लोणादित्य मंदिर
प्रास्ताविक
भारतात अनेक देवदेवतांची पुजा केली जाते आणि बहुसंख्य लोक मूर्तीपूजक असल्याने भारतात प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात.
भौगोलिक स्थान
भारतातल्या महाराष्ट्र राज्याच्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील लोणाड गावी एक शंकराचे मंदिर आहे. लोणाड गावात जाण्यासाठी भिवंडी किंवा कल्याण येथून बस किंवा रिक्षा पकडावी लागते. मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकावर उतरून जवळच असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकावरून पडघ्याकडे जाणारी बस पकडावी आणि सावडनाका बसथांब्यावर उतरावे. तेथून पुढे चालत किंवा रिक्षाने लोणाड गावात जाता येते. भिवंडी बस स्थानकावरून जायचे असल्यास बापगाव पुसा धरणाकडे जाणारी बस पकडावी आणि जान्हवली फाट्यावर उतरावे. तेथून दोन किमीवर लोणाड गाव आहे. लोणाड गाव भिवंडी बायपासपासून दोन किमी अंतरावर आहे.
इतिहास
लोणाड गावाच्या परिसरात खूप प्राचीन पुरावशेष आहेत. एका टेकडीवर सहाव्या -सातव्या शतकातील लेणी सुद्धा आहेत. नवव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत उत्तर कोकणावर शिलाहार राजांची सत्ता होती. त्यांनी बांधलेल्या मंदिरांपैकी एक लोणादित्याचे शिवमंदिर आहे. हे मंदिर राज्य संरक्षित स्मारक आहे . मध्ययुगीन आक्रमणात मंदिराची बरीच पडझड झाली. शिलाहार राजा अपरादित्यचा प्रधान मंगलय्या यांचा पुत्र अन्नपय्या यांच्या इ.स.९९७ च्या एका ताम्रपटामध्ये भादाणे गावचा महसूल मंदिरासाठी नेमून दिल्याचा उल्लेख आहे. हे मंदिर किमान १०२४ वर्षे प्राचीन आहे. जवळच्याच चौधरपाडा गावच्या मंदिरात एक गद्धेगळ शिलालेख आहे. २४ जानेवारी १२४० च्या या शिलालेखात लोणाडचे नाव लवणेतट आहे आणि मंदिराचा उल्लेख लोणादित्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय येथे असलेल्या अपरादित्य दुसरा यांच्या इ.स.११८४ च्या शिलालेखात चंद्र, सूर्य आणि शिवलिंग कोरलेले आहे. तसेच लोणार गावातील दोन श्रेष्ठींची घरे जकातमुक्त केल्याचा उल्लेख आहे.
स्थापत्यशैली
लोणादित्य मंदिर गजरथावर निर्माण केलेले आहे. मंदिराचा भार हत्तींनी आपल्या पाठीवर तोलल्याचे दिसते.मंदिराचे अनेक अवशेष विखुरलेल्या अवस्थेत आहेत. गणपती,लज्जागौरी, मिथुन शिल्पे, मृदंगवादक, नृत्यांगना,यक्ष- किन्नर,पुष्पवृष्टी करणारी आकाश युगुले अशी अनेक शिल्पे आहेत. मंदिर पूर्वाभिमुख आहे. बांधणी भूमिज त्रिदल पद्धतीची आहे. गाभाऱ्यात शिवपिंडी, पुढे अंतराळ आणि सभामंडप अशी रचना केलेली आहे.गाभाऱ्याचे शिखर नष्ट झाले आहे. काही अंशी छत अस्तित्वात आहे. परिसरात कोसळलेले अनेक नक्षीदार भाग ,आमलक इत्यादी आहेत. गाभाऱ्यात शिवलिंग दीड मीटर खाली आहे. गाभाऱ्यात जाण्यासाठी पायऱ्या आहेत.संपूर्ण बांधकाम शुष्कसांधी आहे. आठ फूट उंचीच्या पाषाणी भिंती आहेत. दरवाज्यावर ललाटबिंबासह नऊ शिल्पे कोरलेली आहेत. छत कमळाच्या आकृतीने सालंकृत आहे. मंदिराच्या परिसरात महिषासुरमर्दिनी आणि गजासूरवधाची शिल्पे आहेत.मंदिराच्या पश्चिमेस एक एकर क्षेत्रफळाचा तलाव आहे.तलावाच्या घाटाचे दगड विस्कळीत झालेले आहेत.जवळच्या चौधरपाडा गावात असलेल्या शिवमंदिराला रामेश्वर मंदिर म्हणतात. पूर्वी ते सोमेश्वर किंवा षोम्पेश्वर असावे. शिलाहार राजा मल्लिकार्जुन यांच्या वसई येथील इ.स.११६२ च्या शिलालेखात एका शिवालयाचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे. त्यामध्ये मंदिराकरिता लोणावाटक येथील वाडी दान दिल्याचा उल्लेख आहे.
संदर्भ
महाराष्ट्र टाईम्स, शुक्रवार, ३० जुलै २०२१.