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, आणि इंग्रजी-मराठी साहित्य शिकवीत.
कालांतराने वा.म. जोशी हे पुण्याच्या एस.एन.डी.टी. महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले..
इ.स. १९३०च्या मडगाव (गोवा) येथील सोळाव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद वा.म. जोशींनी भूषविले होते.
वा.म. जोशी यांनी लिहिलेली पुस्तके
- आश्रमहरिणी (कादंबरी, इ.स. १९१६)
- इंदू काळे व सरला भोळे (१९३४)
- नलिनी (१९२०)
- नीति-शास्त्र-प्रवेश
- रागिणी अथवा काव्यशास्त्रविनोद (१०१४)
- विचार सौंदर्य (वैचारिक)
- सुशिलेचा देव (कादंबरी)
- स्मृति-लहरी (ललित)
वा.म. जोशी यांच्यावर लिहिलेली पुस्तके
- पुन्हा वामन मल्हार (डॉ.दत्तात्रय पुंडे, गो.म. कुलकर्णी
- वा.म. जोशी (चरित्र, लेखक - गोविंद मल्हार कुलकर्णी)
- वा.म. जोशी-चरित्र आणि वाङ्मय (लेखक - मा.का. देशपांडे)
- वा.म. जोशी साहित्यदर्शन (संपादक - वा.ल.कुलकर्णी आणि गो.म. कुलकर्णी)
- वामन मल्हार आणि विचारसौंदर्य (समीक्षा, प्रभाकर आत्माराम पाध्ये)