Jump to content

वळू (चित्रपट)

वळू
चित्रपट पोस्टर
दिग्दर्शनउमेश विनायक कुलकर्णी
पटकथा गिरीश पांडुरंग कुलकर्णी
उमेश विनायक कुलकर्णी
प्रमुख कलाकारअतुल कुलकर्णी
मोहन आगाशे, भारती आचरेकर, गिरीश कुलकर्णी
वीणा जामकर
दिलीप प्रभावळकर
निर्मिती सावंत
नंदू माधव
रेणुका दफ्तरदार
मंगेश सातपुते
अमृता सुभाष
सतीश तारे
चंद्रकांत गोखले
ज्योती सुभाष
श्रीकांत यादव
अश्विनी गिरी
छाया सुधीर पलसाने
कला रणजित देसाई
संगीत मंगेश धाकडे
ध्वनी विनीत डिसूझा
वेशभूषा कल्याणी कुलकर्णी
रंगभूषा दिनेश नाईक
देशभारत ध्वज भारत
भाषामराठी
प्रदर्शितजानेवारी २५, २००८
संकेतस्थळअधिकृत संकेतस्थळ


वळू २००८मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे.

कथानक

महाराष्ट्रातील ’कुसवडे’ नामक एका गावाच्या पार्श्वभूमीवर ’वळू’ची कथा बेतली आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथेप्रमाणे कुसवड्यातील गावकऱ्यांनी देवाला वाहिलेला ’डुरक्या’ नावाचा एक ’वळू’ बिथरल्यागत वागू लागतो; गावा-गल्ल्यांमध्ये, शेतांमध्ये घुसून नासधूस करू लागतो. गावकऱ्यांना त्याच्या मोकाट वागण्याचा जाच वाटू लागल्यावर गावाचे सरपंच ’स्वानंद गड्डमवार’ नावाच्या एका वनाधिकाऱ्याला डुरक्याचा बंदोबस्त करण्याकरता पाचारतात. आजपावेतो बऱ्याच प्राण्यांना काबूत आणून पकडण्यात यशस्वी ठरलेला स्वानंद गड्डमवार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हट्ट धरल्यानेच नाइलाजास्तव या ’किरकोळ’ मोहिमेवर जायला तयार होतो. या मोहिमेचे डॉक्युमेटरी फिल्म स्वरूपात व्हिडिओचित्रण करायला उत्सुक असलेला त्याचा भाऊदेखील व्हिडिओ कॅमेरा वगैरे लवाजम्यासह त्याच्यासोबत जातो.
गावातील लोकांकडून वळूबद्दल माहिती मिळवून (आणि गड्डमवाराच्या भावाने डॉक्युमेटरी चितारण्याच्या उद्देशाने ती चित्रित करून) डुरक्याला पकडायचा पद्धतशीर आराखडा बनवण्याच्या मनसुब्याने गड्डमवार कामाला सुरुवात करतो. पण साध्यासुध्या राहणीने जगणाऱ्या गावकऱ्यांच्या साधेभोळेपणाच्या व प्रसंगी आपापले प्राधान्यक्रम रेटताना सामोरा येणारा व्यावहारिक बिलंदरपणाच्या संमिश्र, आंबटगोड अनुभवांतून; डॉक्युमेंटरीपुढे डुरक्याबद्दल साक्ष देता-देताना गावकऱ्यांकडून कैफियती, लपवलेली सत्ये, भावभावना उघड होण्यातून; सरपंच व गावतल्या ’आबा’ नावाच्या त्यांच्या तरुण प्रतिस्पर्धी नेत्याच्या (आणि त्या दोघंच्या भक्तमंडळींच्या) एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांतून गड्डमवाराचे काम कसे वाढून बसते याचा खुसखुशीत नर्मविनोदी पट उलगडत जातो. अखेरीस डुरक्या वळूला भुलीची सुई मारून पकडण्यात गड्डमवार आणि मंडळी यशस्वी होतात, मात्र गावातल्या गाभण राहिलेल्या गायीच्या पोटी पुन्हा मोकाट सोडायलाच की काय म्हणून एक वळू जन्माला येतो असा मिस्किल योगायोग दाखवत चित्रपट संपतो.

उल्लेखनीय

  • पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव,२००८ सालातल्या चित्रपट महोत्सवांतर्गत या चित्रपटाला खालील पुरस्कार मिळाले:
    • सर्वोत्तम दिग्दर्शक - उमेश विनायक कुलकर्णी
    • सर्वोत्तम छायांकन - सुधीर पलसाने


  • महाराष्ट्र टाइम्स सन्मान, २००८
    • सर्वोत्तम दिग्दर्शक - उमेश विनायक कुलकर्णी
    • सर्वोत्तम चित्रपट - वळू,

बाह्य दुवे