लेणे
लेणी म्हणजे डोंगर, टेकडी, पर्वत, खडक कोरून तयार केलेल्या गुहा होत. ज्यांच्या उपयोग संन्यासी, भिक्खूंना तपस्या,साधना करणे अथवा विश्रांती घेणे ह्यासाठी केला जाई. ही लेणी प्रामुख्याने सातवाहन, वाकाटक व राष्ट्रकूट या राजवंशाच्या काळात कोरली गेली आहेत. अशा वैशिष्ट्यपूर्ण लेण्यांमध्ये महाराष्ट्रातील अजिंठा, कार्ले, कान्हेरी, घारापुरी, पितळखोरे, भाजे, वेरूळ ही जगप्रसिद्ध लेणी आहेत.
लेण्यांमध्ये चैत्यगृहे, विहार व मंदिर यांचा समावेश असतो. प्रारंभी या लेणी अनलंकृत असाव्यात; परंतु पुढे त्यामधे शिल्पे व मूर्ती खोदण्यात आल्या. तसेच लेण्यांतील भिंतीवर चित्रे कोरून त्या सुशोभित करण्यात आल्या. लेण्यांना शैलगृहे, शिलामंदिरे असेही म्हणतात. लेण हा शब्द संस्कृत लयन- गृह या शब्दावरून आला असावा.
लेण्याच्या माहितीबाबत एक ढोबळमानाने असलेली गोष्ट अशी की, पुरातन काली बौद्ध भिक्खु हे धम्म प्रसारार्थ भारतभर फिरत असत. त्यांचे दिनचर्येचे पाळायचे नियम कडक असत. ते नियम पाळणे सुलभ व्हावे आणि धम्मप्रसारार्थ फिरणाऱ्या भिक्खुंची ध्यानधारणेची सोय सहज व्हावी ह्यासाठी तत्कालीन राजांनी अशी लेणी खोदून घेतली. अशी लेणी लेण्याद्री, जुन्नर परिसर, कार्ले, भाजे, नाशिक येथे पाहण्यास मिळतात. बहुतेक प्रत्येक लेण्यातते लेणे ज्याने खोदविले त्याच्या नावाचा उल्लेख शिलालेखातून सापडतो. कोकणात दापोली जवळ पन्हाळकाझी लेणी आहेत.
सबंध भारतात आज माहिती असलेली सुमारे एक हजार लेणी असून त्यापैकी शंभर लेणी ही हिंदू व जैन आहेत. उरलेली ९०० ही बौद्धांची आहेत असे मानले जाते. सातवाहन काळ व त्यानंतर परदेशी व्यापाऱ्यांशी होणाऱ्या व्यापारामुळे आलेली भरभराट ही या लेण्यांच्या निर्मितीला मदत करणारी ठरली असे मानले जाते.
कालानुसार लेण्यांचे तीन विभाग मानले गेले आहेत :
- इ.स.पू. दुसरे ते इ.स.चे दुसरे शतक
- इ.स. ५ ते इ.स. ७चा मध्य
- इ.स. ७ ते इ.स. १०ची अखेर
लेण्यांच्या अभ्यासातून त्या त्या प्रांताचा राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहास आपल्याला माहिती होतो.[१]
लेण्यांचे दोन प्रकार आहेत.
ऐहिक लेणी - नाणेघाटात सातवाहनांचे देवकुळ म्हणजे कीर्तिमंदिर - पूर्वजांच्या प्रतिमांचे मंदिर. हे एकमेव लेणे ऐहिक लेणे म्हणून ज्ञात आहे.
धार्मिक लेणी - बौद्ध, जैन, हिंदू ह्या धर्मियांसाठी त्या त्या काळातील शासकांनी तसेच काही प्रमुख व्यक्तींच्या दानातून ही लेणी बांधलेली असावीत. धार्मिक लेण्यांमध्ये त्या धर्माच्या तत्कालीन रूपाचे दर्शन घडते. तसेच धर्म आणि संस्कृती ह्यांचे चित्रण आपल्याला ह्या लेण्यांमधून पाहायला मिळते.
हे सुद्धा पहा
- महाराष्ट्रातील लेणींची यादी
चित्रदालन
- २६ अजिंठ्यातील २६ क्रमांकाचे लेणे
- घारापुरी लेण्यांतील त्रिमूर्ती
- अजिंठ्याचे दृश्य
- पन्हाळेकाजीची लेणे
- कान्हेरीची लेणी
- कार्ल्याची लेणी
- धाराशिवची लेणी
- कोंडाणे लेणी
- कुड्याची लेणी
संदर्भ
- ^ महाराष्ट्रातील लेणी - प्रा. सु.ह जोशी
- त्रिरश्मी (बुद्ध लेणी) - (अतुल भोसेकर)
- भारतीय संस्कृती कोश ८वा खंड
- लेणी महाराष्ट्राची (सु,ह, जोशी)