वांद्रे टर्मिनस
वांद्रे टर्मिनस भारतीय रेल्वे टर्मिनस | |
---|---|
फलक | |
स्थानक तपशील | |
पत्ता | वांद्रे पूर्व, मुंबई |
गुणक | 19°03′46″N 72°50′28″E / 19.06278°N 72.84111°E |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. १९९२ |
विद्युतीकरण | होय |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | पश्चिम रेल्वे |
स्थान | |
वांद्रे |
वांद्रे टर्मिनस (नामभेद: बान्द्रा टर्मिनस) हे मुंबई महानगरातील एक प्रमुख रेल्वे टर्मिनस आहे. हे मुंबईमधील लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीच्या एकूण ५ रेल्वे टर्मिनसपैकी एक आहे (इतर चार: मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर टर्मिनस). पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकावरील वाढती गर्दी विकेंद्रित करण्याच्या दृष्टिकोनातून 'वांद्रे टर्मिनस' इ.स. १९९० च्या दशकात विकसित करण्यात आले. प्रामुख्याने पश्चिम रेल्वेवरील गुजरात, राजस्थान आणि उत्तर भारताकडे ये-जा करणाऱ्या गाड्या येथून सुटतात. महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहारांशी संबंधित वांद्रे-कुर्ला संकुल, तसेच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांपासून जवळ असल्यामुळे वांद्रे टर्मिनस हे मुंबईतील प्रमुख स्थानक आहे.
येण्या-जाण्याची सुविधा
वांद्रे टर्मिनस हे वांद्रे रेल्वे स्थानकापासून १ किमी अंतरावर असून मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील सर्व जलद आणि संथ लोकल वांद्रे रेल्वे स्थानक येथे थांबतात. पश्चिम रेल्वेच्या लोकल मार्गावरील खार रोड हे स्थानक वांद्रे टर्मिनसला चिकटून आहे. वांद्रयाला थांबणाऱ्या लोकल सेवेची उपलब्धता अतिउत्तम असून साधारण दर ३ मिनिटांनी चर्चगेट आणि बोरीवली स्थानकांकडे जाणाऱ्या लोकल गाड्या वांद्रे येथे मिळू शकतात. याव्यतिरिक्त वांद्रे स्थानक हार्बर मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाशी जोडले असून दर १५ मिनिटांनी वांद्रे-सीएसएमटी लोकल उपलब्ध आहेत.
बेस्ट परिवहन सेवेची वांद्रे टर्मिनस आणि वांद्रे पश्चिम ही दोन बसस्थानके वांद्रे टर्मिनसशी संलग्न आहेत. रेल्वे स्टेशनवरून साधारण पहाटे ४.३० ते रात्री १ पर्यंत लोकल मिळतात आणि सकाळी ५:३० ते रात्री ११:३० /१२:०० पर्यंत बससेवा उपलब्ध असते. शहराच्या अंतर्भागात जाण्यासाठी ऑटोरिक्षासुद्धा उपलब्ध असतात. मुंबईमधील पश्चिम द्रुतगती महामार्ग वांद्रे टर्मिनसच्या पूर्वेकडून दक्षिण मुंबई कडे जातो.
वांद्रे रेल्वे टर्मिनसवरून सुटणाऱ्या अतिमहत्त्वाच्या रेल्वेगाड्या
- महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेस - वांद्रे ते हजरत निजामुद्दीन
- गरीब रथ एक्सप्रेस -वांद्रे ते दिल्ली सराय रोहिला
- स्वराज एक्सप्रेस - वांद्रे ते जम्मू तावी
- सूर्यनगरी एक्सप्रेस - वांद्रे ते जोधपूर
- राणकपूर एक्सप्रेस - वांद्रे ते बिकानेर
- कच्छ एक्सप्रेस - वांद्रे ते भुज
- सयाजीनगरी एक्सप्रेस - वांद्रे ते भुज
- पश्चिम एक्सप्रेस - वांद्रे ते अमृतसर