लेशान जायंट बुद्ध
लेशान जायंट बुद्ध | |
---|---|
सर्वसाधारण माहिती | |
प्रकार | दगडी पुतळा |
ठिकाण | लेशान, चीन |
बांधकाम सुरुवात | इ.स. १७१३ |
पूर्ण | इ.स. १८०३ |
ऊंची | |
वास्तुशास्त्रीय | ७१ मीटर (२३३ फूट) |
लेशान जायंट बुद्ध किंवा लेशानचे भव्य बुद्ध (चीनी: 乐山 大佛; इंग्रजी: Leshan Giant Buddha) हा ७१ मीटर (२३३ फूट) उंच दगडाचा मैत्रेय बुद्धांचा पुतळा आहे. हा जगातील सर्वात उंच दगडाचा पुतळा आहे.[ संदर्भ हवा ]
चीनच्या लेशान शहराशेजारच्या डोंगरातील बसलेल्या अवस्थेतील ही भव्य बुद्धमूर्ती इ.स. ७१३ आणि इ.स. ८०३ दरम्यान (तांग राजघराण्याच्या काळात) एमेई पर्वताच्या एका उभ्या कड्यांमध्ये कोरीवकाम करून बनवली गेली. अजूनही सुस्थितीत असलेली ही मूर्ती बसलेल्या अवस्थेतील बुद्धांची जगातील सर्वात उंच मूर्ती आहेच पण प्राचीन काळातील सर्वात उंच एकाष्म शिल्प म्हणूनही तिला ओळखले जाते. या मूर्तीच्या समोरच, तिच्या पायाजवळ मिंग, चिंग्यी आणि दादू या तीन नद्यांचा संगम आहे. इ.स. १९९६ पासून या स्थळाला UNESCO World Heritage Siteचा दर्जा मिळाला आहे.[१] मूर्तीच्या आजूबाजूची १८ चौरस किमी जागा ऐतिहासिक संरक्षित क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक मूर्ती आणि कोरीवकामे आहेत.
इतिहास
मिंग, चिंग्यी आणि दादू या तीन नद्यांचे प्रवाह फार वेगवान होते आणि त्यामुळे त्यांच्या संगमाच्या ठिकाणी जहाजे नेहमी दुर्घटनाग्रस्त होत असत. हैतांग नावाच्या बौद्ध भिक्खूंनी स्थानिक गव्हर्नरला असे पटवून दिले की येथे बुद्धमूर्तीची उभारणी केल्याने ही जागा सतत बुद्धांच्या नजरेसमोर राहून या आपत्ती टळतील. सरकारी पाठिंब्याने व हैतांगांच्या पुढाकाराने या मूर्तीचे काम इ.स. ७१३ला सुरू झाले. काही काळाने गव्हर्नरने मदत बंद केली आणि काम बंद पडले. त्याचा निषेध म्हणून आणि स्वतःची मूर्तीसंदर्भातली तीव्र भावना दाखवण्यासाठी हैतांगांनी स्वतःचे डोळे फोडून घेतले आणि ते त्या अर्धवट अवस्थेतील मूर्तीशेजारच्या गुहेत राहू लागले. काही काळाने त्यांचा मृत्यूही झाला. त्यानंतर ७० वर्षांनी जिएदुशी नावाच्या गव्हर्नरने या प्रकल्पाला पाठिंबा आणि अर्थबळ देऊन तो पूर्ण केला. एवढी प्रचंड मूर्ती कोरताना कपारीतून मोठ्या प्रमाणात दगड निघत असत आणि ते नद्यांच्या संगमाच्या पात्रांत टाकले जात असत. या भरीमुळे ती मूर्ती बनेपर्यंत नद्यांचे प्रवाह खरोखरच संथ होऊन जहाजांचे अपघात होणे थांबले.
आठव्या शतकाच्या पूर्वार्धातला हा ७१ मीटर उंच आणि २८ मीटर रुंद खांदे असलेल्या मूर्तीचा बांधकाम प्रकल्प वास्तुशात्राचाही एक उत्तम नमुना आहे. त्यात पावसाच्या पाण्याने मूर्तीची झीज होऊ नये व पाणी सहज वाहून जावे यासाठीही नलिकायोजना होती. मूर्ती तयार झाल्यावर तिच्यावर १३ मजली उंच लाकडी छत बांधले गेले आणि छताला व मूर्तीला सोने व माणकांनी सजवले गेले. नंतर युवान राजघराण्याच्या शेवटाला मंगोल आक्रमकांनी या छताची मोडतोड केली आणि सोने माणके लुटून नेली.[ संदर्भ हवा ]
अवनती
क्षेत्रातील अस्ताव्यस्त विकासापासून निघणाऱ्या प्रदूषणामुळे लेशान बुद्धांवर परिणाम झाला आहे. झिनहुआ न्यूझ एजन्सीच्या मते, लेशान जायंट बुद्ध आणि या प्रदेशातील अनेक चीनी नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये हवामान, वायू प्रदूषण आणि पर्यटकांच्या झुंडांमुळे घट झाली आहे. सरकारने पुनर्संचयन कार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.[ संदर्भ हवा ]
परिमाण
यासंबंधीची स्थानिक म्हण आहे: "पर्वत हा बुद्ध आहे आणि बुद्ध हा पर्वत आहे". हे अंशतः खरे आहे कारण, असे म्हणले जाते की, ज्या पर्वत रांगांमध्ये लेशान जायंट बुद्ध स्थित आहे, ते लेशान बुद्ध यांच्या हृदयाप्रमाणे नदीच्या पात्रातून झोपलेल्या बुद्धांच्या आकाराप्रमाणे दिसतात.[ संदर्भ हवा ]
चित्रदालन
- नदीतून मूर्तीचे विहंग दृश्य .
- The cliff to the left of the statue.
- जमिनीवरून दिसणारे दृश्य.
- वरून मूर्तीचे दृश्य.
- The head seen from the staircase.
- path winding up to the statue
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ Centre, UNESCO World Heritage. "Mount Emei Scenic Area, including Leshan Giant Buddha Scenic Area". whc.unesco.org (इंग्रजी भाषेत). 2018-04-04 रोजी पाहिले.