वनौषधी
हजारो वर्षांपासून औषधी वनस्पती या रोगपरिहार, वेदनामुक्ती, सौंदर्यवर्धन इत्यादींसाठी जगभर वापरल्या जात आहेत. या वनस्पतींचे निरनिराळे भाग ( जसे मूळ, खोड, पान, फुले, बिया, साल, इ. ) व त्यांपासून बनवलेले अर्क, काढे, रसायने, गोळ्या , लेप, तेले इत्यादी स्वरूपांत उपयोगात आणले जातात.
आयुर्वेद, युनानी, निसर्गोपचार, होमिओपॅथी, अॅलोपॅथी, चिनी, तिबेटी, इ. सर्व औषधी पद्धतीमध्ये औषधी वनस्पतींचा वापर होतो. सुगंधी द्रव्ये व पाककृती यांतही वनस्पतींचा वापर होतो.
भारतात औषधी वनस्पतींच्या सुमारे २००० जाती आढळतात. त्यांपासून मिळणारे घटक मोठ्या प्रमाणात निर्यात केले जातात.
काही महत्त्वाच्या औषधी वनस्पती :
जेष्ठमध, अश्वगंधा, शतावरी , काळे मिरे (काळी मिरी), पिंपळी, हळद, आवळा, मंजिष्ठ, कडुनिंब, दारुहळद, आले, गुळवेल, एरंड, अर्जुन, कुमाठी, गुग्गुळ, कोरफड, ब्राह्मी , तुळस, सर्पगंधा, अडुळसा,इसबगोल, काडेचिराईत , ओवा, पुदिना, बावची, बेल, हिरडा, आरारूट, झेंडू, कुळीथ, हेमसागर, जव, सुरू, केवडा, हादगा वृक्ष, पानफुटी, एरंड, चंदन इ.
औषधी वनस्पतींची लागवड
- औषधी वनस्पतीची लागवड या भारतातील सरकारी योजनेनुसार औषधी वनस्पतींच्यासामूहिक लागवडीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. औषधी वनस्पतींच्या प्रजातिनिहाय लागवडीकरिता प्रकल्प खर्चाच्या २० टक्के, ५० टक्के व ७५ टक्के एवढे वित्तीय साह्य देय आहे.
- समूह निश्चिती करण्याकरिता औषधी वनस्पतींच्या पिकांसाठी किमान दोन हेक्टार क्षेत्र असावे. यामध्ये साधारणपणे कमीत कमी पाच शेतकऱ्यांचा व जास्तीत जास्त तीन गावांचा समावेश असावा.
- एखादा शेतकरी सदर घटक योजनेचा लाभ वैयक्तिक रीत्या घेऊ इच्छित असल्यास त्याचे लागवडीसाठीचे प्रस्तावित क्षेत्र कमीत कमी ०.२० हेक्टर असणे आवश्यक आहे. शॆतकऱ्यांचा प्रत्येक समूह हा शक्यतो औषधी वनस्पती प्रजातीनिहाय असावा. प्रजातीनिहाय समूह शक्य नसल्यास २ ते ३ प्रजातींचा समावेश असलेल्या एकत्रित लागवडीचा समूह करावा व त्याचे क्षेत्र सलग असावे. आंतरपीक व मिश्र पद्धतीने औषधी वनस्पतीची लागवड अर्थसाह्यासाठी पात्र आहे.
- या घटक योजनेअंतर्गत औषधी वनस्पती उत्पादक, शेतकरी लागवडदार इ., तसेच औषधी वनस्पती उत्पादक संघ, फेडरेशन, स्वयंसहायता गट, कंपनी, उत्पादक सहकारी संस्था इत्यादींना या योजनेचा लाभ घेता येईल.
अधिक वाचन
- मराठी विश्वकोश : भाग १५
बाह्य दुवे
- "हर्ब्ज रिसर्च फाउंडेशन" (इंग्लिश भाषेत). 2010-01-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-11-04 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- "वनौषधी - इ-आरोग्य.वर्डप्रेस.कॉम".