Jump to content

वसुंधरा कोमकली

वसुंधरा कोमकली
आयुष्य
जन्म इ. स. १९३०
जन्म स्थान कलकत्ता
मृत्यू २९ जुलै २०१५
मृत्यू स्थान देवास, मध्य प्रदेश
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत
पारिवारिक माहिती
जोडीदार कुमार गंधर्व
संगीत साधना
गुरू बी.आर. देवधर
संगीत कारकीर्द
पेशा गायक
गौरव
पुरस्कार पद्मश्री, संगीत नाटक अकादमी

वसुंधरा कोमकली (इ.स. १९३०:कलकत्ता, भारत - २९ जुलै, इ.स. २०१५:देवास, मध्य प्रदेश, भारत) ह्या एक हिंदुस्तानी संगीत गायिका होत्या. यांचे मूळ नाव वसुंधरा श्रीखंडे असून त्या कुमार गंधर्व यांची दुसरी पत्नी होत्या. पहिली पत्‍नी भानुमती कंस यांचे निधन झाल्यानंतर कुमार गंधर्वांनी इ.स. १९६२ मध्ये वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी विवाह केला. विवाह झाल्यावर पुढची ५३ वर्षे वसुंधरा कोमकली यांचे वास्तव्य देवास येथे होते.

बालपण आणि संगीत शिक्षण

वसुंधरा कोमकली यांचा जन्म कलकत्ता येथे झाला. त्यांची आई कलकत्त्यातील मराठी समाजात क्रियाशील होत्या. त्यांच्या मोठा भाऊ मनोहर यांना नाटक आणि संगीताची हौस होती व इतर भावंडांनाही संगीताचे प्रशिक्षण होते. त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी त्या कलकत्त्याच्या ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्स या मानाच्या संगीतसभेत कुमारगटात गायल्या व त्यात पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवला. त्यानंतर त्या रेडियोवर गाऊ लागल्या.

मुंबईत आगमन

कलकत्ता आकाशवाणीच्या संगीतसभेत एकदा कुमार गंधर्वांचे गाणे झाल्यावर ते श्रीखंड्यांच्या घरी आले असता त्यांना गाणे शिकविण्यासाठीची विनंती केली गेली. कुमार गंधर्व त्यावेळी मुंबईतील ऑपेरा हाऊसला राहत असत व तेथे देवधर स्कूल ऑफ इंडियन म्य़ुझिकशी संलग्न होते. त्यांनी वसुंधरा श्रीखंडेंना गाणे शिकण्यासाठी मुंबईला येण्यास सांगितले.

इ.स. १९४२च्या सुमारास दुसऱ्या महायुद्धाचा प्रभाव भारतावर व विशेषतः कलकत्त्यावर पडण्यास सुरू झाला. त्यावेळ महाराष्ट्रात परतलेल्या अनेक मराठी कुटुंबांबरोबर श्रीखंडे कुटुंबही १९४५-४६ च्या आसपास मुंबईत आले. देवधरांच्या संगीत स्कूलमध्ये दाखल झाल्यावर समजले की कुमार गंधर्व सतत संगीताच्या दौऱ्यांपायी तेथे अभावानेच असत व त्यामुळे ते संगीतही सतत शिकवू शकणार नाहीत. बी.आर. देवधर यांनी शीखंड्यांना गाणे शिकवायला सुरुवात केली. प्रसंगी कुमार गंधर्वही शिकवायचे.

संगीताचा वर्ग आणि नाटकात अभिनय

वसुंधरा यांचे संगीत शिक्षण सुरू असतानाच, त्यांनी शिवाजी पार्कला एक संगीतक्लास सुरू केला, शिवाय एका शाळेत संगीतशिक्षिका म्हणूनही काम करू लागल्या.

१९५१-५२ मध्ये चिंतामणराव कोल्हटकर मुंबई मराठी साहित्य संघासाठी पु.ल. देशपांडे यांचे भाग्यवान हे नाटक करत होते. त्यासाठी त्यांना एका गायिका-अभिनेत्रीची गरज होती आणि त्या भूमिकेसाठी त्यांनी श्रीखंडे यांना संधी दिली. या नाटकानंतर कोल्हटकरांनी बसविलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्यस्त खड्ग या नाटकाच्या एका अंकात त्यांना मुख्य भूमिका दिली

लग्नानंतर त्यांनी संगीत कमी केले.

वसुंधरा कोमकली यांना मिळालेले पुरस्कार

  • पद्मश्री (२००६)
  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार