लोणारी
लोणारी हे हिंदू धर्म व चालीरीती पाळणारे, पूर्वी क्षत्रिय धर्माचे पालन करणारे, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे तसेच शिव व विष्णूची आराधना करणारे लोक आहेत. मुंबई गॅझेटियरच्या नोंदीनुसार लोणारी हे मराठा जातिधारक आहेत.
लोणारी जात
लोणारी ही एक हिंदू क्षत्रिय जात मराठा जातीशी संलग्न असून मुख्यत्वेकरून महाराष्ट्रातील अकोला,अमरावती,(बुलढाणा, खामगाव, शेगाव, नांदुरा), भुसावळ, रावेर,अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर जळगाव, जालना, धुळे, नाशिक, पुणे, वाशीम, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांत, तसेच मुंबई, बारामती, बेळगाव, बैतूल, हैदराबादसारख्या ठिकाणीसुद्धा वास्तव्यास आहे. याशिवाय, गुजरात, मध्य प्रदेश तसेच दक्षिणेकडील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडूमधेही लोणारी आढळतात. मध्य प्रदेशात बैतूल जिल्ह्यात ते लोणारी कुणबी म्हणून ओळखले जातात.
महाराष्ट्रात या जातीला इतर मागासवर्गीय असा (ओबीसीचा) दर्जा आहे.[१]
लोणारी समाजात चुना व मीठ तसेच कोळसा बनवणारे मूळचे मराठे पण स्वतंत्र व्यवसाय स्वीकारल्याने त्यांच्यात लोणारी व चुनारी असे प्रकार पडले. जातिविवेक या ग्रंथानुसार लोणारी लोकांचे शुद्ध लोणारी, कडू लोणारी, अक्करमासे लोणारी अशा शाखा आहेत. विविध शाखांमध्ये रोटी व्यवहार आहे, पण बेटी व्यवहार नाही. त्यामुळे हे लोक जेवण एकत्र करू शकतात पण आपआपसात लग्न करू शकत नाहीत.
लोकसंख्या
लोणारी जातिधारकांची एकूण लोकसंख्या १९०१ सालच्या जनगणनेनुसार १९२२२ इतकी होती. त्यापैकी पुरुष ९६७२ व स्त्रिया ९५५० होत्या.
जातीचा इतिहास
मल्लाट पुरुष व आवर्त स्त्री यांच्यापासून लोणारी समाज सुरू झाला, असे मानले जाते. लोणारी समाजाचे संस्कृत नाव "सौमिक" आणि समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनविणे हा पारंपरिक व्यवसाय असे दिसते. "मूलस्तंभ" नुसार लोणारी हे मूळचे क्षत्रिय असून मराठा जातीपासून विभक्त झालेले आहेत. पुण्यातील लोणारी हे मूळचे माणदेशातून म्हणजे मूलतः सातारा जिल्ह्यातील फलटण, दहिवडी, म्हसवड, पानवन. इतर अनेक गावातून स्थलांतरित झाले आहेत. काही जणांचे मानणे आहे की लोणारी हे लिंगायत धर्माचेसुद्धा पालन करत होते कारण त्यांच्या धार्मिक विधी जंगमामार्फत केले जात होते. लिंगायत धर्मीयांशी मिळणारा हा एक छोटासा दुवा आहे. एका मिथकानुसार लोणारी जातीचा उल्लेख हा महाभारतातसुद्धा आलेला दिसून येतो. "जेंव्हा विदुर धृतराष्ट्राला सल्ला देतो की हे राजन, तू माळ्यासारखा वाग. माळी झाडे लावतो, जगवतो व त्याची फळे चाखतो, तसेच लोणारी झाडे कापतो, जाळतो आणि कोळसा बनवतो"
(टीप : त्या काळी लोणारी जात अस्तित्वात असल्याचा तसा अजून कोणताही ठोस पुरावा नाही, कारण लोणारी समाज हा काही शतकापासून मराठ्यांमधून स्वतंत्र झालेले आढळतात)
लोणारी जातीत मूल जन्माला आल्यानंतर साधारण वर्षभरात धनगर त्याचे केस कापी आणि त्या बदल्यात त्याला तांब्याचे नाणे दिले जाई. लोणारी जात पंचायत मानत असत. समाजातील विविध तंटे बखेडे जात पंचायत सोडवीत असे. लोणाऱ्यांमध्ये सारख्या आडनावाच्या कुटुंबात लग्ने जुळत नाहीत.
कुलदैवत
लोणारी लोकांची विविध कुलदैवते असली तरी, मुख्यत्वे करून तुळजापूरची तुळजाभवानी आणि जेजुरीचा खंडोबा तसेच सिद्धनाथ आणि दरिदेव ही कुलदैवत आहेत.
लग्न समारंभ
दोन भाऊ अन्य कुटुंबातील दोन बहिणीशी लग्न करू शकतात. मुलाच्या लग्नाचे तसे निश्चित वय ठरलेले नाही, पण आजकाल हे नियम बदलले आहेत. लग्नापूर्वी शारीरिक संबध निषिद्ध मानले जातात. लग्नाआधी जर एखाद्या मुलीला गर्भधारणा झाली तर तर संबंधित व्यक्तीशी तिचा विवाह लावणे हे सक्तीचे आहे. लोणारी पुरुष एकच लग्न करू शकतो परंतु जर त्याची पत्नी विकलांग झाली किंवा पत्नीधर्म निभावण्यास अक्षम ठरली तर तिच्या संमतीने दुसरा विवाह करू शकतो. विवाहानंतर जन्माला आलेल्या प्रत्येक अपत्याची नोंद ठेवण्याचे काम भाट करत असतो. भाटमार्फत सर्व जातींच्या वंशावळी लिहिण्याचे काम आजही केले जाते. एकाच गोत्रात विवाहास परवानगी नाही.
लग्न जुळवण्याचे काम साधारणपणे चार पाच मध्यस्थांमार्फत होते व मुलाचा पिता हा मुलीच्या पित्याकडे तशी मागणी घालतो. ब्राम्हणाकडून लग्नाची तिथी व लग्नविधीचे धार्मिक कार्य पार पाडले जाते. मुला-मुलीची पत्रिका बघूनच व गुण जुळवून लग्न पक्के केले जाते. त्यासाठी सुपारी, हळद व कुंकू अशा सौभाग्य अलंकाराने धार्मिक विधी संपन्न होतो. लग्न समारंभाची सुरुवात कुंकू लावणे या कार्यक्रमाने सुरू होते व लग्न चिठ्ठी किंवा लग्नाची तारीख पक्की करणे हा दुसरा कार्यक्रम असतो. त्यानंतर लग्नाच्या आदल्या दिवशी किंवा लग्नाच्या दिवशी देवकार्य म्हणजे सवाद्य देवक काढणे, त्यानंतर हळद लावणे, मग देवकार्य अश्या प्रथा पाळल्या जातात. तसेच पाच पानांनी सीमान्तपूजन केले जाते त्यात आंबा, जांभूळ, उंबर, रुई व शमीची पाने असतात. कन्यादान करून वधुपिता किंवा मोठे काका हा समारंभ पूर्ण करतात त्यात आलेल्या वऱ्हाडींना गोड व रुचकर पण फक्त शाकाहारी जेवण दिले जाते. लग्न लावताना वधुवरांच्या डोक्यावर अक्षता व फुले फेकून मंगलाष्टके म्हणून, सप्तपदी, होम हवन व पूर्ण पूजापाठ करून लग्नविधी पार पडतो. लोणारी लोकांना पुनर्विवाह तसेच घटस्फोट सुद्धा मान्य आहे.
धर्म
लोणारी हिंदू धर्माला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात. वारकरी वैष्णव व शैव पंथाचा अनुयायी असतो. हिंदू धर्माच्या चालीरीतींप्रमाणे लोणारी लोकांची गणपती, शंकर, विष्णू, लक्ष्मी, भवानी, विठ्ठल आदींवर श्रद्धा असते. तसेच ते नाग, गाय, घोडा, बैल आणि पिंपळ, शमी, आपटा, वड, तुळस, बेल यांना पूजतात. लोणारी हे हिंदू धर्माचा कट्टर अनुयायी असल्याने ते भागवत, रामायण, महाभारत आदी धार्मिक ग्रंथ याचे वाचन करतात. एकादशी, चतुर्थी, सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार व खंडोबाचा रविवार उपवास धरतात. खंडोबा कुलदैवत असणारे लग्नविधी करण्यापूर्वी जागरण गोंधळ करतात. जावळ काढणे, कान टोचणे हे धार्मिक कार्यक्रम करतात. हे सर्व धार्मिक कार्य पौरोहित्य करणारा ब्राह्मणामार्फत केले जाते. लोणारी लोकांना विविध धार्मिक क्षेत्रांना भेटी देणे आवडते. ते पंढरपूर, तुळजापूर, आळंदी येथे सहकुटुंब जात असतात.
व्यवसाय
पुरातन काळात चुना, मीठ व कोळसा बनवणारी लोणारी जात आता विविध क्षेत्रात प्रावीण्य कमावीत आहे. डॉक्टर, इंजिनिअर, वकील, लेखक, संशोधक, उद्योजक, तसेच प्रशासकीय सेवा, लष्करी सेवा, पोलीस दल, क्रीडा विश्व, शिक्षक, प्राध्यापक, चित्रपट उद्योगातील विविध कामे असे सर्व क्षेत्रे आता लोणारी जातिधारकांनी काबीज केली आहेत.
अन्न व खाणे
लोणारी तसे मुख्यत्वे शाकाहारी, पण बोकडाचे, मेंढीचे, कोंबड्याचे मटण तसेच मासे खाऊ शकतात.
अंत्यसंस्कार विधी
लोणारे जातीच्या मृत व्यक्तीचे हिंदू धर्माच्या प्रचलित पद्धतीने अंतिम संस्कार केले जातात. मृतदेहाला अग्निसंस्कार व लहान असेल तर पुरणे अशी प्रथा आहे. दहाव्या दिवशी दशक्रिया व तेराव्या दिवशी ज्ञातिबांधवांना जेवण दिले जाते.
संदर्भ
- ^ "मुंबईसिटीसेतू.ऑर्ग हे संकेतस्थळ". 2016-06-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-06-29 रोजी पाहिले.