वजराई
भांबवली वजराई धबधबा
भांबवली वजराई धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. या धबधबाची hiउंची 1840 फूट (560 मीटर) आहे आणि तो सरळ उभ्या दगडावरून वाहतो आणि ह्याला तीन पायऱ्या आहेत. उरमोडी नदी ही या धबधब्याचा उगम स्थान आहे. हा धबधबा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेला आहे. भांबवली वजराई धबधबा हे एक सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे. अलिकडेच त्याला शासनाने "क" वर्ग पर्यटनाचा दर्जा दिला आहे. या धबधब्यापासुन अवघ्या 5 किमी वर कास पुष्प पठार आहे. भांबवली गावापर्यंत गाडीची सोय असली तरी धबधब्यापर्यंत रस्त्याची सोय नसल्याने, काॅक्रिटीकरणापासुन हा परिसर दुर राहिला आहे. परिणामी, येथील निसर्ग सौंदर्य अभाधित राहिले आहे. आनंददायी हवामान खरोखरच आपल्याला प्रेमात पाडेल पण या ठिकाणाचे खरे आकर्षण निर्मनुष्य शांतता आहे आणि आपल्याला अडथळा आणण्यासाठी कोणतेही फेरीवाले, अवांछित मार्गदर्शक आणि कॅमेरामॅन नाहीत. धबधबा हा बारमाही स्वरूपाचा आहे आणि वर्षातील 12 महिने वाहतो.
निरव शांतता, पक्षांचा किलबिलाट, वीणेच्या झंकारासारखा वा-याच्या झुळकेने केलेला आवाज, पाण्याचा खळखळाट असे हे सुंदर मनमोहक ठिकाण आणि साक्षात रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर. भांबवली वजराई धबधब्याचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी साता-याहुन कास मार्गे तांबी व पुढे भांबवलीला जाता येते. भांबवली ते धबधबा पायी चालावे लागते. पुढचा प्रवास घनदाट जंगलाचा असुन झाडाझुडपांच्या गर्दीतुन सुर्यप्रकाशदेखील जमीनीवर पोहोचत नाही, असा काहीसा हा भाग. पर्यटकांच्या सोईसाठी वन कमिटीने पायवाट केली असुन पायऱ्या, रेलिंग, टाॅवर, गॅलरी नियोजित आहे.
भांबवली येथुन आसपास एक किमी गेल्यानंतर धबधब्याचे विहंगम दृश्य नजरेत भरतं. धबधब्याचा आवाज आणि झाडाझुडपांच्या सहवासात आपण मंत्रमुग्ध होऊन चालत राहतो. उतरणीवरून कसरत करत आपण जसजसे खाली उतरत जातो तसतसा धबधब्याचा भव्यपणा खुलुन दिसतो आणि मान वर करून पाहिलेतरी धबधबा आपल्या नजरेच्या टप्यात मावत नाही. धबधब्याच्या माथ्यावर वजराईदेवीचे (साते आसरा) जागृत देवस्थान आहे. मधमाशांची पोळी हे देखील येथील वैशिष्टयच.
भांबवलीच्या जंगलात बरेच वन्य जीव वस्तीला आहेत, मुख्यत्वेकरून रानगवे, रानडुक्कर, भेकरे, ससे, वानर इ. आणि क्वचित वाघ, अस्वल देखील दिसतात, अनेक प्रकारचे पक्षी मुख्यत्वेकरून मोर-लांडोर यांचे दर्शन होते. फुलपाखरांच्या असंख्य जाती दृष्टीस पडतात. या जंगलात विविध प्रकारची झाडे असुन प्रामुख्याने हिरडा, आवळा, कडुलिंब, अडुळसा, शिकेकाई, पिसा, मुरूडशेंग, अश्वगंध, बेडकीचा वेल ( डायबिटीसवर) आणि इतर वनौषधी झाडे-झुडपे आढळतात.
भांबवली वजराई धबधब्याला भेट देताना पर्यटकांनी घ्यावयाची काळजी:
• सकाळी 8.00 ते संध्याकाळी 5.00 पर्यंत भेट द्या.
• मुसळधार पावसा असल्यास या ठिकाणास जाणे टाळा
• धबधब्या जवळील एक किलोमीटर क्षेत्र मासाहारी खाण्यास प्रतिबंधित आहे.
• हे प्लॅस्टिकमुक्त क्षेत्र आहे; प्लास्टिकची पिशव्या, पाणी बाटल्या इत्यादी टाकू नका.
• मद्यपान करू नका.
• पोहणेही प्रतिबंधित आहे ( येथीलतलाव खूप खोल आहेत)
• सर्प, वाघ, यासारख्या जंगली प्राण्यापासून व जळू व इतर कीटकापासून सावध राहा
ट्रेकिंग साठी पूर्वसूचना:
• योग्य पादत्राणे वापरा.
• दगडावरील पृष्टभाग अतिशय निसरडा असू शकतो
• तलाव पुष्कळ खोल आहेत.
• पाने, फुले आणि फळे, मशरूम इत्यादी खाऊ नका. खात्री करा की ते सुरक्षित आहेत . ते विषारी असू शकतात
• सर्प, वाघ, यासारख्या जंगली प्राण्यापासून व जळू व इतर कीटकापासून सावध राहा.
भांबवली वजराई धबधबा नजिकची सौंदर्य स्थळे:
1. भांबवली पुष्प पठार
2. कास पुष्प पठार
3. बामणोली बोटिंग
4. शेंबडी बोटिंग (math)
5. केळवली धबधबा
6. एकीव धबधबा
7. सांडवली धबधबा
8. घाटाई मंदिर
9. उरमोडी जलाशय
10. ठोसेघर धबधबा
11. सज्जनगड
कसे पोहोचाल :
रस्त्याने
सातारा येथून भांबवली - 32 किमी दूर आहे. १) सातारा-कास -कासपासून तांबी (भांबवली) पर्यंत जावे लागते. किंवा (2) महाबलेश्वर ते तापोळा ते बामणोली-कास, कास ते तांबी (भांबवली).
विमानाने
जवळचे विमानतळ पुणे येथे आहे.
रेल्वेने
जवळचे रेल्वे स्थानक सातारा आहे.