वसुंधरा पेंडसे नाईक
वसुंधरा पेंडसे नाईक (२७ जून, १९४६ - १५ जुलै, २०१६:मुंबई, महाराष्ट्र) या एक मराठी लेखिका आणि पत्रकार होत्या. पत्रकार अप्पा पेंडसे हे त्यांचे वडील होत. भारताच्या संघातर्फे आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळणारे क्रिकेट खेळाडू सुधीर सखाराम नाईक हे त्यांचे पती होत.
वसुंधरा पेंडसे यांनी शालान्त परीक्षेत संस्कृतमध्ये सर्वाधिक गुण मिळवून जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती पटकावली. विल्सन कॉलेजातून त्यांनी मराठी आणि संस्कृत या विषयांमध्ये स्वतंत्रपणे एम.ए.च्या पदव्या घेतल्या होत्या. १९६८ मध्ये त्या विल्सन महाविद्यालयात प्राध्यापक झाल्या. पाच वर्षांनंतर त्याचा कंटाळा आल्याने मग त्या ‘लोकसत्ता’मध्ये उपसंपादक म्हणून रुजू झाल्या. रविवारीय पुरवणीचे काम त्या बघत. साहित्याची आवड आणि त्यांच्या कामाचा वकूब पाहून १९८०मध्ये ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकाची धुरा त्यांच्यावर सोपवण्यात आली. काही काळातच ‘लोकप्रभा’ हे मराठी परिवारामध्ये लोकप्रिय बनले. ‘शेवटचे पान’ हे ‘लोकप्रभा’तील त्यांचे संपादकीय त्या काळातील अभिजन वर्गात आवर्जून वाचले जात असे. विविध घटनांवर त्या काळी ‘लोकप्रभा’चे काढलेले विशेषांकही गाजले. नंतर पेंडसेबाईंनी अल्पकाळ महाराष्ट्र टाइम्सच्या ‘सगुण निर्गुण’यालोकप्रिय स्तंभासाठी लेखन केले होते. दैनिक नवशक्तीच्या पुरवणीच्या संयोजनाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली होती.
१९९१ मध्ये त्या ‘नवशक्ति’ या दैनिकाच्या संपादक झाल्या तेव्हा मराठी पत्रकारितेत नवा अध्याय लिहिला गेला. एखाद्या मराठी दैनिकाच्या संपादक होणाऱ्या त्या पहिल्या महिला पत्रकार ठरल्या. संपादकाला असलेल्या लिखाण स्वातंत्र्यावरच गदा येत असल्याचे दिसू लागल्याने वर्षभरातच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. १९९४ ते ९६ या काळात ‘लोकसत्ता’मध्ये ‘कुटुंब कथा’ हे सर्वसाधारण कुटुंबात नेहमी उद्भवणाऱ्या समस्यांची चर्चा करणारे त्यांचे सदरही वाचकप्रिय ठरले होते. या सदरातील लेखांचे नंतर पुस्तकही निघाले.
मुंबई दूरदर्शनवर संस्कृत भाषेचे सौंदर्य स्पष्ट करणारा वसुंधरा पेंडसे नाईक यांचा ’अमृतमंथन’ हा साप्ताहिक कार्यक्रम विशेष लोकप्रिय होता. हा कार्यक्रम इ.स. १९७९ ते १९९२ असा १३ वर्षे चालू होता. या कार्यक्रमात महाकाव्य, नाट्य यांबरोबरच इंजिनिअरिंग, अर्थशास्त्रापासून ते विज्ञानातील विविध विद्याशाखांचाही सुंदर आणि अभ्यासपूर्ण आढावा घेतला जात असे. असाच कार्यक्रम करण्यासाठी वसुंधराबाईंना दिल्ली दूरदर्शनचे आमंत्रण होते, पण त्या ते काम हाती घेऊ शकल्या नाहीत.
पदे
- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्षपद
- मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद
- लोकप्रभा साप्ताहिक आणि अन्य काही नियतकालिकांचे संपादकत्व
- (महाराष्ट्र) राज्य मराठी विकास संस्थेच्या आणि शिवाय मराठी भाषा अभ्यास केंद्राच्या त्या संचालक होत्या.
- भारत निर्माण या संस्थेच्या त्या १९९९ सालच्या टॅलेन्टेड लेडीज ॲवॉर्डच्या मानकरी होत्या.
- कोकण मराठी साहित्य परिषदेच्या चेंबूर येथे ५ जून २०१० रोजी भरलेल्या मुंबई जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
पुस्तके
- कुटुंबकथा भाग १, २
- कौटिल्यीय अर्थशास्त्र परिचय
- मूल्याधार (मूल्यशिक्षणावरील लेखसंग्रह)